Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गोविंद नारायण जोशी (१९०९-१९९४) हे मूळचे विदर्भातले, खामगावचे. यंदा त्यांची जन्मशताब्दी. त्यानिमित्तानं त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा घेणं समयोचित ठरावं. जी. एन. जोशी म्हणूनच ते ओळखले जात. पुणे व नागपूर इथं शिकून बी.ए. आणि एल.एल.बी. होऊन ते मुंबईस आले. वकिली सोडून संगीताच्या क्षेत्रात रमले. शिकत असतानाच नाटकांतून कामं करण्याची मोठीच हौस त्यांना होती! गाण्याची आवड व तालीम लहानपणापासूनच मिळालेली होती. विदर्भातल्याच मेहेकर येथील ना. घ. देशपांडे यांनी सप्टेंबर १९२९ मध्ये ‘शीळ’ ही कविता लिहिली. पारंपरिक चालीमध्ये जी. एन. जोशी आपल्या जलशात, गाण्याच्या कार्यक्रमात ती म्हणत असत. रेडिओवरही

 

गात असत. एका बैठकीत ग्रामोफोन कंपनीच्या रमाकांत रूपजी यांनी हे काव्यगायन ऐकलं व ध्वनिमुद्रणासाठी आमंत्रण दिलं. दोन गाणी मुद्रित करायची असं ठरलं होतं. दुपारी चार वाजता सुरू झालेलं ध्वनिमुद्रण पहाटे चारला संपलं व आठ गाणी झाली.
‘शीळ’ गाणं १९३१ पासून घरोघरी जाऊन पोहोचलं. जी. एन. जोशी या एका गाण्यामुळे लोकप्रिय झाले. ग्रामोफोन कंपनीनं त्यांना मानानं नोकरी दिली. पुढे त्यांनी अनेक गाणी केली. शास्त्रीय, सुगम व भावगीतांच्या पन्नासेक ध्वनिमुद्रिका (शंभर गाणी) त्यांनी १९४०-४५ पर्यंत केल्या. रेकॉर्ड लेबलवरती ‘जी. एन. जोशी, बी.ए.एल.एल. बी.’ असं छापलेलं आढळायचं.
काळाच्या ओघात त्यांच्यातला गायक मागं पडत गेला व एक कार्यक्षम अधिकारी या नात्यानं त्यांनी एच. एम. व्ही. कंपनीत १९७० पर्यंत फार मोलाची कामगिरी बजावली. सुरुवातीला लाखेच्या तबकडय़ांवर व पुढे प्लास्टिकच्या एल.पी./ई.पी. रेकॉर्डसवर त्यांनी अनेकांची ध्वनिमुद्रणं केली. त्या अनुभवांचं एक पुस्तक ‘स्वरगंगेच्या तीरी’ लिहिलं. त्याचं इंग्रजी रूपांतर ‘डाऊन मेलडी लेन’ही प्रकाशित झालं. शास्त्रीय व सुगम संगीतातल्या बुजुर्ग गायक/ गायिकांची बरीच गाणी आज आपण ऐकू शकतो, पण त्यामागे जी. एन. जोशी यांची चिकाटी, कलाकारांची केलेली मनधरणी व ठेवलेली बडदास्त कारणीभूत आहे. तीन-साडेतीन मिनिटात काय गायचं असा प्रश्न गवयांना पडे. पण कलावंतांच्या कलाकलानं घेऊन त्यांनी गाणी मिळवलीच. कुंदनलाल सायगल, उस्ताद बडे गुलाम अली खॉँ यांच्याशी गप्पा मारत, त्यांचे कंपनीच्या शिस्तीत न बसणारे षौक पुरवीत, त्यांच्याही नकळत त्यांनी ध्वनिमुद्रणं केली. केसरबाईंसारख्या कडक गायिकेचा रोषही सहन केला, पण त्यांच्याकडून ‘स्वर-शिल्प’ म्हणावीत अशी गाणी करून घेतली. त्यातली ‘जात कहां हो’ ही भैरवी होरी व्हायेजर या अंतरिक्ष यानाबरोबर १९७७ मध्ये अवकाशात पाठविण्यात आलेली आहे.
उस्ताद अमीर खॉँ यांना राजी करून लॉँग प्ले रेकॉर्ड त्यांनी केली, तर बापूराव पलुस्कर यांच्या अकाली निधनानंतर अगोदरच करून ठेवलेल्या सहा मिनिटांच्या मुद्रणावरून ‘श्री’ रागाची अठरा मिनिटांची एल.पी. त्यांनी केली. भीमसेन जोशी तर त्यांचे खास लाडके. त्यामुळे त्यांच्या पुष्कळ ध्वनिमुद्रिका केल्या. शिवाय कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सिद्धेश्वरी देवी, रसूलनबाई, लक्ष्मीशंकर यांच्या रेकॉर्ड्स बनवल्या तर मोगुबाई कुर्डीकर, बापूराव पेंढारकर, बालगंधर्व, मा. कृष्णराव, सवाई गंधर्व यांच्या निवडक ध्वनिमुद्रिका त्यांनी एल.पी.वर पुन्हा वितरित केल्या. वाद्यसंगीतात पं. राम नारायण, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, रवीशंकर, अली अकबर खॉँ, व्ही.जी. जोग व बिस्मिल्लाखॉँ यांच्या एकल व युगल वादनाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी केल्या. या एल.पी. रेकॉर्डसच्या वेष्टनांवरची माहिती अभ्यासपूर्ण असे.
