Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

कोमलतेचा मापदंड!
सुचित्रा साठे

‘ए तू शिरीष वृक्ष पाहिला आहेस का?’
सकाळी ऑफिसला जाताना पाण्याची बाटली पर्समध्ये स्वत:साठी नाही, तर गल्लीतल्या, कांचनवृक्षाला पाणी पाजण्यासाठी ठेवणाऱ्या, आजूबाजूच्या परिसरातील झाडांची ओळख करून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या, सतत शोधक नजरेने निरीक्षण करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने, वैदेही गानूने, माझ्या पुढय़ात प्रश्न उपस्थित केला. प्रश्न फार कठीण होता. ‘नाही’ म्हणायलाही लाज वाटत होती. म्हणून मी हळूच प्रतिप्रश्न केला, ‘कुठे सापडला तुला शिरीष वृक्ष?’

चौथा अंक विंगेतला
भगवान मंडलिक

गेली साठ वर्षे मराठी रंगभूमीवर नाटय़ाभिनयातून विविध कलाविष्कार सादर करणारे कल्याणमधील ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रसिद्ध नेपथ्यकार परशुराम कृष्णाजी उपाख्य तथा बापू लिमये यांनी २१ मार्च रोजी ८१ व्या वर्षांत पदार्पण केले. प्रथम त्यांचे अभीष्टचिंतन. ऐंशी वय म्हणजे बिछान्याला खिळून राहण्याचे दिवस. आराम करण्याचे दिवस. पण गेली साठ वर्षे अंगातील जो चळवळ्या स्वभाव आहे तो स्वस्थ बसू देत नसल्याने बापू लिमये यांनी ८१ व्या वर्षांत पदार्पण करताना रंगभूमीशी निगडित एका अभिनव अशा ‘चौथ्या अंकात’ काम करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

अंबरनाथ पालिकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त..
डॉ. श्रीनिवास द. साठे

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाच्या सर्वागीण विकासाबाबत नव्याने विचार सुरू झाला. त्यात प्राधान्याने शिक्षण, शेती, उद्योग व बेरोजगारी याबाबत निर्णय झाल्याचे लक्षात येते. भाषावार प्रांतरचना निर्मितीबरोबरच त्या राज्यातील शहरीकरणाचा विचार समोर आला. मुंबई शहराच्या आसपासच्या शहरांची वाढ ही अपरिहार्य होती. कारण तेव्हा मुंबईच्या मर्यादित जमिनीचे आणि सौंदर्याचे भान तत्कालीन राज्यकर्त्यांना असावे. म्हणूनच उद्योगीकरण आणि नागरिकीकरण अशा दोन्ही अंगाने ठाणे जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाल्याचे लक्षात येते.१९५५ ला म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत या जिल्ह्यात उद्योगवाढीला प्राधान्य मिळाले. त्यासाठी एका समितीचे गठण होऊन ठाणे, पालघर, वसई, कळवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर या रेल्वेमार्गाचा प्रथम अभ्यास झाला.

कृतार्थ वाटचाल..
अभय जोशी
ठाण्यातील शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष, ‘महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी’चे संस्थापक वसंतराव मराठे यांनी ३० मार्च रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त..
सध्या निवडणुकांचा ज्वर दिवसेंदिवस तासागणिक वाढतो आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींसह एकमेकावर टीकेच्या तोफा डागण्याचे मनसुबे सर्व तमाम राजकीय नेत्यांच्या मनात आखले जात आहेत. राजकारणात तरुण रक्ताला वाव दिला पाहिजे, असा मंत्र जपणारे हे नेते आपल्या वयाची साठी, सत्तरी, ऐंशी वर्षे उलटली तरी सत्ता सोडायला तयार नसतात. सत्तासुंदरी आपल्यालाच खुणावते आहे, असा कायमचा भ्रम त्यांनी आपल्या उराशी जपलेला असतो.

