Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

माझे मत आता दुभंगले आहे. पाण्याने भरलेला प्याला मध्यातून दोन भागांत विभागला जावा, तसे वाटते आहे. एका भागात भारत आहे; तर दुसऱ्या भागात मालदीव नावाचा देश. अर्थात पाणीच ते! डचमळते, हलते, इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे होत असते. मालदीव आणि भारत मनातल्या मनात एक दुसऱ्यात मिसळतात, हसतात, खेळतात, बोलतात. मनाच्या या अवस्थेचे नेमके वर्णन करता येत नाही. कारण ती अवस्था स्वत:लाच पूर्णपणे कळत नाही. पण एवढे कळते, की नवी दिल्लीच्या क्षितिजावर मला मालदीवचा सूर्योदय दिसतो, तर कधी कधी मालदीवच्या समुद्रात कुतुबमिनार डोकावताना दिसतो.
विदेश सेवेत दर दोन-तीन वर्षांनी अशी वेळ येते जेव्हा आपण संक्रमणाच्या रेषेवर उभे असल्याचे स्पष्टपणे जाणवते. आताचे पाऊल भारतात, त्यानंतरचे पाऊल विमानात व त्यानंतरचे पुढचे पाऊल नव्या भूमीत, अशी तीन पावलात घडून येणारी पाच स्थित्यंतरं मनावर चित्रांकित आहेत. आता सहाव्या स्थित्यंतरासाठी मी पाऊल उचललेलं आहे. देशाचा प्रतिनिधी म्हणून प्रतिष्ठेच्या पदावर जात असतानासुद्धा प्राण तळमळतोच तळमळतो. माणूस म्हणून आपण किती सहज विरघळतो आणि हे विरघळणे वय वाढलं तरी थांबत नाही ही जाणीव जिवाला अधिकच कावरीबावरी करते.
गेली तीन र्वष दिल्लीच्या मध्यवर्ती खुंटाला बांधलो गेलो होतो. इथे मी काय काय केले याची यादी बरीच लांबलचक आहे. कार्यालयातील काम केले, विचारवंतांबरोबर चर्चा केल्या, खासदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत भारत नावाच्या लोकशाहीच्या प्रयोगाची संसदेतील अंमलबजावणी पाहिली, इंडिया इण्टरनॅशनल सेंटरमधील परिसंवाद, चर्चा, परिषदांना उपस्थिती लावली,
हॅबिटॅट सेंटरमधील चित्रपटमहोत्सव पाहिले, राजधानीतील वेगवेगळ्या सभागृहांमधली अभ्यासक, राजनीतिज्ञ, राजकारणी, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती व इतर अनेकांची भाषणं ऐकली, कॉकटेल पाटर्य़ा, रिसेप्शन, भोजन, विवाह या सभारंभांना उपस्थित राहिलो, देशविदेशातील प्रतिनिधिमंडळांच्या भेटी घेतल्या, नवनवीन मॉल्समधील एसी कॉरिडॉर्समधून चालण्याचा आनंद

 

लुटला, इथले वाढते प्रदूषण आणि गुन्हेगारी यांचा अनुभव घेतला, दिल्लीतील प्रचंड वेगाने वाढणारं कार्यक्षम मेट्रोचं जाळं पाहिलं, त्याच्या बांधकामामुळे होणारी गैरसोय अनुभवली. प्रजासत्ताकदिनाच्या मानवंदना व परेड पाहिल्या, स्वातंत्र्यदिनाची भाषणं ऐकली, जंतरमंतरवरील निदर्शनं पाहिली, प्रगती मैदानावरील प्रदर्शनं पाहिली, पुस्तक प्रकाशनाच्या समारंभांना गेलो आणि कवितांच्या मैफलींनाही गेलो. ‘बदलते विश्व, बदलता भारत’, ‘बदलती दिल्ली’ सर्वाचीच बदलती रूपं दिल्लीतून पाहिली. महाराष्ट्रातून येणारे नेते, कार्यकर्ते, सामान्य माणसं, विद्यार्थी-परीक्षार्थी या सर्वाच्या भेटी घेतल्या. त्यांना दिल्ली म्हणजे काय, निर्णय कसे घेतले जातात, या शहराला कोण चालवतं, नाचवतं पळवतं यांची माहिती दिली. माहिती देता देता माहिती घेतली. दिल्लीच्या मंचावरच्या अनेक प्रकारच्या नटनटय़ांना भेटलो. त्यांचे मुखवटे पाहिले, तसेच सत्यही शोधले.
