Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजा डेव्हिड याने आजूबाजूच्या प्रदेशातील शत्रूंचा पूर्णपणे बीमोड केला आणि इस्राएली लोकांचे एक विशाल संघराज्य बनविले. त्याने जेरूसलेमला आपली राजधानी स्थापन केली आणि भव्य राजवाडा बांधला. त्याला देवासाठी महान मंदिर उभारायचे होते, परंतु देवाने त्याला संदेश देऊन मंदिर न बांधण्याचा आदेश दिला. कारण राजाच्या हातून व्यभिचाराचे आणि सदोष मनुष्यवधाचे पाप झाले होते. भ्रष्टाचारी आणि अनाचारी मनुष्य मंदिर बांधू शकत नाही आणि बांधले तर देव त्याच्यात वस्ती करीत नाही.
डेव्हिडनंतर त्याचा मुलगा सॉलोमन सत्तेवर आला. तो इस्राएलचा सुवर्णकाळ होता. राजाने प्रशस्त

 

मंदिर बांधण्याचा संकल्प केला. त्यासाठी देशोदेशीचे कलाकार आणि कामगार यांना त्याने पाचारण केले. या मंदिरासाठी भारतातून सोने नेले होते असा एक समज आहे. मंदिराच्या बांधणीसाठी ४६ वर्षे लागली. त्या काळातील ते जगातील एक आश्चर्य मानले जात होते. जगभर विखुरलेल्या ज्यू लोकांच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्याचे ते एकमेव जागतिक केंद्र होते. त्यामुळे ते त्यांच्या अस्मितेचे प्रतीक झाले होते.
इ. स. पू. ५९७ मध्ये बॅबिलोनचा राजा नबुखदनेस्सर याने जेरूसलेम शहर जिंकले आणि मंदिर उद्ध्वस्त केले. इस्राएलच्या प्रतिष्ठेला झालेली ती जिव्हारी जखम होती. इस्राएली लोकांना युद्धकैदी म्हणून बॅबिलोन येथे नेण्यात आले. इ. स. पूर्व ५३८ मध्ये पर्शियन राजा सायरस याने ज्यू लोकांना मायदेशी जाण्यास मुभा दिली. परत आलेल्या लोकांनी एज्रा आणि नेहेम्या यांच्या मार्गदर्शनाखाली इ. स. पूर्व ५३७ मध्ये जेरूसलेमच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हळूहळू याजक वर्गानी मंदिराचा ताबा घेतला. कर्मकांडाचे स्तोम वाढत गेले.
जेरूसलेमच्या मंदिराची रचना समजून घेणे आवश्यक आहे. मंदिरामध्ये अती पवित्र (Holy of Holies) नावाचा एक कक्ष होता. तेथे देवाचे वास्तव्य आहे, असा लोकांचा विश्वास होता. फक्त महायाजक वर्षांतून एकदाच त्या अंधाऱ्या खोलीत प्रवेश करीत असे. तो त्याचा विशेषाधिकार होता. पवित्र कक्षासमोर वेदी होती. त्या वेदीवर पासोव्हर सणावेळी सुमारे अडीच लाख कोकरांचे आणि मेंढरांचे बळी दिले जात होते. वेदीवरून रक्ताचे पाट वाहात असत. अर्पण केलेल्या जनावरांच्या मांसाचा काही हिस्सा सरळ याजकांच्या घरी जात असे. मांसाचे वाटप करताना प्रसंगी प्रकरण हातघाईवर येई. धर्मक्षेत्रात चाललेल्या भ्रष्ट व्यवहाराला सामान्य लोक विरोध करू शकले नाहीत; परंतु इस्राएलमध्ये संदेष्टे (prophet) नावाचा एक विद्रोही गट होता. त्यांचा धर्मसत्तेवर आणि राजसत्तेवर वचक होता. देशाच्या विवेकाचे ते रखवालदार होते. ते एकांडे शिलेदार होते. प्रसंगी जीव धोक्यात घालून त्यांनी भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिले. ‘राजा, तू चुकतो आहेस,’ असे सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती. समाजाला अधोगतीपासून वाचविण्यासाठी स्पष्टवक्ता संदेष्टय़ांची गरज असते. ज्या समाजात परखड भूमिका घेणाऱ्यांचा दुष्काळ असतो, तो समाज रसातळाला जाण्यास फारसा वेळ लागत नसतो. नागडा राजा लाचारांवर राज्य करीत असतो आणि आत्मा विकलेले जागोजागींचे दलाल जहागीरदार बनत असतात.