‘चतुरस्र’ दीपिका..
संपदा वागळे

ई टीव्हीवरील ‘स्वरसंग्राम’ या स्पर्धेत ‘लोकप्रिय गायिका’ हा पुरस्कार पटकावणाऱ्या ठाण्याच्या ‘दीपिका चंद्रशेखर भिडे’ या मुलीला खरं तर ‘त्या’ दिवसात टी.व्ही. पाहायलाही फुरसत नव्हती. कारणही तितकंच सबळ. दहावीचं वर्ष आणि प्रिलीम परीक्षा तोंडावर आलेली. या परीक्षेच्या हातात हात घालून, संधी चालून आली ती अशी.. स्वरसंग्रामच्या आधी या वाहिनीने, निवडक अशा १२ दिग्गज संगीतकारांना मानवंदना देण्यासाठी ‘माझे जीवनगाणे’ या नावाने एका कार्यक्रमाची घोषणा केली. ही मालिका १२ भागांची होती. आईच्या सांगण्यावरून सहज ‘गंमत’ म्हणून दीपिकाने आपल्या गाण्यांची एक सीडी निर्मात्यांकडे पाठवली आणि ‘स्व. वसंत देसाई’ यांच्यावरील एपिसोडमध्ये पार्टीसिपेट होण्यासाठी दीपिकाला फोन आला.

चाळिशी स्वीकारताना..
प्रशांत असलेकर

महिन्याभरापूर्वी मला चष्मा लागला. प्रत्यक्षात जरी तो महिन्याभरापूर्वी नाकावर चढला, तरी गेली दोन-तीन वर्षे तो टप्प्याटप्प्याने जवळ येत होता. चष्म्याच्या दुकानापासून ते माझ्या नाकाच्या बुडापर्यंत माझ्या चष्म्याचा प्रवास कसा-कसा झाला, याची हकिकत फार मनोरंजक आहे. साधारणपणे दोन वर्षांंपूर्वी आमच्या होम मिनिस्टरने महिन्याच्या खर्चाचं एक अंदाजपत्रक काढलं आणि मला तपासायला दिलं.

ग्राहक तक्रार निवारणाची त्रिस्तरीय व्यवस्था
दूरसंचार सेवेविषयी ग्राहकांच्या बऱ्याच तक्रारी असतात. त्या संबंधात तक्रार करण्यासाठी कॉल सेंटर (किंवा कन्झ्युमर केअर किंवा हेल्पलाइन) नंबर उपलब्ध असतात, हे बऱ्याच ग्राहकांना माहित असते आणि त्यातील जागरुक ग्राहक अशा नंबरवर त्यांची तक्रार नोंदवतात. मात्र तेथे त्यांच्या तक्रारीचे निवारण समाधानकारकरीत्या झाले नाही तर त्यांना आपली तक्रार सेवक कंपनीच्या नोडल ऑफिसरकडे करता येते आणि तेथेही दाद लागली नाही तर त्याच्यावरती अ‍ॅपॅलेट अ‍ॅथॉरिटीकडे तक्रार करण्याची तरतूद आहे.

