Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

राज्य

‘भारत-चीनच्या प्रगतीबद्दल आदर पण गुणवत्तेत ब्रिटनशी तुलनाच अशक्य’
आशिष पेंडसे, पुणे, ४ एप्रिल

‘भारत वा चीनमधील प्रगतीची आम्ही आदरयुक्त दखल घेतो. परंतु, गुणवत्तेच्या बाबतीत आमच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. मोठय़ा संख्येने उच्चशिक्षण व संशोधनसंस्थाचा विकास स्वागतार्ह असला, तरी त्यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ विकसित केले जात आहे, याकडे अधिक चिकित्सकपणे पाहण्याची गरज आहे. काळाची पावले ओळखून त्या गरजा भागविल्या नाहीत, तर समाजापुढील आव्हाने कायमच राहतील,’ असा इशारा ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जॉन हूड यांनी आज येथे दिला.

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा अर्ज दाखल
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आता नऊ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीतर्फे आज डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याव्यतिरिक्त या मतदारसंघातून आज आणखी चार जणांनी अर्ज भरल्यामुळे उमेदवारांची एकूण संख्या नऊ झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. या सर्व अर्जाची छाननी येत्या सोमवारी (६ एप्रिल) होणार असून अर्ज मागे घेण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत मुदत आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

डीएमसीतील कामगारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी!
कंपनी प्रवक्त्याचे आवाहन
ठाणे, ४ एप्रिल/प्रतिनिधी

धरमसी मोरारजी कंपनी सध्या आर्थिक संकटातून मार्गक्रमण करीत असल्यानेच कंपनीला टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. व्यवस्थापनाला कामगारांच्या प्रश्नाबाबत सहानुभूती असून, या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व्यवस्थापन करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना कामगारांनीही सहकार्य करावे, असे आवाहन धरमसी मोरारजीचे कंपनीने केले आहे. ८० वर्षांंपासून व्यवस्थितपणे सुरू असलेल्या धरमसी मोरारजी कंपनीला २३ जानेवारीपासून टाळे लागल्याने ३३० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामगारांच्या व्यथांना ‘लोकसत्ता’ने शनिवारच्या अंकात वाचा फोडली. त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करीत असताना व्यवस्थापनाने हे आवाहन केले आहे.

चार पिस्तुलांसह युवक काँग्रेसचा सरचिटणीस गजाआड
ठाणे,४ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर समाजवादी पार्टीचे नेते, माजी नगरसेवक रामनयन यादव यांनी केलेल्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचणाऱ्या ठाणे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रमेशचंद्र गिरी व प्रकाश गिरी या दोघांना चार पिस्तुले व ८ जिवंत काडतुसांसह उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने काल अटक केली आहे. खुन, दंगल, खुनाचे प्रयत्न, हाणामारी अशा प्रकारचे १४ गंभीर गुन्हे दाखल असलेले माजी नगरसेवक रामनयन यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून घडविलेल्या दंगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते विजय ठाकूर यांची हत्या केली होती.

बार्शीत पोलीस ठाण्याजवळच दुकान फोडून १२ लाख लंपास
सोलापूर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

बार्शी येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील मोबाईल संच विक्रीचे दुकान फोडून चोरटय़ांनी सुमारे बारा लाखांचा ऐवज लांबविला. गुरुवारी पहाटे घडलेल्या या गुन्ह्य़ाची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत करण्याची कारवाई चालू होती.

ठाण्यात आजपासून हायटेक वधू-वर मेळावा
मुंबई, ४ एप्रिल / प्रतिनिधी
ठाणे (पू.) येथील युनायटेड स्पोर्टस् क्लबच्या पटांगणात उद्यापासून ८ एप्रिलपर्यंत एक आगळा व भव्य वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘शुभमंगल वधू- वर मेळावा’ असे याचे नाव असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून याचे आयोजन करण्यात आले आहे. सी. सी. टीव्हीचा वापर, व्हिडिओ रेकॉर्डिग अशा हायटेक तंत्रांचा वापर मेळाव्यात केला जाणार असून ‘लोकसत्ता’ या मेळाव्याचा सहप्रायोजक आहे.

बेस्ट कंडक्टरची हत्या करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक
बेलापूर, ४ एप्रिल/वार्ताहर

बेस्टच्या वाहकाची हत्या करणाऱ्या पत्नीसह तिचा प्रियकर व त्याच्या साथीदारास नेरुळ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वसंत जगताप (४२), एकनाथ नांदे व विद्या काळुंगे यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बेस्टचे वाहक चंद्रकांत काळुंगे (४०) यांची १ एप्रिल रोजी रात्री गळा दाबून हत्या करण्यात आली. तद्नंतर सदर मृतदेह सफेद नॉयलॉन गोणीत भरून पुरावा नष्ट करण्यासाठी कुकशेत गावाजवळ टाकण्यात आला होता. वसंत व विद्या यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय चंद्रकांत घेत होता. तसेच तो दारू पिऊन विद्याला वारंवार मारहाण करीत होता. या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सातारा शहरात युवकाचा खून
सातारा, ४ एप्रिल/प्रतिनिधी
येथील दुर्गापेठेतील गोलंदाज मंडळाचा कार्यकर्ता हणमंत ऊर्फ संतोष शंकर लोखंडे (वय २८) याचा त्याच पेठेतील दीपक बबन कांबळे (वय ३५) याने रामपुरी चाकूने वार करून खून केला. या प्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीस ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मयत संतोष लोखंडे याचा भाऊ अनिल शंकर लोखंडे यांनी खुनाच्या प्रकाराची फिर्याद सातारा पोलीस स्टेशनला दिली. दुर्गा पेठेतील वीर लहुजी उस्ताद यांच्या पुतळा परिसरात संतोष लोखंडे मित्राबरोबर गुरुवारी रात्री १० वाजता गप्पा मारत बसले होते. त्या ठिकाणी आरोपी दीपक कांबळे आला व चर्चेत सामील होत असताना मयत संतोषने त्यास विरोध केल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. रात्री साडेअकराच्या दरम्यान वीज गेली असता संतोष व त्याचा भाऊ घरी जात असता दबा धरून बसलेल्या दीपक कांबळे याने संतोषवर रामपुरी चाकूने त्याचा गळा व छातीवर आठ-दहा वार केले. जखमी संतोषला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचे उपचारापूर्वीच निधन झाले.