Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

क्रीडा

झहीरचा झंझावात
न्यूझीलंडचा १९७ धावांत खुर्दा; भारताकडे २३३ धावांची आघाडी

वेलिंग्टन, ४ एप्रिल / पीटीआय

सहा चौकारांच्या आतषबाजीने किवींना झोडपून काढणाऱ्या झहीर खानच्या गोलंदाजीनेही क्रिकेटरसिकांना आज झपाटून टाकले. ६५ धावांतील त्याच्या पाच बळींच्या ‘पंच’मुळे यजमान न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या १९७ धावांत नॉकआऊट झाला. न्यूझीलंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील या अखेरच्या सामन्यावरील भारताची पकड आणखी पक्की झाली असून दुसऱ्या डावातील १ बाद ५१ धावांसह पाहुण्यांकडे एकूण २३३ धावांची समाधानकारक आघाडी आहे. बेसिन रिझव्‍‌र्हवरील खेळपट्टीवर झहीरच्या उसळत्या गोलंदाजीच्या झंझावातात यजमानांची फलंदाजी कोसळली. भारताच्या पहिल्या डावातील ३७९ धावांचा प्रतिकार करताना न्यूझीलंडला दोनशे धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

न्यूझीलंडकडून प्रतिकार होईल - इशांत शर्मा
वेलिंग्टन, ४ एप्रिल/वृत्तसंस्था

तिसऱ्या कसोटीवर सध्या आमचे वर्चस्व दिसत असले तरी दुसऱ्या डावात यजमान न्यूझीलंड संघाकडून प्रखर प्रतिकार होण्याची शक्यता आम्ही गृहित धरलेली आहे, असे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने आज सांगितले. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इशांत म्हणाला की, सध्या तरी सामन्यावर आमचेच वर्चस्व आहे. या स्थितीचा फायदा घेऊन आम्ही जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. मात्र क्रिकेट हा इतका सरळ खेळ नाही. या खेळात पारडे केव्हाही फिरू शकते. घरच्या खेळपट्टीवर यजमान दुसऱ्या डावात चांगली झुंज देण्याची शक्यता आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संभाव्य ३० खेळाडूंची यादी जाहीर
अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर या
मुंबईकरांचा समावेश मुंबई, ४ मार्च/ क्री. प्र.

इंग्लंडमध्ये जूनपासून रंगणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संभाव्य तीस खेळाडूंची यादी आज भारतीय निवड समितीने जाहीर केली असून दक्षिण आफ्रिके तील पहिल्या ट्वेन्टी-२० विश्चषकामध्ये भारतासाठी ‘लकी मॅस्कॉट’ ठरलेल्या जोगिंदर शर्माला या संघातून वगळण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पहिल्या विश्वचषकामध्ये सहभागी झालेल्या एस. श्रीशांत, पियूष चावला आणि अजित आगरकर यांनाही वगळण्यात आलेले आहे. तर अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर या तीन मुंबईकरांना या संघात स्थान देण्यात आलेले आहे.

झहीरने केले नामोहरम - टेलर
वेलिंग्टन, ४ एप्रिल/वृत्तसंस्था

झहीर खानने आपल्या अनुभवाचा वापर करून आम्हाला संपूर्णपणे नामोहरम केले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलर याने व्यक्त केली आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना टेलर म्हणाला की, झहीरने आज दिवसभर छोटय़ा रनअपने गोलंदाजी केली. त्याचा परिणाम त्याची गोलंदाजी भेदक होण्यात झाला. त्याच्या गोलंदाजीपुढे आम्ही टिकाव धरूच शकलो नाही.

पहिली लढत नवोदित इजिप्तशी
अझलन शाह हॉकी
इपोह, ४ एप्रिल/पीटीआय
अझलन शाह हॉकी स्पर्धेत पुन्हा विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या भारताची आजच्या लढतीत नवोदित इजिप्त संघाशी गाठ पडणार असून या लढतीत भारताचे पारडे जड राहील अशी अपेक्षा आहे. गतवर्षी ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रता फेरीतच पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर भारताने नंतरच्या काही स्पर्धामध्ये समाधानकारक यश मिळविले आहे. चंडीगढ येथे झालेल्या पंजाब सुवर्णचषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने उपविजेतेपद मिळविले होते.