या ‘सार्वजनिक’ दिल्लीबरोबर स्वत:ची एक ‘खासगी’ अशी दिल्लीही जगलो. लोदी उद्यानात फिरण्याचा आनंद लुटला. दिल्लीतील अनपेक्षित पण घनदाट वृक्षराजीचा आनंद लुटला. नव्या दिल्लीच्या प्रशस्त रस्त्यांवरून गाडी चालविण्याचा व चालण्याचा मजा चाखला. या धकाधकीच्या जीवनातही इथल्या झाडांच्या आणि पक्ष्यांच्या प्रेमात पडलो. मैत्रीचे अनेक जुने धागे पक्के केले आणि नवे धागे जुळविले. महाराष्ट्रातील साहित्य, राजकारण, पत्रकारिता, समाजकारण आणि एकंदरीतच प्रगतीचे अंतरंग तपासून पाहिले. स्वत:चेच नवे आयाम शोधून सत्य, जीवन, कर्तव्य, देशनिष्ठा, प्रेम वगैरे दररोज वापरात येणाऱ्या संकल्पनांचा वेध घेतला. दूरवर पहुडलेल्या माझ्या गावाच्या मनात शिरून समग्र ग्रामपरिवर्तनाच्या नव्या चळवळीचा शुभारंभ केला. आता हे कार्य अंमलबजावणीच्या दिशेने धाऊ लागले आहे. ज्या दिल्लीच्या अंगाखांद्यावर मी आता खेळतो आहे, तिचे देणे काही अंशी परत करण्यासाठी दिल्लीत स्वयंसेवी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक क्षेत्रात योगदान करण्यासाठी या संस्थेची स्थापना आहे. दररोज सकाळी उठताच कितीतरी काम करायचे राहून गेले आणि कितीतरी अजून आपली वाट पाहते आहे, अशी भावना दाटून येते. कदाचित हेच जिवंतपणाचे लक्षण असावे. आता एका नव्या परिवर्तनाच्या चाहुलीने मनात काहुर माजले आहे. गरोदरपणात पोटातले बाळ खोडकरपणा करते, लाथा मारते, नाचते, खेळते, त्या वेळी आईला वाटणारा आनंद कदाचित असाच असावा. माझ्या नव्या येऊ घातलेल्या बाळाचे नाव मालदीव आहे. ते मला आपल्या अनेकविध विभ्रमांनी सळो की पळो करून सोडते आहे. कधी निळाशार समुद्र समोर येतो, कधी छोटय़ा शिडांच्या नावा, कधी विमल मनोहर वाळू तर कधी नृत्यमग्न कोरल, कधी सूर्यास्तात न्हालेली संध्याकाळ, तर कधी सागरावर झुकलेले माड. ‘अरुप घेई रूप इथे आणि निराकार आकार’ असे काहीसे या बाळाबद्दल भाव दाटतात. जीवनात येणारी नवी आव्हानं एका अर्थानं पुरुषालाही आई बनण्याची संधी देतात. मालदीव या नव्या देशाचं आव्हान माझ्या सगळ्या सर्जनशीलतेला मिळालेलं वरदान म्हणून मी पाहतोय. दोन देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध अधिक जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे, अर्थगर्भ, आनंददायी, सुदृढ कसे करता येतील या विचारानेच अंगावर रोमांच उभे राहतात.
मालदीव देशाचे काही तपशील पाहण्यासारखे आहेत. ११९२ बेटं. त्यांची समुद्रसपाटीपासून उंची फारतर सरासरी दीड मीटर. सर्वोच्च ठिकाण समुद्रसपाटीपासून अडीच मीटर उंच. फक्त १९९ बेटांवर मनुष्यवस्ती. लोकसंख्या साडेतीन लाख. लोक मुख्यत: मुस्लीम पण कट्टरता नाही. दरडोई उत्पन्न दक्षिण आशियात सर्वात अधिक. आकर्षक पण महागडी पर्यटन केंद्रं हे महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन. जगातला सर्वात छोटा मुस्लीम देश. भाषा दिवेही. सात लाख पर्यटक प्रतिवर्षी भेट देतात. भारताशी चांगले संबंध. अनेक बाबतीत भारतावर अवलंबून.