एक धार्मिक ज्यू म्हणून येशू जेरूसलेमच्या मंदिराला भेट देत असे. तिथे धर्माच्या नावाने चाललेले देण्या-घेण्याचे व्यवहार आणि कर्मकांडांचा अतिरेक त्याच्या नजरेतून सुटला नाही. तो उघड भ्रष्टाचार पाहून त्याला मनस्वी वाईट वाटत होते; परंतु तो योग्य वेळेची वाट पाहात होता.
येशूने वयाच्या तिसाव्या वर्षी सार्वजनिक कार्याला प्रारंभ केला. त्याच्या कार्यारंभाचे वर्णन चारही शुभवर्तमानकारांनी निरनिराळ्या प्रकारे केले आहे. जॉनच्या शुभवर्तमानानुसार, येशूने गॅलिलीमधील काना गावी लग्नप्रसंगी पाण्याचा द्राक्षारस केला आणि त्यानंतर त्याने जेरूसलेमच्या मंदिराला भेट दिली. त्यावेळी ज्यू लोक पासोव्हरचा सण साजरा करीत होते. या वार्षिक सोहळ्यानिमित्ताने देशापरदेशातून हजारो यात्रिक जेरुसलेमला जमले होते. मंदिराचा सगळा परिसर माणसांनी फुलून गेला होता.
मंदिर ज्यूंचे होते, तरी अन्य धर्मीय लोकही यात्रेसाठी येत असत. त्यांच्यात व्यापाऱ्यांचा मोठा भरणा होता. या अन्यधर्मीयांना ज्यूंच्या मंदिरात प्रवेश नव्हता. त्यांच्यासाठी बाहेरच्या आवारात बैठक व्यवस्था केलेली होती. याच ठिकाणी देण्याघेण्याचे व्यवहारही होत असत. बळीसाठी आणि अर्पणासाठी आणलेली जनावरे आणि पक्ष्यांचे पिंजरे यांची एकच गर्दी तिथे झाली होती. कोकरामेंढरांच्या बेंबाटण्याने धार्मिक वातावरणाला हरताळ फासला गेला होता. आवारामध्ये चलन अदलाबदलीचा घृणास्पद प्रकारही सुरू होता. देवदेवतांच्या किंवा राजांच्या प्रतिमा असलेली नाणी ज्यू लोक स्वीकारत नव्हते, कारण त्यांच्या लेखी तो मूर्तिपूजेचा एक भाग होता. त्यामुळे पॅलेस्टाईनबाहेरून येणाऱ्या ज्यूंना आणि अन्य लोकांना स्थानिक चलन विकत घेणे आवश्यक होते. या व्यवहारात यात्रेकरूंची मोठय़ा प्रमाणावर लूट होत होती. थोडक्यात, देवाचे मंदिर हे भ्रष्टाचाराचे आणि शोषणाचे केंद्र झाले होते. त्यामुळे मंदिराच्या आवारातील व्यापारामुळे पावित्र्यभंग होत आहे याची जाणीव असूनही, याचकवर्ग आणि धर्मसभा त्याकडे कानाडोळा करीत होती.
याआधी येशूने मंदिराची यात्रा केली होती परंतु एक भाविक म्हणून परंतु आता तो ‘मशिहा’ म्हणून आला होता. पहिले दोन दिवस त्याने संपूर्ण मंदिराचा आढावा घेतला. तिसऱ्या दिवशी त्याने मंदिरात प्रवेश केला. परमेश्वराने सर्व मानवांना दिलेली मूलभूत समानता त्याला पुन्हा प्रस्थापित करायची होती. त्याने क्षणभर डोळे मिटले. मेघ भरून यावेत आणि प्रचंड गडगडाट व्हावा तसा तो गरजला, ‘‘माझ्या परमपित्याचे हे मंदिर आहे परंतु तुम्ही ती लुटारूंची गुहा करून टाकली आहे,’’ असे बोलून हातातील चाबूक गरगर फिरवीत तो व्यापाऱ्यांच्या दुकानांवर तुटून पडला. त्याने मुक्त केलेली जनावरे सर्वत्र हुंदडू लागली आणि पक्ष्यांनी किलबिलाट करीत आकाशात उड्डाण केले. मंदिराच्या हजार वर्षांच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते. याजकांना आणि धर्मसभेच्या सदस्यांना ही बातमी समजली. ते आवारात धावले आणि तावातावाने येशूच्या बरोबर वादविवाद करू लागले. त्यांनी त्याला प्रश्न केला, ‘‘हे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे?’’