‘उंच उंच संदकफू’
गीता सोनी

युथ हॉस्टेल असोसिएशन, पं. बंगालने आयोजित केलेल्या ‘दार्जिलिंग- संदकफू- गुरदूम- दार्जिलिंग’ या हिवाळी ट्रेकसाठी आमच्या पाच जणांच्या चमूने मुंबईहून् प्रस्थान केले. जवळजवळ ४० तासांचा कंटाळवाणा ट्रेन प्रवास आटोपून न्यू जलपायगुडीपासून खासगी जीप गाडीने दार्जिलिंग बेस कॅम्पकडे आमचा प्रवास सुरू झाला. रस्त्याच्या मधून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरून दार्जिलिंगकडे जाणारी टॉयट्रेन मोठी मजेशीर दिसत होती. गर्द हिरवे चहाचे मळे, देवदार, फर्न जातीच्या झाडांच्या गर्दीतून तीन ते साडेतीन तासांचा मार्ग (वळणावळणाचा) पार करून ६००० फुटांवर असलेल्या दार्जिलिंगमध्ये आम्ही पाय ठेवला. बोचरी थंडी, स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश, एका बाजूला दऱ्यांतील पायऱ्या पायऱ्यांची शेती, दुसऱ्या बाजूला हिरवे डोंगर व त्यातून डोकावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बुद्ध मॉनेस्ट्री, रस्त्यावर ठिकठिकाणी विकण्यासाठी असलेली केशरी, रसाळ, सपर्ण नारिंगे असे तिरंगी दृश्य मनात साठवत सर्व जण \ऌअ च्या दार्जिलिंगमधील निवासस्थानी पोहोचलो. लगेचच दार्जिलिंगमधील \ऌटक हिमालयन, पर्वतारोहण संस्थेला व तेनसिंग नॉर्गे संग्रहालयाला भेट दिली. आतापर्यंत केवळ पुस्तकांत वाचलेल्या एव्हरेस्ट एक्सिडीशनमधील गिर्यारोहकांनी वापरलेली आयुधे, वस्त्रप्रावरणे, प्रत्यक्षात पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. पहिल्या महिला गिर्यारोहक बच्छेंद्री पाल यांचे अनुभव वाचून पुढील प्रवासासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली. एव्हाना आमचा २८ जणांचा समूह प्रस्तुत ट्रेकसाठी तयार झाला होता. सर्वात लहान वय वर्षे १२ असलेला माझा मुलगा, तर वयाची अठ्ठावन्नी पार केलेले हैदराबादचे त्रयी असे सर्व वयोगटातील देशाच्या विविध भागांतून आलेले स्त्री-पुरुष दाखल झाले होते. चार ते पाच अंश तापमानात पहाटे पाच वाजता उठून पाऊण तासाचा व्यायाम, उत्तम चविष्ट पौष्टिक नाश्ता घेऊन ठीक सात वाजता आम्ही सर्वजण निवासाजवळच्या मैदानात जमा झालो. नियमाप्रमाणे हजेरी घेण्यात आली. सहल आयोजकांनी हरहर महादेवच्या घोषणा देऊन आमच्या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला. समुद्रसपाटीपासून ६००० फुटांवर असलेल्या दार्जिलिंगपासून १२००० फुटांवर असल्याच्या पश्चिम बंगालमधील अत्युच्य अशा हिमालयीन शिखरावर ‘संदकफू’वर आम्हाला चालत/चढत पोहोचायचे होते. दार्जिलिंगपासून २५ किलोमीटर वर असणाऱ्या ‘धोत्रे’ गावापासून आमचे चालणे सुरू झाले. पुढील प्रवासातील सर्वच गावे ही भारत-नेपाळ सीमारेषेवर वसलेली होती. रस्त्याच्या एका बाजूला भारतातील खेडे, तर दुसऱ्या बाजूला नेपाळमधील गाव असा प्रकार होता. पहिल्या दिवशी जेवणाच्या वेळेपर्यंत आम्हाला टोंगलू या गावात पोहोचायचे होते. सहा किमीचा चढ पार करायचा होता. हिमालयीन पर्वतीय रस्ते आपल्या सह्याद्री पर्वतरांगांप्रमाणे दुर्गम नक्कीच नसतात, पण अती शीत तापमान, वाढत्या उंचीनुसार कमी होणारा हवेचा दाब, कोरडा, बोचरा, थंड वारा अशा प्रतिकूल हवामानाला मात्र तोंड द्यावे लागते. टोंगलू हे गाव म्हणजे डोंगर माथ्यावर असलेले एक छोटेसे लाकडी हॉटेल वजा झोपडे. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरणातही त्या झोपडीच्या मालकीणबाई व तिच्या सहकारी स्त्री-पुरुषांची आतिथ्यशीलता, स्वच्छता, नम्रता वाखाणण्यासारखी होती. पुढे साधारण दोन अडीच किलोमीटर अंतर चालून गेल्यावर आमच्या त्या दिवशीचे वस्तीचे गाव ‘टुमलिंग’मध्ये आम्ही पोहोचलो. येथेही प्रकार तोच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी घरे, सर्व लाकडाची स्वच्छ, टुमदार, अद्ययावत, चकचकीत, घराबाहेर भरगच्च रंगीबेरंगी फुलांनी डवरलेल्या कुंडय़ा. या गावात दवबिंदूपासून वीज निर्मिती प्रकल्प कार्यरत असल्याचे समजले. या गावांमधून वापरली जाणारी वीज ही फक्त सौर ऊर्जेपासूनच बनवली जाते हेही समजले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ‘काली पोखरी’ या आमच्या. पुढच्या कॅम्पसाइटकडे निघालो. हा रस्ता ‘सिंगा लिला नॅशनल पार्क’मधून जातो. साहजिकच रस्त्यात चालताना अस्वले, जंगली कुत्रे यांचा एकटय़ा दुकटय़ा वाटसरूला धोका उद्भवू शकतो. संध्याकाळपर्यंत सहा कि. मी.