Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सोमवारी मध्यरात्री माझा फोन वाजला आणि बंद झाला. स्टार न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी एवढय़ा रात्री फोन का केला असेल, याचा मी विचारच करत होते. कारण स्टार न्यूज सोडून वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला होता. असेल एखादीBreaking News आणि फोन एका चपळगावकराऐवजी दुसऱ्यालाही केला असेल असा विचार करून सवयीनुसार टी. व्ही. लावला, पण काहीच नव्हतं.
तेवढय़ात पुन्हा फोन वाजला. फोनवर ‘स्टार माझा’चे राजीव खांडेकर होते. म्हणाले, ‘भक्ती, एक वाईट बातमी आहे. व्यंकटेश एका बातमीसाठी सोलापूरला जात होता, त्याच्या गाडीला अ‍ॅक्सिडेंट झालाय. तो त्यात गेला.’ मी बधीर झाले. व्यंकटेशचा मृत्यू.. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न स्वत:लाच विचारत होते. त्याच वेळी राजीव म्हणाले, ‘त्याच्या घरच्यांना अपघाताबद्दल माहिती आहे, पण तो गेलाय हे माहीत नाहीये, त्यांना, विशेषत: त्याच्या बायकोला, हे कसं सांगायचं?’ मी म्हटलं, मी इतरांशी बोलते, पण रूपाशी बोलायची माझी हिम्मत नाही. ते मी प्रतिभा चंद्रन (सहाराची पुणे प्रतिनिधी) ला सांगते.
मी प्रतिभाला फोन लावला. तर ती रडत होती, म्हणाली, ‘‘भक्ती, I am with him. I am the

 

First one to see him dead.'' त्यानंतरची रात्र फक्त फोन कॉल्समध्ये गेली. नातेवाईक, पत्रकार मित्र एकमेकांना फोन करत होते. बातमीवर विश्वास ठेवायला कोणीच तयार नव्हतं.
व्यंकटेशला मी नावानं कधीच हाक मारली नाही. तो आमच्यासाठी नेहमीच ‘पिनू’ होता आणि त्याचा जुळा भाऊ ‘मिनू.’ स्टारमध्ये आम्ही दोघंही कामाला होतो. तिथं कार्यालयात त्याच्याशी बोलताना किंवा त्याचा उल्लेख करताना ‘व्यंकटेश’ म्हणताना विचित्रच वाटायचं.
मी फार थोडा काळ आमच्या मूळ गावी, बीडला घालवलाय. माझे वडील वकिलीसाठी आधी मुंबई हायकोर्टात आणि नंतर औरंगाबाद खंडपीठात होते, तर काका जिल्हा न्यायाधीश असल्यानं सतत बदलीवर. बीडच्या घराचा मोठा भाग रिकामा होता. तिथं आमचे एक चुलत काका पद्माकर चपळगावकर आजी-आजोबांच्या सोबतीला आले आणि कित्येक र्वष राह्य़ले. त्यांची मुलं सारंग, संगीता, पिनू-मिनू, वैशाली आमचे उन्हाळ्याच्या सुटीतले सवंगडी बनले. पिनू-मिनू माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे आणि वागायला अत्यंत खोडकर. त्यांचे व्रात्य उद्योग आम्ही अचंबित होऊन बघत असू. आमच्या बीडच्या बागेत कैऱ्या, सीताफळं, बोरं आणि पेरूची झाडं होती. फळं तोडण्यात त्यांचा पहिला नंबर असे. उन्हाळ्याच्या सुट्टीतलं आणखी एक आकर्षण म्हणजे दुपारच्या उन्हात नंदलाल आइस्क्रीमवाल्याचं आइस्क्रीम खाणं. आम्ही सर्व मुलं, वाडय़ाच्या पायऱ्यांवर बसून आइस्क्रीम खायचो. त्यातही इतरांचं आइस्क्रीम पळवण्यात ही दोघं पटाईत.