येशूने त्यांना उत्तर दिले, ‘‘तुम्ही हे मंदिर मोडून टाका. मी ते तीन दिवसांत उभारीन.’’ त्यांनी प्रतिप्रश्न केला, ‘‘हे मंदिर बांधावयास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही ते तीन दिवसांत उभारणार काय?’’
‘‘तुम्ही हे मंदिर मोडा,’’ हे शब्द याजकांना झोंबले. धर्माचे नाते शांतीशी जोडलेले असते, क्रांतीशी नव्हे. क्रांतीमध्ये हिंसेला स्थान असते, म्हणून धर्माने क्रांतीला विरोध केला आहे. मात्र राजरोस अन्याय होत असताना, धर्माने कुठली भूमिका घ्यावी? शोषण करणाऱ्यांनी शांतीचे वातावरण पोषक असते, त्यामुळे अन्याय करणारे धनदांडगे धर्मसंस्थेला असते त्यामुळे ‘धर्म’ आणि ‘अर्थ’ यांची युती होते. जेरुसलेमच्या मंदिरात हाच प्रकार सुरू होता. व्यापारी आणि याजकवर्ग यांच्यात हातमिळवणी झाली होती. त्यांना व्यापाऱ्यांकडून ‘हप्ता’ जात होता. पुन्हा हा सारा प्रकार गुप्तपणे चालला होता. भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेला धर्मच खतपाणी घालत आहे हे येशूने पाहिले. त्यामुळे त्याचे अंत:करण तिळतीळ तुटले आणि योग्य वेळ येताच त्याने आपला तिसरा डोळा उघडला. तसे करणे आवश्यक होते, कारण अन्याय्य परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे त्या अन्यायाला सहमती देणे होय. शोषण होत असताना, शांतीची जपमाळ ओढणे किंवा तटस्थपणाचा आव आणणे हे शिखंडीपणाचे लक्षण आहे. अशा वेळी स्पष्ट भूमिका घ्यावी लागतेच कारण भूमिका न घेणे ही देखील भूमिकाच असते. (Not to take position is to take a position) तिचा लाभ शोषितांना नव्हे, तर शोषणकर्त्यांना होत असतो.
कोकराच्या पायाला काटा लागला तरी कळवळणारा ख्रिस्त करुणेचा सागर होता. त्याच्या हाती चाबूक कसा काय, असा प्रश्न पडतो. मॅथ्यू, मार्क आणि लूक या शुभवर्तमानात मंदिरमुक्तीच्या प्रसंगाचे वर्णन आले आहे. या तिन्ही पुस्तकांचे लेखन इ. स. ६० ते ७० या काळात झाले. त्यात चाबकाचा उल्लेख नाही. जॉनचे शुभवर्तमान इ. स. ९० ते १०० या काळातील आहे. त्यातच चाबकाचा संदर्भ आहे. येशूने माणसांवर प्रहार करण्यासाठी नव्हे तर जनावरांना पिटाळण्यासाठी चाबकाचा वापर केला. मुक्त केलेल्या जनावरांच्या गळ्यातील ते दावे असण्याची शक्यता आहे. त्याने कबुतरांना हातही लावला नाही. त्यांना मोकळे सोडावे अशी त्याने मालकांना विनंती केली. येशूचा रोख व्यापाऱ्यांवर नव्हता तर त्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रबळ अशा धर्मपीठांकडे होता. हे धर्मपीठ समाजाच्या धार्मिकच नव्हे तर संपूर्ण जीवनाचे नियंत्रण करीत होते. मंदिरात ‘सॅन्हेद्रिन’ नावाची सर्वोच्च धर्मसभा होती. ख्रिस्तपूर्व ६५ मध्ये ही सभा अस्तित्वात आली. तिच्यात ७० प्रतिष्ठित ज्यू नागरिकांचा समावेश होता. धर्मनियमांच्या काटेकोर पालनाकडे कडक नजर ठेवणे, दोषी व्यक्तींना धोंडमार करण्यापर्यंतची शिक्षा देणे आदी अधिकार या सभेला होते. (राजसत्ता रोमनांची होती. त्यामुळे देहान्त शासन करण्याचा अधिकार धर्मसभेला नव्हता.) शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी धर्मसभेच्या दिमतीला शिपायांची फौज होती. धर्मसभेचा अधिकार अंतिम आणि निरंकुश होता. रोमन शासनदेखील तिच्यात हस्तक्षेप करू शकत नसे. मंदिराच्या आवारातील बाजार उधळून येशूने धर्मसभेला जाहीर आवाहन दिले! त्याने नागाच्या शेपटीवरच पाय ठेवला होता.
