Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ढोल-ताशे, झिंदाबादचे नारे..
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज शहराला जत्रेचे स्वरूप आले होते. भाजपचे दिलीप गांधी, काँग्रेस आघाडीचे खासदार रामदास आठवले, बहुजन

 

समाज पक्षातर्फे रिंगणात उतरलेले खासदार तुकाराम गडाख, काँग्रेस बंडखोर प्रेमानंद रुपवते आदींनी आज शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. या सर्व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे जथ्थे, वाहने, पक्षध्वज यामुळे शहराला सकाळपासून निवडणुकीचा ‘फिल’ आला होता. हार-तुरे, ढोल-ताशे, घोषणाबाजी यामुळे निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू झाल्याची जाणीव होत होती.
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण अर्ज भरणार, कोण नाही भरणार यासंबंधी खमंग चर्चा सुरू होती. कोण आले, सोबत कोण कोण आहेत, कोण अनुपस्थित आहे, याची नोंद प्रसारमाध्यमांबरोबरच विविध पक्षांच्या उमेदवारांचे कार्यकर्तेही नीट घेत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती आज कडक बंदोबस्त तैनात होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे स्वत उपस्थित होते. अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुकांना केवळ ४ समर्थकांसह आत सोडले जात होते.
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रिपाईचे नेते, खासदार आठवले सकाळी अर्ज भरण्यासाठी आले. खासदार बाळासाहेब विखे स्वत त्यांच्यासमवेत होते. त्यांना पाहताच विखेंची नाराजी दूर झाली वाटते, अशी चर्चा सुरू झाली.
अर्ज दाखल करून कार्यालयाबाहेर आलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते उत्साहात स्वागत करीत. गांधी यांच्या मिरवणुकीत सर्वाधिक गर्दी होती. भगवी उपरणे, पक्षाच्या टोप्या, उपरणे घातलेल्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत जल्लोष केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ढोल-ताशाच्या तालावर नाचत कार्यकर्ते गांधींच्या झिंदाबादच्या घोषणा देत होते. भाजप-सेनेचे जिल्ह्य़ातील चारही आमदार, भाजपचे नाराज नेते अभय आगरकर, सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमुळे भाजप-सेना नेत्यांत समेट घडून आल्याची चर्चा होती.
उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर विजयी आर्विभावात प्रसारमाध्यमांना ‘बाईट’ही दिले. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आवरता-आवरता पोलीस मात्र चांगलेच वैतागले होते. समर्थकांच्या गर्दीमुळे स्टेशन रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.