Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

उरण परिसरातील वाढते प्रदूषण चिंताजनक
मधुकर ठाकूर
उरण परिसरात वाढते प्रकल्प व घातक रासायनिक कंपन्यांमुळे जल , वायू आदी प्रकारच्या प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. या वाढत्या प्रदूषणावर थोडय़ा प्रमाणात का होईना , आळा घालण्यासाठी वनीकरण व झाडे लावण्याच्या कामाला प्राधान्य देण्याची
आवश्यकता निर्माण झाली आहे. झाडे लावून व जोपासना करून प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केंद्रशासित ओएनजीसी व जेएनपीटी प्रकल्पाकडून थोडय़ा प्रमाणात होऊ लागले आहेत. मात्र दुसरीकडे अनेक रासायनिक प्रकल्प व कंपन्यांकडून यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने प्रदूषणाची भीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने चिंताजनक बनत चालली आहे. उरण परिसरात २६ मे १९८९ रोजी जेएनपीटी बंदराची , तर १९८५ साली ओएनजीसीच्या अत्याधुनिक प्रकल्पाची उभारणी झाली. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा या दोन्ही प्रकल्पांचा आहे. यापैकी जेएनपीटी बंदराच्या उभारणीनंतर तर सागरीमार्गे कंटेनर मालाच्या आयात-निर्यात व्यापाराला सुगीचे दिवस आले आहेत. कंटेनर वाहतुकीच्या प्रचंड नफ्यातील धंद्यामुळे उरण परिसरात सुमारे ६० कंटेनर यार्ड निर्माण झाले आहेत. तसेच रेल्वे व इतर वाहतुकीची अद्ययावत साधने उपलब्ध होऊ लागल्याने घातक रासायनिक पदार्थाची हाताळणी करणाऱ्या रासायनिक प्रकल्पांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र अशा या रासायनिक कंपन्या व प्रकल्पांतून घातक विषारी द्रव्य समुद्र , हवेत फैलावत असल्याने उरण परिसरात प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. उरण परिसरातील या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘ झाडे लावा , झाडे जगवा ’ हा उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्षच होत चालले आहे. यामुळेच उरणकरांना प्रदूषणासारख्या गंभीर समस्येला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. येथील अनेक रासायनिक प्रकल्पातील दूषित सांडपाणी थेट समुद्रात मिसळत आहे. यामुळे वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषणाचीही समस्या निर्माण झाली आहे. ओएनजीसीसारख्या प्रकल्पातून तर हवेत सोडणाऱ्या दूषित वायूमुळे प्रकल्पासभोवार अनेक गावांना प्रदूषणामुळे त्रास होऊ लागला आहे. या प्रदूषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोका पोहोचत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. मात्र तक्रारीनंतरही अद्याप तरी त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. जेएनपीटी प्रकल्पाची प्रदूषणाची समस्या थोडय़ाफार फरकाने गांभीर्याने घेतली आहे. यासाठी जेएनपीटी विविध योजना कार्यान्वित करण्याची तयारी सुरू केली आहे. काही क्षेत्रात याआधीच विविध झाडांची लागवड करून जोपासनाही केली जात आहे. त्याचबरोबर २५८४ हेक्टर क्षेत्रापैकी ११४५ हेक्टर जमीन झाडांची लागवड करण्यासाठी व मॅनग्रोज यासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. यापैकी ६०० हेक्टर जमीन केवळ समुद्री वनस्पतींच्या विकासासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. तर ३९० हेक्टर जमिनीवर हिरवळीसाठी तर १६० हेक्टर जमीन नैसर्गिक व पर्यावरण उद्यानासाठी राखून ठेवण्यात आली असून योजनेप्रमाणे विकसित करण्याची जेएनपीटीची योजना आहे. जेएनपीटीने या अधिक शेकडो हेक्टरमध्ये ४५ हजार झाडेही लावण्यात आली आहेत. हरित क्षेत्रात वाढ करून दीर्घकालीन योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी हे काम वनविभागाकडे सोपविण्यात आले आहे. देशातील सर्वाधिक हराभरा बंदर म्हणून जेएनपीटी ओळखले जाते. यासाठी बंदराला १९९६ साली इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओएनजीसीनेही पर्यावरणाचे महत्त्व ओळखून द्रोणागिरी डोंगर परिसरात झाडे लावली आहेत. मात्र त्याचे प्रमाण कमी असून , पर्यावरणासाठी महत्त्वाची असलेल्या झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होऊ लागली आहे. जेएनपीटी , ओएनजीसी व इतर एक-दोन कंपन्या वगळता पर्यावरण रोखण्यासाठी कोणत्याही कंपन्यांकडून फारसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे उरण परिसरातील प्रदूषणाची समस्या आणखी गंभीर बनत चालली आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर खरं तर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अशा प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्या यांच्यातील आर्थिक हितसंबंधांमुळे कारवाई होण्याची शक्यता कमीच असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. प्रदूषण विभागालाही प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यास फारसे स्वारस्य नसते. मात्र यामुळे कंपन्यांचे फावत असून प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ होत चालली आहे. उरण परिसरातील अनेक डोंगर , टेकडय़ा विकासाच्या नावाखाली जमीनदोस्त केल्या आहेत. त्यामुळे याआधीच प्रदूषणाला थोडाफार आळा घालणारी झाडेझुडपे नष्ट झाली आहेत. यामुळे परिसरात झाडे लावून प्रदूषणाला आवर घालणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही , ही बाब खरेच दुर्दैवी आहे.