Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

के.जी. टू पी.जी.

नको भीती.. फिजिक्सच्या न्यूमरिकल्सची
बारावीच्या परीक्षेपाठोपाठ अभियांत्रिकी-वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा समोर उभी ठाकली आहे. सीईटी आता केवळ शहरी भागातील विद्यार्थ्यांच्याच आवाक्यातील परीक्षा राहिलेली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थीही उत्साहाने आणि तयारीने या परीक्षेला बसू लागले आहेत आणि चांगले यशही मिळवू लागले आहेत. परंतु ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मार्गदर्शनाच्या योग्य आणि पुरेशा संधी तसेच सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. ज्या आहेत त्यासाठी हजारो अथवा लाखो रुपये

 

मोजावे लागत आहेत. परिणामी असंख्य विद्यार्थी त्यापासून वंचितच राहतात. अशा व अन्य बहुसंख्य विद्यार्थ्यांना ‘टिप्स’ देण्याचा हा प्रयत्न.
महाराष्ट्र शासनाची सीईटी परीक्षा यंदा १२ मे रोजी होणार आहे. विद्यार्थी आता सीईटीचा अभ्यास जोमाने करत असतील. या परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणारा विषय म्हणजे भौतिकशास्त्र (फिजिक्स) होय. विद्यार्थ्यांना हा विषय शत्रू क्रमांक एक वाटतो. याचे मुख्य कारण म्हणजे या विषयाबद्दल असलेले गैरसमज हे होय. यातील काही गैरसमज-
खूप न्यूमरिकल्स असतात. (मागील मे २००८ मध्ये झालेल्या परीक्षेत न्यूमरिकल्सचा आकडा ३० पासून ४८ पर्यंत होता, असे अनेक परीक्षार्थीनी सांगितले. अर्थात ही वस्तुस्थिती नाही)
वेळ पुरत नाही. अर्थात यापाठीमागचे कारण असे, की मागील परीक्षांचे पेपर्स पाहायला मिळत नसल्याने प्रत्येकजण स्वत:ची मते ठामपणे विद्यार्थ्यांवर लादतो. त्यातून फिजिक्स विषयाबद्दल एक भीती निर्माण होते. खरं तर त्यामुळे फिजिक्स विषयाची भीती बाळगण्याचे काही कारण नाही. परंतु खरा प्रश्न पुढेच येतो. तयारी कशी करावी?
तुमच्या प्राध्यापकांनी सुचविलेली व तुम्ही वर्षभर वापरलेली दोन चांगली ‘टेक्स्ट बुक’ व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे. त्यातील प्रत्येक भाग समजावून घ्यावा. त्याचबरोबर बोर्डाने सँक्शन न कलेली परंतु संदर्भ पुस्तक म्हणून वापरता येतील अशी पुस्तके. उदा. N.M.Mistry, Bapat-Mahajan इ. वाचून काढावीत.
मूलभूत संकल्पना पक्कया असाव्यात. त्यावर शिक्षकांशी, मित्रांशी चर्चा कराव्यात. आपल्याला आलेल्या शंकांचे तातडीने निरसन करून घ्यावे.
सर्व फॉम्र्युले पाठ करावेत व त्यांच्या व्हेरिएबल्सचा अर्थ लक्षात ठेवावा. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नासाठी कोणता फॉम्र्युला वापरावा किंवा आवश्यक फॉम्र्युला कसा तयार करावा, हे चटकन लक्षात येते व कमी वेळेत न्यूमरिकल्स सोडविण्याची क्षमता वाढते.
आपण एसआय किंवा सीजीएस पद्धती वापरतो. बऱ्याजदा बाजारातील पुस्तकात इतर युनिट्स वापरलेली असतात. त्याने गोंधळ होण्याचा संभव असतो.
बारावीमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्याच्याशी संबंधित ११ वीतील भागाची उजळणी करावी. उदा. Electrictiy and magnetism. फिजिक्सच्या अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी उदा. Kinematical equations, addition of vectors, dimension इ. भागांची उजळणी आवश्यक आहे.
अभ्यासानंतर चिंतन अथवा मनन करणे अत्यंत आवश्यक.
न्यूमरिकल्स सोडविताना काही कौशल्यं संपादन करणे आवश्यक आहे. काही शॉर्टकट वापरणे आवश्यक असते.
डेसिमल पॉईंट शिफिटंग योग्य करता आले पाहिजे. टेनची पॉवर आणि डेसिमल पॉईंट शिफ्टिंग यांच्यातील संबंध सरावाने पटकन लक्षात येतो.
Trignometry चे काही फॉम्र्युले व किमती पाठ करणे आवश्यक आहे.
पाढे (टेबल्स) पाठ असावेत. त्यामुळे आकडेमोड जलद गतीने करता येते.
सर्किट डायग्राम, रे डायग्राम, विविध ग्राफ, दोन क्वांटिटीमधील संबंध ग्राफच्या साह्य़ाने दिलेले असतात. या साठी ग्राफ आकृत्या काढून समजावून घ्याव्यात.
प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवाव्यात. प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर जो प्रश्न येणार नाही, तो का आला नाही त्यामागचे कारण जाणून घ्यावे व तो भाग पुन्हा वाचावा. जो प्रश्न चुकला असेल, तो का चुकला, ते समजावून घ्यावे व तीच चूक पुन्हा होणार नाही हे पहावे.
CET ची तुलना AIEEE किंवा IIT शी करू नका. AIEEE किंवा IIT यांचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धती CET पेक्षा वेगळी आहे.
परीक्षेतील एखादा प्रश्न येत नसेल तर लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळावे.
उदा. A horizontal platform is rotating with uniform angular velocity (W) about a vertical axis passing through It's centre.
Now a viscous liquid of mass M is poured near its centre and is allowed to spread out slowly and finally fall down.
During this period, the angular velocity of the platform
a) decreases continuously, b) increases continuously, c) does not change, d) decreases initially and increases again at the end.
soluathion - No external torque is acting on the system.
when mass increases, M.I.of system increases therefore angular velocity decreases.
As mass spread away from axis of rotation M.I. increases continuously. therefore angular velocity decreases continuously, but when liguid fall down M.I. reaches at it's original value i.e. decreases. therefore angular velocity reach at It's original value.
Option 'd' is proper option. अशा प्रकारचे
understanding oriented प्रश्न शोधा व त्यांचा सराव करा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाग्रता आवश्यक आहे. पेपर सोपा असेल की अवघड? वेळ पुरेल का? मला किती मार्क्‍स मिळतील? अशा प्रश्नावर विचार करण्याने आत्मविश्वास कमी होतो. एकाग्रता कमी होते. त्यामुळे अभ्यास करूनही योग्य ठिकाणी योग्य ज्ञान आठवत नाही.
त्यासाठी उर्वरित उपलब्ध वेळ व अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार याचे परिपूर्ण नियोजन करा. अभ्यास करताना वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन फिजिक्सचा सर्वागीण अभ्यास कसा होईल त्यावर लक्ष केंद्रित करा. स्वत:वर विश्वास ठेवा.
प्रा. उमेश, प्रा. दिलीप शहा,
सायन्स अ‍ॅकॅडमी, पुणे