जी. एन. जोशींच्या पुढाकाराने महर्षी धोंडो केशव कर्वे, वामन मल्हार जोशी, प्रो. ना. सी. फडके यांच्या आवाजातले संदेश व भाषणे, तर कवी गिरीश, यशवंत, सोपानदेव चौधरी व बा. भ. बोरकर यांच्या आवाजातलं काव्यगायन मुद्रित झालेलं आहे. माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांचा दारूबंदीवरील संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजातली बुद्धप्रार्थना व संदेश, नकलाकार भोंडे यांनी केलेली लोकमान्य टिळकांच्या भाषणाची नक्कल, पं. मदनमोहन मालवीय, सरोजिनी नायडू यांनी भाषणे, नामवंत नटसंचातल्या सौभद्र, कुलवधू नाटकांच्या संपादित ध्वनिमुद्रिका संच, विख्यात ज्योतिषी लाडोबा म्हापणकर यांचं भविष्यकथन ही सारी जी. एन. जोशी यांनी कंपनीचे अधिकारी या नात्याने बजावलेली कामगिरी आहे.
१९३५ च्या सुमारास त्यांच्या आवाजातल्या ध्वनिमुद्रिका बाजारात आल्या. सप्टेंबर १९३५ च्या प्रसिद्धी पुस्तिकेवर त्यांचं छायाचित्र छापलेलं आहे. तो काळ भावगीत गायनाच्या बहराचा होता. भावगीत गायनाच्या सुरुवातीला नाटय़संगीताचा बराच प्रभाव चालींवरती होता. नाटकात, बोलपटात काम करणारीच मंडळी यात असल्यानं हे साहजिकच होतं. पुरुष गायकच सुरुवातीला अधिक होते. नामवंत कवींच्या कविता मुद्रित होत असत. ‘जाहल्या तिन्हीसांजा - फुलवात’ व ‘आकाशीच्या अंतराळी-अंगाई’ या ए.आर. देशपांडे यांच्या दोन कविता जी.एन. जोशींच्या आवाजात एका ध्वनिमुद्रिकेत पाठपोट वितरीत झाल्या. सोबत कवितेची पुस्तिकाही होती. स.अ. शुक्ल, माधव ज्युलियन यांच्या कविता चाली लावून त्यांनी मुद्रित केल्या. त्या अफाट खपल्या. गंगुबाई हनगळ, सरोज बोरकर यांच्याबरोबर ते द्वंद्वगीतं पण गायले. त्यांचा आवाज गोड, स्वच्छ व मोकळा होता. मध्यलयीत गाऊन हळुवारपणे कवितेतला भाव व आशय ते नेमकेपणानं मांडत असत.
जी. एन. जोशी यांची काही गाजलेली गाणी- ‘डोळे हे जुल्मी गडे’, ‘प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी’, ‘आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला’, ‘फार नको वाकू, जरी उंच बांधा’, ‘गोरी धीरे चलो’, ‘जाके मथुरा या कान्हाने’, ‘ऐकव तव मधु बोल’, ‘अशी घाल गळां मिठी बाळा’, ‘नदीकिनारी’ व अगदी शेवटी मुद्रित केलेलं तालविरहित गाणं - ‘एकत्र गुंफूनी जीवित धागे’.
‘स्वरगंगेच्या तीरी’ या पुस्तकात त्यांच्या गाजलेल्या पहिल्याच ‘शीळ’ गाण्याविषयी पहिलंच प्रकरण आहे. हे एक ग्रामीण प्रेमीजीवांचं प्रणयगीत आहे. खेडय़ातलं वातावरण हूबेहूब उभं केलं आहे. शहरी व ग्रामीण भागातल्या लोकांना हे गीत खूपच आवडलं. इतक्या प्रांजळपणानं ग्रामीण भागातील तरुणीनं प्रथमच आपली प्रेमभावना कवितेमधून व्यक्त केली असावी. गमतीची गोष्ट म्हणजे हे गाणं स्त्रीच्या आवाजात मुद्रित व्हायला हवं होतं, पण झालं मात्र पुरुषाच्या आवाजात! अर्थात स्त्रियांच्या भूमिका पुरुषांनीच करायच्या त्या काळात हे कुणाला खटकलंसुद्धा नाही. आज जी. एन. जोशींची गाणी भूतकाळात गेली असली, तरी निवडक गाणी वीसेक वर्षांपूर्वी ध्वनिफीतीवर वितरित झाली होती. जन्मशताब्दीच्या वर्षी ती पुन्हा एकदा सी.डी.वर वितरीत होत आहेत.
डॉ. सुरेश चांदवणकर
(मानद सचिव, ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’)
chandvankar@yahoo.com