चा उतार, चार कि.मी.चा प्रचंड चढ आणि चार कि.मी.चा सपाट डोंगर असा १४ कि.मी.चा प्रदीर्घ पल्ला वार करून आम्ही काली पोखरी गावात पोहोचलो. पोखरी म्हणजे तलाव असा खरोखरीच काळा तलाव सुरुवातीलाच पाहायला मिळाला. आज आम्ही ९००० फुटांवर पोहोचलो होतो.‘संदकफू’चे अत्युच्च शिखर खूप दूर उंचावर पण नजरेस पडत होते, रात्री कडाक्याच्या थंडीला तोंड देत, दुसऱ्या दिवशीच्या अवघड चढणीचा विचार करीत झोपायचा प्रयत्न केला. आमच्या ट्रेकिंग प्रवासातील सर्वात कठीण टप्पा आता सुरू झाला होता. सर्वाच्याच हातात एव्हाना आधारासाठी काठय़ा आल्या होत्या. आज आम्हाला बर्फाच्छादित कांचनजंगा शिखरांचे दर्शन होणार होते. जाताना एव्हरेस्टची शिखरे आम्हाला साथ देत होती. आठ कि.मी.चा कठीण चढ पार केल्यावर आम्हाला कांचनजंगा शिखरांचे नुसत्या डोळ्यांनी दर्शन झाले. कोणाचाच स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तीन दिवस केलेल्या पायपिटीचे सार्थक झाल्यासारखे वाटले. दुपारी अडीच वाजताही तेथील तापमान होते शून्य अंश सेल्सिअस. चढताना श्रमांमुळे उतरवलेले थंडीचे कपडे पुन्हा अंगावर चढवून परिसर पाहायला सर्व जण निघालो. हे ठिकाणही नेपाळ-भारत सीमारेषेवरील अत्युच्च असल्याने सशस्त्र सीमा सुरक्षा दलाचे जवान तेथे अखंड गस्त घालीत असतात. रात्रीच्या उणे दोन तापमानातही थंडीची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावणाऱ्या त्या सैनिकांबद्दल मनात अपार आदर आणि कृतज्ञता दाटून आली. या ठिकाणाहून कांचनजंगाची पाचही शिखरे २५ कि. मी. अंतरावर, तर एव्हरेस्टची शिखरे १२५ कि. मी. अंतरावर दृष्टिक्षेपात येतात. हिमालयीन शिखरांचा निरोप घेऊन आणि बर्फाच्छादित चमकदार सूर्योदय पाहून आम्ही उतरणीला लागलो. हा रस्ता आम्हाला गुरदुम नावाच्या खेडय़ात पोहोचवणार होता. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य अशा जंगलातून होता. सोबतीला उंच-उंच बांबूची वने होती. हा रस्ता म्हणजे असंख्य छोटे-मोठे डोंगर आणि टेकडय़ा यामधून गेलेली पायवाट होती. औषधासाठीसुद्धा रस्त्यात माणूस सापडणार नव्हता. खाणे तर सोडाच पाणीही मिळणार नव्हते. एकूण १४ ते १५ कि. मी.चा हा रस्ता खूपच खडतर आणि खोल उताराचा होता. नंतर आम्ही पुन्हा एकदा डोंगर उताराला लागलो. आज आम्हाला शेवटचे १३ कि. मी.चे अंतर पार करायचे होते. जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही ‘श्रीकोला’ नदीजवळ पोहोचलो. आतापर्यंत पाहिलेल्या निसर्ग वैभवावर कळस म्हणजे ही नदी आणि नदीकाठचा परिसर. हिचे नाव ‘श्रीकला’ असे असावे, पण भाषेच्या बंगाली प्रभावामुळे ते ‘श्रीकोला’ म्हणून परिचित होते. या परिसराकडे पाहिल्यावर नकळत मनालीत पाहिलेल्या बियास नदीची आठवण होते. आता आम्ही आमच्या शेवटच्या प्रवासस्थानाकडे म्हणजेच ‘रिम्बिक’ गावाकडे कूच करीत होतो. रिम्बिक हे गाव आपल्याकडील माथेरानसारखे. आधुनिकतेचे अतिक्रमण न झालेले. गावाच्या सुरुवातीलाच गावकऱ्यांचा एक गट बुरुडकाम करताना दिसला. टोपल्यांचा आकार आपल्याकडे दिसणाऱ्या टोपल्यांपेक्षा खूप वेगळा होता. गावातील घरे लाकडी, टुमदार, पावसाने खराब होऊ नयेत, यासाठी तैलरंगात रंगवलेली अशी होती. पाच, सात दिवसांच्या या कार्यक्रमात मुख्यत्वाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आपल्याजवळ असलेली प्रचंड मानसिक व शारीरिक शक्ती जी एरवी आपल्याकडून फारशी वापरली जात नाही. अर्थातच सर्वच गोष्टींचे श्रेय आयोजकांनी केलेल्या सहल नियोजनाला, शिस्त, सरकारी अनुदानामुळे असणारा वाजवी सहल खर्च, एकत्रित संघटनासाठी दर संध्याकाळी केलेले ‘कॅन्डल फायर’ यांना आहे हे निर्विवाद.