तत्कालीन ज्यू धर्माने माणसांची (आणि जनावरांचीही!) शुद्ध आणि अशुद्ध अशी विभागणी केली होती. त्यांच्या लेखी ज्यू शुद्ध आणि बाकीचे सारे अशुद्ध होते. अशुद्ध मानल्या गेलेल्या लोकांसाठी मंदिरात शेवटची जागा होती. त्याच जागेवर बाजार भरविण्यास संमती देऊन, धर्मसभेने अन्य धर्मीयांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यांच्या बैठकीच्या जागेवरील बाजार उठवून, येशूने सामाजिक समतेचा पुरस्कार केला आणि ज्यू धर्मसत्तेला दुसरा जबर धक्का दिला. ज्यू आणि सॅमॅरिटन ही अब्राहामचीच लेकरे, परंतु त्यांच्यात विस्तव जात नव्हता. त्यांच्या वितुष्टाचे कारण होते मंदिर! जे मंदिर संवादाचे केंद्र असते ते विसंवादाचे कारण झाले होते.
ज्यू लोक स्वत:ला श्रेष्ठ आणि सॅमॅरिटनांना कनिष्ठ समजत होते. येशू स्वत: ज्यू असूनही सॅमॅरिटन लोकांबद्दल त्याच्या काळजात एक कोपरा राखीव होता. एकदा एका सॅमॅरिटन बाईबरोबर येशूची गाठ पडली. तिचे चारित्र्य संशयास्पद होते तरीही येशूने तिच्याशी ब्रह्मचर्चा केली. तिने येशूला प्रश्न केला, ‘‘देवाची उपासना गिरिझीम डोंगरावर करावी की जेरुसलेमच्या मंदिरात करावी?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘बाई, पित्याची उपासना गिरिझीम डोंगरावर किंवा जेरुसलेमच्या मंदिरातही केली जाणार नाही.. खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने परमेश्वर पित्याची उपासना करतील. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. ‘‘(जॉनचे शुभवर्तमान ४:२१-२४) दगडविटांचे मंदिर हे केवळ प्रतीक असते. परमेश्वर प्रतीकापलीकडील आहे. प्रतीक केवळ त्याची उपस्थिती सूचित करीत असते. ज्या ठिकाणी शोषण असते तिथे परमेश्वर अभावानेच असतो. वास्तविक देवाचे खरे निवासस्थान माणसाचे शरीर असते. देह हे देवाच्या उपस्थितीचे सर्वात प्रभावी असे प्रतीक असते. ज्याला देहात देव सापडत नाही त्याला तो अन्यत्र मिळणे दुरापास्त असते.
येशूला राजकीय क्रांतीमध्ये रस नव्हता. लोकांनी त्याला राजा करण्याचा घाट घातला तेव्हा त्याने त्यांची योजना धुडकावून लावली. माणसाची मनोवृत्ती बदलली नाही, त्याच्या मनात साचलेले शतकानुशतकांचे, भेदाभेदांचे अमंगळ जहर निपटून काढले नाही तर सत्तास्थानावरून राव पायउतार झाले आणि पंत चढले तरी काही फरक पडत नाही. म्हणूनच येशूने र्सवकष मानसिक क्रांतीचा आग्रह धरला. या क्रांतीची घोषणा त्याने मंदिरात केली. दुर्दैवाने समतेच्या या संघर्षांत धर्मसभेने त्याला साथ दिली नाही. उलट, तिने त्याचा बळी घेतला आणि समतेच्या लढय़ाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सुळावर असताना येशूने शत्रूंना क्षमा केली आणि आपल्या पुनरुत्थानाने समतेची ध्वजा फडकावली.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
Francisd43@gmail.com