‘रानारानात गेली बाई शीळ’
रानारानांत गेली बाई शीळ!
राया, तुला रे, काळयेळ नाही,
राया, तुला रे, ताळमेळ नाही,
थोर राया, तुझं रे कुळशीळ,
रानारानांत गेली बाई शीळ.. १

येडय़ावानी फिरे रानोवना,
जसा काहीं ग मोहन कान्हा,
हांसे जसा ग, राम घननीळ,
रानारानांत गेली बाई शीळ..२

वाहे झरा ग झुळझुळवाणी,
तिथं वारयाची गोड गोड गाणी,
तिथं राया तुं उभा असशील,
रानारानांत गेली बाई शीळ..३

तिथं रायाचे पिकले मळे,
वर आकाश शोभे निळे,
शरदाच्या ढगाचि त्याला झील,
रानारानांत गेली बाई शीळ..४

गेले धावून सोडून सुगी,
दूर राहून राहिली उगी,
शोभे रायाच्या गालावर तीळ,
रानारानांत गेली बाई शीळ..५

रानिं राया जसा फुलावाणी,
रानिं फुलेन मी फुलराणी,
बाई, सुवास रानिं भरतील,
रानारानांत गेली बाई शीळ..६

फिरू गळ्यात घालुन गळा,
मग घुमव मोहन शीळा,
रानिं कोकिळ सुर धरतील,
रानारानांत गेली बाई शीळ..७
कवि : ना. घ. देशपांडे