Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

विविध

चांगले संस्कार केले असते तर वरुणवर ही वेळच आली नसती
मायावतींची मनेकांवर टोलेबाजी

लखनौ, ४ एप्रिल/पी.टी.आय.
भाजप नेत्या मनेका गांधी यांनी त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्यावर आई या नात्याने चांगले संस्कार केले असते तर त्यांनी जातीय तेढ माजवणारी भाषणे केली नसती व त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्याची आमच्या सरकारवर वेळही आली नसती, अशा शब्दांत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांना फटकारले आहे. मायावती या आई नाहीत. त्यामुळे मुलगा तुरुंगात असताना त्याला भेटू देण्याची परवानगी नाकारली गेल्यानंतर मातेला काय वेदना होतात हे त्यांना कधीच कळणार नाही, असे वक्तव्य मनेका गांधी यांनी काल केले होते. वरुण गांधी यांना इटाह तुरुंगात ठेवले असून त्यांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने मनेका गांधी यांना नाकारली होती.

गोव्यातील निवडणूक प्रचार मुद्दाहीन
कोणत्याच पक्षांकडे ना स्थानिक ना राष्ट्रीय प्रश्नाचे भांडवल!

पणजी, ४ एप्रिल / पी. टी. आय.
गोव्यातील मतदारांसमोर कोणताही वैशिष्टय़पूर्ण स्थानिक मुद्दा मांडणे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील एकाही पक्षाला जमलेले नाही. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यास महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किंवा युनायटेड गोवन्स डेमॉक्रॅटिक पार्टी (यूजीडीपी) यांच्यासराखे स्थानिक पातळीवरील पक्षही मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत. २३ एप्रिल रोजी गोव्यात मतदान होत असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित व भाजप स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत.किनारपट्टीवरील लोकांना त्रासदायक असलेला ‘सीआरझेडचा’ मुद्दा गोव्यातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. काँग्रेसने या सीआरझेडग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले असले तरी पत्रकार परिषदेत प्रश्नांच्या भडिमारांना उत्तर देताना काँग्रेस नेत्यांना या सीआरझेड प्रश्नाबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडता आलेली नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही या प्रश्नाबाबत ठोस काही सांगता आले नाही.

भारतातील घातपाती कारवायांना खतपाणी घालणे थांबवा
अमेरिकेने पाकिस्तानचे कान पिळले
वॉशिंग्टन ४ एप्रिल/पी.टी.आय.

पाकिस्तानची लष्करेतर मदत तिप्पट म्हणजे वर्षांला १.५ अब्ज डॉलर करण्याबाबतच्या विधेयकातच अमेरिकेने एक मेख मारून ठेवली असून भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे पाकिस्तानने थांबवावे असे म्हटले आहे. याचाच अर्थ गेली अनेक दशके भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवाया पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या पाठिंब्याने घडवून आणीत आहेत हे अमेरिकेने एक प्रकारे मान्य केले आहे.
पाकिस्तान एंडय़ुरिंग असीस्टन्स अँड कोऑपरेशन अ‍ॅक्ट हे विधेयक प्रतिनिधिगृहात हॉवर्ड बेरमन यांनी मांडले होते. बेरमन हे सभागृहाच्या परराष्ट्र संबंध समितीचे प्रमुख आहेत. सिनेटमध्ये अशाच स्वरूपाचे एक विधेयक मांडण्यात येणार असून त्यात येत्या पाच वर्षांत पाकिस्तानला दिली जाणारी मदत तिप्पट म्हणजे १.५ अब्ज डॉलर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान धोरणाचा तो एक भाग आहे. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला १० अब्ज डॉलरची मदत दिली होती पण त्यावेळी बुश प्रशासनाने अशा प्रकारच्या कुठल्याही अटी त्यावेळी घातल्या नव्हत्या. दिलेल्या पैशांचा हिशेब मागितला नव्हता. आता मांडण्यात येत असलेल्या विधेयकात अमेरिकेने असे म्हटले आहे की, पाकिस्तानातील कुठल्याही दहशतवादी गटाला भारतात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने प्रोत्साहन देऊ नये. कारण भारतामधील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानातील गटच जबाबदार असून ते आयएसआयच्या मदतीने ही कृत्ये करीत आहेत असे अमेरिकेला वाटते. अणुशास्त्रज्ञ ए.क्यू.खान यांचे नाव न घेता असे म्हटले आहे की, पाकिस्तानातील ज्या व्यक्ती अण्वस्त्रप्रसारात गुंतलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अमेरिकी चौकशीकर्त्यांना पाकिस्तानने मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी पाकिस्तानला वर्षांकाठी १.५ अब्ज डॉलरची मदत देण्याचे मान्य केले असून या विधेयकाला त्यांचा पाठिंबा आहे.

राजस्थानमध्ये बसपाला जबर धक्का, सहाही आमदार काँग्रेसमध्ये दाखल
नवी दिल्ली, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारने आज मीणा समाजाचे नेते किरोडीलाल मीणा यांच्या नाराजीमुळे निर्माण होणारे राजकीय संकटाचे ढग केवळ पांगविलेच नाही तर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मायावतींच्या बसपाला मोठा धक्काही दिला. राजस्थान विधानसभेवर निवडून आलेले बसपाचे सहाही आमदार आज दुपारी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यामुळे अल्पमतात असलेल्या काँग्रेसला आता २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत १०२ सदस्यांसह पूर्ण बहुमत लाभले आहे. मीणा समाजावर वर्चस्व असलेल्या किरोडीलाल मीणा यांची पत्नी गोलमा देवी यांनी गहलोत मंत्रिमंडळातून अचानक राजीनामा दिल्यानंतर ९६ सदस्य असलेल्या राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात सापडले होते. काही अपक्ष आमदारही आपले समर्थन मागे घेतील, अशी चर्चा सुरु झाली होती. पण राजस्थान विधानसभेवर निवडून आलेल्या बसपाच्या गिरीराज सिंह, मुरारीलाल मीणा, रामकेश मीणा, रमेश मीणा, राजकुमार शर्मा, राजेंद्र गुढा या सहाही आमदारांनी विधानसभा अध्यक्ष दीपेंद्र सिंह यांना बसपा विधिमंडळ पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याचे पत्र लिहिले. बसपाने राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये पैसा घेऊन तिकीटे वाटल्याचा आरोप या सहाही आमदारांनी केला आहे.