पण या देशाचे राष्ट्राध्यक्ष नशीद (वय ४२ वर्षे) यांनी या देशाच्या भवितव्यावर ‘लूजिंग पॅराडाइज’ (नंदनवनाला मुकणे) या नावाचा लेख लिहिला. त्या लेखातील काही वाक्यं ‘‘हा नवा धोका आहे. सर्वनाशाचा.. अस्तित्वाच्या अस्तित्वाचा.. तो शांतपणे, न दिसता, पण निर्दयपणे पाचूच्या क्षितिजावर उभा आहे.. हवामान बदल आणि वाढती समुद्रपातळी माझ्या कार्यालयातून बाहेर पाहताना विश्वास ठेवणं कठीण जातं, की हे दृश्यच एक दिवस गायब होईल..’’
मालदीव हे नंदनवन राष्ट्राध्यक्षांच्या शब्दांत सांगायचं तर ‘उधार घेतलेल्या वेळेवर’ जगत आहे. शास्त्रज्ञांच्या मते ५० ते १०० वर्षांनंतर हा देश दिसणार नाही. अशा देशात जाण्याची आणि देशसेवा करण्याची संधी तीही उच्चायुक्त म्हणून फार सौभाग्याची गोष्ट आहे.
लक्षद्वीप आणि शागोस बेटांना समुद्रातील छोटय़ा-छोटय़ा बेटांनी जोडणाऱ्या प्रदेशात ‘मालदीव’ आहे. भौगोलिक आणि त्यातही जमिनीच्या पोटातील नैसर्गिक अपघातामुळे मालदीवचा जन्म झाला. पृथ्वीच्या (समुद्राच्या) पोटातून हजारो र्वष लाव्हा उसळत राहिला, नंतर तो समुद्राच्या तळावर स्थिर होत गेला; पण दरम्यान तयार झालेले प्रवाळ खंड वरती राहिले, त्यांच्यातूनही ही बेटं आणि हा देश जन्मला. त्यामुळेच अनेक बेटांचे रूप सैलसर वर्तुळांसारखे आहे. मध्ये पाणी आणि चहूबाजूला बेटं. मालदीवचं खरं सौंदर्य म्हणूनच पाण्यावरती नसून पाण्याच्या आत समुद्राच्या पोटात आहे. एक वेगळं जीवनसौंदर्य आणि त्याची प्रयोगशाळा तिथं वाट पाहात्येय.
माणूस म्हणजे काही बेट नव्हे आणि बेट म्हणजे माणूस नव्हे. पण माणसातली ‘बेट’ मानसिकता आणि बेटांमधल्या माणुसकीचा वेध घेण्याची वेळ आली आहे. दिल्लीच्या माझ्या र्निजतुक वातानुकूलित कार्यालयात मालदीवच्या अस्वस्थ करणाऱ्या सौंदर्याचे पडघम ऐकू येऊ लागलेत.
ज्ञानेश्वर मुळे
dmulay@hotmail.com
ता. क.
दिल्लीत काही चांगल्या गोष्टी मागे सोडणार आहे. त्यात ‘षट्कार क्लब’चा समावेश होतो. नोकरी करीत असतानाही महाराष्ट्रासाठी दिल्लीत काही रचनात्मक काम करावे या उद्देशाने माझ्यासह सहा जणांनी (प्रताप भोसले, उन्मेष वाघ, अंकुश चव्हाण, मनोज पांगारकर, गणेश रामदासी) ‘षट्कार’ची स्थापना केली. या वर्षी महाराष्ट्रातून आय. ए. एस.च्या मुलाखतीसाठी येणाऱ्या १२० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, राहण्याची सोय, ‘मॉक’ मुलाखती असे विविध उपक्रम ‘षट्कार’ने आयोजित केले. भालचंद्र मुणगेकरांसह अनेकांनी आपला वेळ दिला. ‘षट्कार’ तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे प्रगती करील, असा एसएमएस मला ‘षट्कार’च्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत आश्वस्त करतो. दिल्लीत महाराष्ट्राची छाप पडावी यासाठी ‘षट्कार’ प्रयत्नशील राहणार आहे.