Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सभेपेक्षा पारायण बरे!
जाहीर सभांमधून प्रचार करायचा, तर परवानगी काढा, खर्चाचा हिशेब सादर करा, आचारसंहितेच्या अटींचे पालन करा अशा अनेक डोकेदुखीच्या बाबी असतात. अशा सभा घेण्यापेक्षा हरिनाम

 

सप्ताह किंवा पारायण सोहळा घेण्याची कल्पना कशी वाटते? सध्या विविध पक्षाच्या चलाख नेत्यांनी असे पारायण सोहळे ठिकठिकाणी सुरू केले आहेत. या पारायणांना हजारोंची गर्दी होते. विशेषत स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय असते. ‘हभप’ सुश्राव्य प्रवचन आणि कीर्तन करताना अधून-मधून राजकीय संदर्भ देत कोपरखळ्या मारतात. त्याला मोठी दाद मिळते. ‘यजमानां’ना राजकीय फायदा होईल, अशा पद्धतीने हे सगळे सुरू असते. या पारायणांकडे तूर्त तरी निवडणूक आयोगाचे लक्ष नसल्याने होता होईल तेवढे जनमत आपल्याकडे वळवण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. पारायण करणाऱ्यांना भरपूर बिदागी दिल्यामुळे ते खूश आहेत. काल्याच्या कीर्तनानंतर मतदारांना ‘प्रसाद’ मिळाला की तेही खूष होतील!
चायना मोबाईलचे पेव
ट्रिंग. ट्रिंग.. ट्रिंग..
सभा असो की मेळावे, बैठका, प्रचारफेऱ्या.. कार्यकर्त्यांच्या मोबाईलचा खणखणाट सुरूच असतो. सध्या चायना मोबाईलचे पेव फुटले असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता अन् मतदारांच्या हातातही मोबाईल असतोच. इतर कंपन्यांच्या मोबाईलपेक्षा चायना मोबाईलचा आवाज मोठा असतो. कमी किमतीमुळे त्याचा ग्राहकवर्गही अधिक आहे. प्रचाराच्या वेळी हे मोबाईल अचानक वाजू लागतात. उमेदवारांसाठी ते अडचणीचे ठरते. निदान प्रचाराच्या वेळी मोबाईल बंद ठेवा, असे स्पष्ट सांगणेही उमेदवाराला शक्य नसते. त्यामुळे चायना मोबाईलच्या आवाजाचा त्रास सहन करत नेत्यांना व उमेदवाराला प्रचार करावाच लागतो.