अशी असते प्रश्नपत्रिका..

सीईटीसाठी अनेक वर्ष नामवंत महाविद्यालयात शिकविणारे प्राध्यापक व सीईटी परीक्षेसाठी पॅनेलवर असणारे मार्गदर्शक यांच्याशी चर्चा केल्यानंतर खरी वस्तुस्थिती समजते, ती अशी-
न्यूमरिकल्सची संख्या २० पर्यंत असते.
न्यूमरिकल्ससारखेच परंतु अ‍ॅप्लिकेशन ओरिएन्टेड, थिअरीवर आधारित प्रश्न, एका सूत्रावरून दुसरे सूत्र शोधावे लागणारे प्रश्न २० पर्यंत.
विद्यार्थ्यांना आव्हान वाटतील असे प्रश्न दहापर्यंत.
सर्व प्रश्नांना लागणारा एकूण वेळ ४५ मिनिटे पुरेल अशीच प्रश्नपत्रिका सेट केलेली असते.
एका प्रश्नाला सरासरी ५४ सेकंद वेळ मिळतो. परंतु थिअरी बेस्ड प्रश्नांचा वेळ इतर प्रश्नांना मिळतो.
लॉगबुकची आवश्यकता नसते. परंतु लॉग प्रत्येक प्रश्नपत्रिकेबरोबर पुरविलेले असते.
विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, उपयोजना क्षमता,
अनेक बाजूंनी विचार करण्याची क्षमता, अ‍ॅटिटय़ूड, बुद्धिमत्ता इत्यादी तपासणारे प्रश्न असतात. परंतु सर्व प्रकारचे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून प्रश्नपत्रिका तयार केलेली असते.

