Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मौनी खासदार नसावा!
राजकारणामध्ये ‘खासदारकी’ला एक प्रकारचे वलय आहे. खासदार केंद्रात मतदारसंघाचे नेतृत्व करणार असल्याने तो बहुश्रुत, बहुआयामी असावा. जागतिक घडामोडींबद्दल तो सतर्क असावा. बरेचसे खासदार संसदेत तोंड उघडत नाहीत किंवा चर्चेच्या वेळी अनुपस्थित राहतात, ही वस्तुस्थिती आहे. संसदेत तुम्ही चर्चा करू शकणार नसाल, प्रश्न मांडू शकणार नसाल तर तुम्हाला

 

निवडून दिल्याचा फायदा काय?
आरोग्य, बेरोजगारी, पर्यावरण, रस्ते, महिलांची सुरक्षा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिला आरक्षण विधेयकाकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. किती खासदार संसदेतील ग्रंथालयाचा उपयोग करतात, हा संशोधनाचा विषय ठरावा. पाणी, आरोग्य, रस्ते, वीज हे मतदारांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असलेले प्रश्न खासदाराला मुळापासून माहिती असावेत. राजकीय वलयातून बाजूला होऊन ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्या मतदारांशी त्यांचा संपर्क हवा. त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. जिल्हाधिकारी, जि. प. अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच या घटकांशी समन्वय साधून केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील, यासाठी खासदाराने प्रयत्न करावेत. कित्येकदा निधीचा वापर कसा आणि कुठे करावा, हे प्रश्नांचा अभ्यासच नसल्याने खासदाराला समजत नाही. संसदेत महिला खासदारांनी शोभेची बाहुली न बनता स्वतचा ठसा निर्माण करायला हवा.
पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे खासदाराचे कर्तव्य आहे. दुष्काळी भागासाठी नदीजोड प्रकल्प आणि नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. स्त्री कितीही पुढे गेली, तरी तिच्या कौटुंबिक आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न असतोच. त्यामुळे कायद्याने तिला संरक्षण दिले, तरी कायद्याचे पालन होते की नाही याकडे खासदाराचे लक्ष असावे. सध्या बाह्य़ आणि अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न भेडसावतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्नही आहे. खासदाराने या सर्व प्रश्नांचा साकल्याने विचार करावा. लोकांमध्ये मिसळून, लोकांचे प्रश्न सोडविणारा खासदार ही प्रतीमा निर्माण व्हावी.