Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अ‍ॅट्रॉसिटीची भोकाडी!
लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय व राज्यस्तरावर कोणताही मुद्दा नाही. जेव्हा कोणताच मुद्दा किंवा प्रश्न नसतो, तेव्हा जातीची समीकरणे नेहमीच प्रभावी ठरतात. स्वतला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष

 

म्हणविणारे पक्षही उमेदवारी देताना जातींचा प्रभाव हाच प्रमुख निकष मानतात. प्रचारात उघड जातपात नसली, तरी जातीचा छुपा अजेंडा असतो. गेल्या दोन दशकांत उपेक्षित घटक, इतर मागासवर्गीयांमध्ये जागृती आली. त्याचा मतपेढीकरिता वापर करणे सुरू झाले. त्यातून जातीच्या मेळाव्यांचे पीक आले. प्रत्येक पक्षात प्रभावशाली नेत्यांची चलती असते. निवडणुकीचे विश्लेषण करताना जातीय मांडणी केली जाते.
कोणत्या जातीची मते कोणत्या पक्षाला मिळणार किंवा मिळाली याचा लेखाजोखा मांडला जातो.
शिर्डी मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अत्यंत विखारी पद्धतीने जातीय प्रचार सुरू झाला आहे. आता कसे होणार? अ‍ॅट्रॉसिटीचे काय? असे प्रश्न गावागावांतील पारावर आणि चावडय़ांवर विचारले जात आहेत. अ‍ॅट्रॉसिटीची चर्चा घडविण्यामागे गोबेल्स निती आहे. कुजबुज मोहिमेमुळे शिर्डी मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार खासदार रामदास आठवले यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात विरोधकांना यश आले आहे. ‘नीळ हवी की गुलाल’ असा सवाल करत लोकांना भोकाडी दाखविली जाते. आठवले शिर्डीतून निवडणूक लढविणार याची चर्चा सुरू झाल्यापासून हा अपप्रचार सुरू आहे.
तनपुरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे, चितळीचे सरपंच शिवाजीराव वाघ, संगमनेरचे दिवंगत नेते संभाजीराजे थोरात यांच्याविरुद्धचे अ‍ॅट्रॉसिटीचे दाखले देऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे आठवले चांगलेच अडचणीत आले आहेत. पंढरपूर मतदारसंघात पाच हजार अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस झाल्याची अफवाही सोडण्यात आली. त्यामुळे आठवलेंना प्रचाराच्या प्रारंभी अ‍ॅट्रॉसिटीचा खुलासा करावा लागत आहे. पंढरपुरातील एका पत्रकाराने माहितीच्या अधिकारात अ‍ॅट्रॉसिटीची आकडेवारी मागितली. पाच वर्षांत अ‍ॅट्रॉसिटीचे अवघे ७० गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ३० गुन्ह्य़ांतील फि र्यादी दलित, २३ गुन्ह्य़ांतील फिर्यादी चर्मकार, १४ गुन्ह्य़ांतील फि र्यादी मातंग व ३ गुन्ह्य़ांतील फि र्यादी आदिवासी आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार हे गुन्हे घडल्यानंतर त्यास अ‍ॅट्रॉसिटी आपोआपच लागते. ७० गुन्ह्य़ांपैकी २८ गुन्हे या प्रकारातील आहेत. बांधाची, सावकारीची, वैयक्तिक भांडणाची प्रकरणे बहुसंख्य आहेत. केवळ ७-८ गुन्हे जातीय दंगलीची आहेत. परंतु पराचा कावळा करून आठवलेंची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे जातीय सलोख्याऐवजी विद्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा अपप्रचार सुरू असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहूमहाराज यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारे नेते मौन बाळगून होते. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या भूमीत हा प्रकार घडत असताना आठवले वगळता अन्य कुणाही नेत्याने प्रतिवाद केलेला नाही. निवडणुकीत मुद्दा नसला की नेत्यांचे बळ निवडणुका जिंकण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे आपले बळ दाखविण्याची संधी त्यांना आयती चालून आली आहे. भविष्यात राजकीय पदेही पदरात पाडून घ्यायची आहेत.
बसपच्या नेत्या मायावती यांनी ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग सुरू केला आहे. त्याचा मुकाबला करण्याकरिता आठवलेंबरोबर आघाडीने युती केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आठवलेंना उमेदवारी दिली असूनही नेत्यांच्या आदेशाचा कुणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. हा सारा तमाशा सेना-भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे पाहत आहेत. त्यांनी जाहीर प्रचारसभांऐवजी भेटीगाठींवर जोर दिला आहे. आठवले यांनी दलित पँथरमधून राजकारण सुरू केले. दलितांवरील अत्याचारात पँथरने आक्रमक भूमिका घेतली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांनी लढा दिला. त्यांच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी राजकारणात चुकीची भूमिका घेतली, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला. त्यापाठीमागे स्थानिक राजकारणाची गटबाजी होती. समर्थकांचे हे उद्योग आठवलेंना अडचणीचे ठरत आहेत. आठवले यांनी, ‘मी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी आलेलो नाही, तर तुमचा जीवलग खासदार बनण्यासाठी आलोय. मी भांडणे लावणारा माणूस नाही. कोणी खटला दाखल करणार असेल, तर त्याला मी थांबवेन’ असे सांगितले आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा अपप्रचार सेना-भाजप युतीपेक्षाही आघाडीचेच कार्यकर्ते अधिक करताना दिसत आहेत. लोकांमध्ये भांडणे लावून राजकारण करण्याचा खेळ नगर जिल्ह्य़ात पूर्वीपासून चालत आला आहे. त्यासाठी वेळप्रसंगी अ‍ॅट्रॉसिटीचा वापर झाला. सोनईचे शरद काळे, मच्छिंद्र टेमक आणि दस्तुरखुद्द भानुदास मुरकुटे यांनीही याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आठवलेंना दोष देण्यापेक्षा नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला नवा चेहरा देण्याचे ठरवले आहे. ४० टक्के दलित व ६० टक्के सवर्ण समाजाला पक्षात सामावून घेण्याचे धोरण त्यांनी जाहीर केले. शिर्डीतील अपप्रचारामुळे त्यांना रिपब्लिकन पक्षातही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविण्याची वेळ आली आहे.
बित्तंबाज