पदार्थविज्ञान, म्हणजेच ‘फिजिक्स’च्या पेपरने ‘सीईटी’ची सलामी होते. परंतु, ‘फिजिक्स’बद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विनाकारण भीती बसली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे न्यूमरिकल्स. त्या विषयीचे गैरसमज दूर केले आणि प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असते, याची माहिती घेतली, तर न्यूमरिकल्सचा बागुलबुवा आपोआपच दूर होईल. चांगला प्रारंभ झाल्यास निम्मी लढाईजिंकता येते आणि त्यासाठी न्यूमरिकल्सशी दोन हात करण्याचे कौशल्य आत्मसात करा..

शंका तुमच्या, उत्तर आमचे..

‘सीईटी’बाबत विद्यार्थी-पालकांच्या मनामध्ये असंख्य शंका असतात. परीक्षेच्या नियमावलीपासून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपापर्यंत. त्याचप्रमाणे अभ्यास कसा करावा, याविषयीसुद्धा पुरेसे मार्गदर्शन नसते. त्यांच्यासाठी ‘मिशन सीईटी’चे हे व्यासपीठ. तुमच्या शंका kgtopg.loksatta@gmail.com
या संकेतस्थळावर पाठवाव्यात.
----------------------------------------------------------------------------

बोर्ड घेणार दहावी-बारावीच्या मुलांचा कैवार
यंदा दहावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणात पकडल्या गेलेल्या भावी देसाई या मुलीच्या आत्महत्येच्या घटनेचा चटका समाजाला जाणवलाच, पण तो बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही स्पर्शून गेला. परीक्षेच्या भीतीने आत्महत्या करणे, घरातून पळून जाणे अशा कृत्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आपण परीक्षा घेण्याचे नित्यकर्म करणे पुरेसे नाही, तर त्या परीक्षांचे जे दाहक साइड-इफेक्टस् आहेत, त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, याची तीव्र जाणीव बोर्डाच्या अधिकाऱ्यांना झाली. आणि त्यातून बोर्डाने विद्यार्थ्यांच्या तणावमुक्तीसाठी २१ कलमी कार्यक्रम आखण्याचे ठरवले आहे. आता हा कृती-कार्यक्रम प्रत्यक्षात पास होतो की नापास आणि किती पर्सेटने- ते जसे बोर्डाच्या कार्यवाही यंत्रणेवर अवलंबून आहे, तसेच संबंधित सर्व घटकांच्या इच्छाशक्तीवरही.
शालेय परीक्षा संपत आल्या आहेत. आता सुटय़ा सुरू झाल्या की काय काय धमाल करायची याच्या योजना विद्यार्थी व पालक वर्ग आखू लागला आहे. मात्र दहावी आणि बारावीत गेलेले बहुतांश विद्यार्थी त्याला अपवाद आहेत. त्यांना ही सुटीची चैन नाकारण्यात येत आहे. नववीच्या/अकरावीच्या परीक्षेनंतर एखाद् दिवसाच्या छोटय़ाशा ब्रेक के बाद त्यांना लगेच अभ्यासाला जुंपले जाणार आहे. आता कोचिंग क्लासच्या लोगोधारी बॅगा मिरवत ही दहावी-बारावीची मुले आज्ञाधारक कोकरासारखी पुन्हा लगोलग अभ्यासाला लागतील.
दहावी-बारावीच्या राक्षसाने गेल्या काही वर्षांत अत्यंत अचकट-विचकट रूप धारण केले आहे. त्याचा बागुलबुवा इतका की त्यामुळे अनेक घातक पायंडे पडले आहेत. नववीचा अभ्यास पहिल्या सहामाहीत उरकणे आणि दुसऱ्या सहामाहीपासून दहावीचा अभ्यासक्रम सुरू करणे- हा फॉम्र्युला आता अनेक शाळा अनुसरत आहेत. ताणतणावाचा काटा नववीपर्यंत सरकला आहे. (तसा म्हणा तो के.जी.पासूनच जाणवू लागला आहे.) पास-नापासाच्या सीमेवरील मुलं नववीच्या वर्षांत फारच असुरक्षित टापूत वावरत असतात, कारण अनेक शाळांमध्ये नववीत एक तुकडीभर मुले दहावीत जायला नालायक ठरवली जातात.