फ्लिन्टॉफच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंग्लंडने मालिका जिंकली
सेंट लुशिया, ४ मार्च/ पीटीआय

अंतिम सामन्यात अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफने हॅट्ट्रिकसहीत काढलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा २६ धावांनी पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली आहे. फलंदाजीमध्ये लौकाकाला साजेशी कामगिरी करता आलेली नसली तरी गोलंदाजीमध्ये भरीव कामगिरी करीत फ्लिन्टॉफ इंग्लंडसाठी ‘मॅचविनर’ ठरला. या मालिकेत सर्वाधिक २०४ धावा करणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसला मालिकावीराचा तर अंतिम सामन्यात मोलाचा वाटा उलणाऱ्या अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मायकेल हसी सामन्यात सर्वोत्तम; ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
मायकेल हसीचे दमदार अर्धशतक फिरकीपटू नाथन हॉरित्झचे चार बळी
दरबान, ४ एप्रिल / वृत्तसंस्था
येथील पहिल्या (दिवस / रात्र) एकदिवसीय लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर १४१ धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २८६ अशी मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार स्मिथ ५२ व हर्षल गिब्स (३३) यांच्या दमदार फलंदाजीमुळे यजमान दक्षिण आफ्रिकेने आश्वासक सुरुवात केली होती. मात्र या दोघांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर सपशेल शरणांगती पत्करली आणि त्यांचा डाव केवळ १४५ धावांतच आटोपला.

सानियाचे आव्हान संपुष्टात
मयामी टेनिस स्पर्धा
मयामी, ४ मार्च/ पीटीआय

भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा आणि तिची तैवानची सहकारी चिआ जंग-चॉंग यांचे मयामी मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून त्यांचा दुहेरीच्या उपान्त्य फेरीत तिसऱ्या मानांकित लिसा रेमन्ड आणि वेटा पेश्के यांनी ७-६ (७-५), ६-४ असा पराभव केला.
पहिल्या सेटमध्ये सानिया-चॉंग जोडीने रेमन्ड-पेश्के जोडीला चांगलीच झुंज देत ६-६ अशी बरोबरी साधली. पण त्यानंतर खेळविण्यात आलेल्या ट्राय ब्रेकरमध्ये ५-५ अशी बरोबरी झाल्यानंतर मात्र रेमन्ड-पेश्के जोडीने सलग दोन गुणांची कमाई करत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सानिया-चॉंग जोडीच्या आक्रमणात धार दिसली नाही आणि त्यांना सामना गमवावा लागला.

फेडररला पराभवाचा धक्का
दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररला सर्बियाच्या तिसऱ्या मानांकित नोवाक जोकोविकने पराभूत करून सार्वानाच मोठा धक्का दिला आहे. स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत जोकोविने फेडररवर ३-६, ६-२, ६-३ असा संघर्षपूर्ण विजय साकारीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच फेडरर सामना जिंकणार अशी भाकीत वर्तवली जात होती. पहिला सेट जिंकल्यावर तर जोकोविकचा सरळ सेटमध्ये पराभव होईल असे साऱ्यांना वाटत होते. पण त्यानंतर जोकोविकने सर्वस्व पणाला लावत दुसरा आणि तिसरा सेट सहज जिंकत फेडररवर विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.त्याचा अंतिम फेरीत सामना अ‍ॅन्डी मरेशी होणार आहे.

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी राहुल आवारेची निवड
५५ किलो वजनी गटात प्रतिनिधीत्व करणार
पुणे, ४ एप्रिल/प्रतिनिधी

थायलंडमध्ये होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात पुण्याच्या राहुल आवारे याची निवड झाली आहे. तो ५५ किलो वजनी गटात प्रतिनिधीत्व करणार आहे.
सोनीपत येथे नुकतीच भारतीय संघाची निवड चाचणी स्पर्धा झाली त्यामध्ये राहुलने विनोदकुमार (हरियाना) व अनिलकुमार (रेल्वे) यांच्यावर मात करीत भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. राहुल गोकुळ वस्ताद तालमीत रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. राहुल याने आजपर्यंत आशियाई कॅडेट स्पर्धा, राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा व कैरो येथील आंतरराष्ट्रीय अ‍ॅलेक्झांड्रिया स्पर्धा आदी स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.

गोरेगाव जिमखान्यातर्फे उन्हाळी क्रीडा शिबीर
मुंबई, ४ मार्च/ क्री. प्र.
गोरेगाव जिमखान्यातर्फे तरूण मुलां-मुलींसाठी विविध क्रीडा शिबीराचे आयोजन १३ एप्रिलपासून करण्यात आले आहे. या शिबीरात टेबलटेनिस, बुद्धिबळ, जिमनॅस्टीक, मल्लखांब, कराटे या खेळांचा समावेश करण्यात आले आहे. हे शिबीर २३ मे पर्यंत चालणार असून अधिक माहितीसाठी २६८६२५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.