पुढं पिनूतला व्रात्य स्वभाव कायम राहिला, पण काहीतरी करून दाखवायचंच या वेडानं झपाटला. तो कॅलिग्राफी शिकला, त्यानं बनवलेली कार्ड आणि त्याची पत्रं आम्ही जपून ठेवू लागलो. त्यातूनच त्यानं स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. त्याचं घर आधीच छोटं, आता त्यात सगळीकडे रंगांचे डबे आणि एक भलं मोठं टेबल दिसू लागलं. याच काळात तो उजव्या विचासरणीचा बनला. आमच्या घरात समाजवादी वातावरण असल्यानं, त्याच्याशी वादविवाद व्हायचे. पण आज आठवतात ते बीडच्या आसपास कंकालेश्वर, खजाना बावडी, खंडेश्वरी या ठिकाणी केलेल्या पिकनिक्समधले हास्यविनोद. आम्ही नातवंडं आमच्या आजी-आजोबांना उन्हाळ्याच्या सुटय़ांत भेटत असू, पण पिनू आणि त्याची भावंडं सतत आजी-आजोबांजवळ होती.
याच काळात बीडमध्ये ‘निखारे’ नावाचा सिनेमा काढण्यात आला. पिनूच्या भावानं, मिनूनं त्यात छोटी भूमिका केली. सिनेमा आपटला, पण मिनूला चंदेरी दुनियेनं वेड लावलं, ते कायमचं. व्यंकटेशनं मात्र आपला मार्ग पूर्णपणे वेगळा केला. बीडमधून ‘मटा’साठी त्यानं बातम्या पाठवायला सुरुवात केली आणि कालांतरानं ‘लोकसत्ता’ जॉइन केला. करिअर पत्रकारितेतच करायचं हे त्यानं ठरवलं. तो पुणे लोकसत्तात काम करत असताना मी पुण्यात पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेत होते. इथं आम्ही पुन्हा भेटलो. यावेळी मला त्याच्यावर माझ्या बाबांचा खूप प्रभाव जाणवला. बाबांना सगळे नाना म्हणतात. पिनू म्हणायचा, ‘‘सगळे मला विचारतात नाना काका माझे सख्खे काका आहेत का, मी सांगतो, हो कारण ते मला तेवढेच जवळचे आहेत.’’ मी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मुंबईला आले आणि त्यानं नोकरी करता करता पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं ठरवलं. याच काळात रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये त्याला रूपा भेटली.
गेली सहा र्वष आम्ही एकाच कंपनीत काम केलं. कित्येक assignments बरोबर केल्या. पुण्याची काहीही बातमी असली, तर तिथं जायला उत्साह असायचा, कारण आमची ‘चपळगावकर टीम’ होती. आम्ही नेहमी विनोदानं म्हणयचो की साध्या मराठी शब्दांचा उच्चार न करणारी ही हिंदी मंडळी. यांना आम्ही ‘चपळगावकर’सारखं अवघड आडनाव उच्चारायला शिकवलं. पंढरपूरची यात्रा हा फक्त धार्मिक उत्सव नाही, त्याला शेकडो वर्षांचा सामाजिक इतिहास आहे, ही गोष्ट आमच्या हिंदी बॉसेसना पटवण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वीही झालो. पुढे ‘स्टार माझा’ सुरू झालं आणि व्यंकटेशला काम करायला मोकळं आकाश मिळालं. पुण्यातल्याच नाही तर संपूर्ण राज्यातल्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक बातम्या त्यानं न थकता लोकांपर्यंत पोचवल्या. विषयाची सखोल माहिती घेऊन वार्ताकन करणं हे त्याचं वैशिष्टय़. मग ती बातमी संरक्षणविषयक असो वा कायदेविषयक किंवा राजकीय. यंदाची निवडणूक आल्यावर त्यानं पुन्हा जोमानं काम सुरू केलं होतं.
पण मला त्याचा प्रचंड राग आलाय. रात्री प्रवास करायची त्याला काय घाई होती, बाबा आज आमच्याबरोबर थांबा, जाऊ नका या त्याच्या लहानग्यांच्या हट्टाकडं त्यानं का पाठ फिरवली.. हे आणि असे अनेक प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं मलाच माहीत आहेत. हा प्रवास त्याच्या व्यवसायाचा अपरिहार्य भाग होता का, तो टाळता आला असता का? या प्रश्नाला हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं आहेत. मी काही काळ टीव्ही रिपोर्टिंगपासून दूर राहायचं ठरवल्यावर वेंकी म्हणाला होता, पुन्हा काम सुरू करशील, तेव्हा धडाक्यात सुरू कर. पण venky आता मी काही केलं तरी, आपली ‘चपळगावकर टीम’ बनू शकणार नाही. ती फुटलीय कायमचीच.
भक्ती चपळगावकर