यासंदर्भात ही एक आकडेवारी बघा- नववीत नापास झाल्यामुळे बाहेरून दहावीला बसणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षी केवळ मुंबई विभागात २५ हजार होती. त्यापैकी सुमारे ६० टक्के विद्यार्थी दहावी पास झाले. अशी मुले बोर्डाच्या संपर्क केंद्र योजनेचा लाभ घेऊन दहावीचा अभ्यास शिकू शकतात. त्यातही, काही संपर्क केंद्रे अशा मुलांना फारच आस्थेने मदत करतात. उदाहरणार्थ, बोरिवलीतील आनंदीबाई काळे विद्यालयातील केंद्रात बाहेरून बसणाऱ्या मुलांचा छान अभ्यास घेतला जातो. तिथे गेल्या वर्षीचा निकाल होता ६५ टक्के. म्हणजे दहावीचा निकाल उत्तम लागावा म्हणून नववीतच नापासाचा शिक्का लावणाऱ्या शाळा सुमारे ६० ते ६५ टक्के मुलांवर अघोरी अन्याय करत असतात!
दहावीचे गुण आणि बारावीच्या वर्षांतील मार्क व सीईटी यांवर मुलांचे पुढचे प्रवेश अवलंबून असल्यामुळे ती वर्षे गांभीर्याने घेणे स्वाभाविक आहे, परंतु त्याची स्वाभाविक मर्यादा एव्हाना ओलांडली गेली आहे. शाळा, पालक आणि शिक्षण व्यवस्थेतील समांतर यंत्रणा या तिन्ही घटकांनी मिळून या दोन्ही परीक्षांचा प्रचंड हाईप केला आहे. समांतर यंत्रणा अर्थातच कोचिंग क्सासेसची. असा हाईप करण्यातून त्यांचे मार्केट फोफावले आहे. त्या मार्केटला मंदीशी देणे-घेणे नाही. शाळा-महाविद्यालयांना दहावी-बारावीचा निकाल उत्तम लागायला हवाय तो त्यांच्या परस्परस्पर्धेत सरस ठरण्याच्या इर्षेपोटी. आणि पालकांसाठी मुलाची गुणवत्ता हा स्टेटस सिंबॉल झाला आहे. याचा परिपाक म्हणून मुलं ताणाच्या बोझाने हैराण होत आहेत.
या परिस्थितीत मुलांचा कैवार घेण्यासाठी आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुढे सरसावले आहे. इतके वर्षे परीक्षा घेणे व निकाल लावणे इतकीच आपली जबाबदारी आहे, असे मानणाऱ्या बोर्डातील मुंबई विभागीय मंडळाने पुढाकार घेऊन आता विद्यार्थ्यांच्या तणावमुक्तीसाठी २१ कलमी कार्यक्रम आखण्याचे ठरवले आहे.
अलीकडेच मुंबई विभागाच्या सचिव बसंती रॉय आणि अध्यक्ष श्रीधर साळुंखे यांनी एक बेठक आयोजित केली होती. त्यात बोर्डाचे सर्व सदस्य तर होतेच, शिवाय काही तज्ज्ञांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मानसतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. अनुराधा सोवनी, समुपदेशक जीवन डकुन्हा, विजय जामसंडेकर, राजीव तांबे, डॉ. जयश्री करंबे यांसह अनेक तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. या २१ कलमांपैकी प्रत्येकी पाच कलमे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी आचरणात आणण्यासाठी आहेत, तर एक कलम आहे शाळेच्या संस्थाचालकांसाठी- ही सर्व कलमे नीट अमलात आणली जात आहेत की नाही, हे बघणे.
विद्यार्थ्यांंसाठी जे संकेत आखले गेले आहेत, त्यात त्यांचे त्यांनी अभ्यास आणि रंजन यांचा समन्वव साधणारे दैनंदिन वेळापत्रक आखणे, अभ्यासतंत्र शिकून घेणे, शालेय उपक्रमांत माफक प्रमाणात तरी सहभागी होणे, अंतर्गत परीक्षा व प्रकल्प इत्यादींची माहिती मिळवणे अशा कलमांचा समावेश आहे. पालकांसाठी तर मुलांशी वर्तणूक क शी असावी, त्यांच्या यशापयशात भागीदारी कशी ठेवावी, मुलांचा आहार, विश्रांती, मानसिकता यांकडे कसे लक्ष द्यावे, असे बरेच मुद्दे आहेत.
शिक्षक मंडळींना अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करायला साह्य करणे, अंतर्गत गुणांबद्दल अचूक माहिती देणे, भारंभार सराव परीक्षा घेण्यापेक्षा मोजक्या परीक्षा घेऊन त्यांच्या उत्तरांत सुधारणा कशी घडेल याचे प्रयत्न करणे, पालकांशी संवाद साधणे आणि दहावीचा ताण त्यांना येणार नाही याची काळजी घेणे- अशा जबाबदाऱ्या शिक्षकांनी घ्याव्या असे सुचवण्यात आले आहे.
नववीताल पासिंग पर्सेंट वाढवून अनेक मुलांना दहावीत जाण्याचा अधिकार नाकारणे, दहावीच्या मुलांना शाळेतील मौजमजेच्या उपक्रमांत सहभागी करून न घेणे- तत्सम गोष्टी घडू नयेत, अशी तंबी मुख्याध्यापकांना देण्यात येणार आहे.
या २१ कलमी कृतीकार्यक्रमाची आखणी पूर्ण झाली की शाळाचालक, मुख्याध्यापक यांच्या सभा घेऊन, पुस्तिकारूपात पाठय़पुस्तकासोबत छापून, ते संकेत पाळले जावेत यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले आहे.
याच सभेत आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. परीक्षाकेंद्रावर बोर्डाची परीक्षा घेणारे सर्व अधिकारी, पर्यवेक्षक यांना सर्व नियमांची जाण असणे, ही यंत्रणा काटेकोरपणे तसेच संवेदनशीलतेने हाताळण्याचे भान असणे- यासाठी त्यांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. जिथे ढळढळीतपणे कॉपी, मास कॉपी असे प्रकार घडतात, तिथे पर्यवेक्षकावर कडक कारवाई करण्याचे संकेत शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. कॉपीच्या प्रकरणात पकडल्या गेलेल्या मुलांवर कारवाई करण्यासंदर्भातील सद्य नियम मुलांचे वय आणि भावनिकता लक्षात घेता फारच जाचक आहेत, असे बोर्डालाही जाणवले आहे आणि तसेच तज्ज्ञांचेही मत आहे. शिवाय अशा मुलांवर कारवाई करताना संबंधितांनी काय खबरदारी घ्यावी, याचे प्रशिक्षण त्यांना देण्याची आवश्यकता आहे, असाही मुद्दा मांडला गेला.
यंदा दहावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणात पकडल्या गेलेल्या भावी देसाई या मुलीच्या आत्महत्येच्या घटनेचा चटका समाजाला जाणवलाच, पण तो बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही स्पर्शून गेला. परीक्षेच्या भीतीने आत्महत्या करणे, घरातून पळून जाणे अशा कृत्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा मुंबई बोर्डाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा निर्माण केली होती. त्यावर पुष्कळ मुलांनी फोन केले आणि त्यापैकी बहुतांश फोन हे नैराश्य, भीती यांनी ग्रासलेल्या मुलांचे होते. त्यामुळे मुलांवरील ताणाच्या पातळीची तीव्रता अधिकाऱ्यांच्या प्रकर्षांने लक्षात आली. (अशी हेल्पलाईन पुण्यातही गेली तीन वर्षे चालवली जात आहे.) आपण परीक्षा घेण्याचे नित्यकर्म करणे पुरेसे नाही, तर त्या परीक्षांचे जे दाहक साइड-इफेक्टस् आहेत, त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, याची तीव्र जाणीव बोर्डाच्या अधिकाऱ्यांना झाली. आणि त्यातून हे पाऊल बोर्डाने उचलले आहे. आता हा कृती-कार्यक्रम प्रत्यक्षात पास होतो की नापास आणि किती पर्सेटने- ते जसे बोर्डाच्या कार्यवाही यंत्रणेवर अवलंबून आहे, तसेच संबंधित सर्व घटकांच्या इच्छाशक्तीवरही.
शुभदा चौकर