Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

आजऱ्यात पवारांनी उडवली मंडलिकांची खिल्ली
आजरा, ५ एप्रिल / दत्ता देशपांडे

प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला संधी देणारा राष्ट्रवादी एकमेव पक्ष आहे. ज्यांनी पक्षासाठी मनाचा दिलदारपणा दाखवून त्याग केला, पक्षादेश मानून राष्ट्रवादीचेच कार्य करण्याचा रेटा पुढे ठेवला अशांचा अनुभव आणि त्यांचा त्याग राष्ट्रवादी विसरणार नाही. प्रत्येकाच्या खांद्यावर काहीना काही जबाबदारी सुपूर्त केली जाईल, असे अभिवचन राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी दिले. तरुणांना संधी देण्याऐवजी आपणच बोहल्यावर चढलेल्या सदाशिवराव मंडलिकांची जाता जाता खिल्ली उडवली.

वाळव्यात वैभव नायकवडी यांची भूमिका गुलदस्त्यात
आष्टा, ५ एप्रिल / शीतल पाटील

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाळवा तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असताना हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी अद्यापही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. श्री. नायकवडी यांचे वाळवा परिसरातील वर्चस्व पाहता त्यांची भूमिका ही निर्णायकी ठरणारी असून ते कोणाला कौल देतात? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. सांगली जिल्ह्य़ातील वाळवा व शिराळा या दोन तालुक्यांचा समावेश हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झाला आहे.

सोलापूरजवळ दोनवेळा रेल्वेवर दरोडय़ाचा प्रयत्न
सोलापूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या चोवीस तासांत दोनवेळा रेल्वेवर दरोडा घालण्याचा प्रयत्न झाल्यामुळे प्रवाशात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही वेळेला रेल्वे पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र पोलीस आणि दरोडेखोरांच्या चकमकीत दोन रेल्वे पोलिसांसह दोन प्रवासी महिला व दरोडेखोर जखमी झाले.

पाचशेवर बिल भरणाऱ्यांना बीएसएनएलतर्फे मोफत इनकमिंग दूरध्वनी
सोलापूर, ५ एप्रिल/जयप्रकाश अभंगे

आपल्या दूरध्वनीचे दरमहा बील पाचशे रुपयांहून अधिक असेल तर आता बीएसएनएलच्या वतीने ग्राहकांना बिनभाडय़ाचे फक्त इनकमिंग फ्री दूरध्वनी संच मोफत देण्याची योजना देशभर सुरू करण्यात आली आहे. ज्या ग्राहकाने सलग सहा महिने आपल्या दूरध्वनीसाठी दरमहा पाचशे रुपये बील भरले असेल अशा ग्राहकांना ‘इनकमिंग फ्री’ दूरध्वनी संच देण्यात येत आहे. यासाठी दरमहाचे भाडे, जोडणी, अनामत ठेव अशी कोणतीही आकारणी लावण्यात येणार नाही.

अडीच लाख भाविकांच्या उपस्थितीत पंढरीत चैत्री यात्रा
पंढरपूर, ५ एप्रिल/वार्ताहर

महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी एकात्मतेचा संदेश देणाऱ्या पंढरीनगरीत हरि अन् हरच्या गजरात शिवभक्त अन् विठ्ठलभक्त, वारकरी, भाविक अशा सुमारे अडीच लाखांचे उपस्थितीत कामदा एकदशीचा सोहळा संपन्न झाला. पंढरी नगरीत चार प्रमुख यात्रा भरतात त्यात चैत्री यात्रा ही लहान यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेला भाविक, भक्त फिरती यात्रा म्हणून ओळखतात. याच कालावधीत कोल्हापूरच्या जोतीबा, शिखर शिंगणापूरच्या शंभो महादेवाची यात्रा, गड जेजुरीची यात्रा अशा चालू असल्याने भाविक भक्त वारकरी जेजुरी जोतीला पंढरपूर शिंगणापूर अशी किंवा त्याला गावी परतण्याचे सोयीनी जेजुरी, शिंगणापूर, कोल्हापूर, पंढरपूर करून गावी परततो. त्यामुळे पंढरीत सतत आठ दिवस गर्दी असते.

तीन दिवसांच्या बालिकेला नदीत टाकल्याप्रकरणी तिघांना अटक
पंढरपूर, ५ एप्रिल / वार्ताहर

प्रथम प्रेम, त्यानंतर अनैतिक संबंध आणि त्यातून जन्मास आलेल्या तीन दिवसांचे अर्भक बालिकेस चंद्रभागा नदीत टाकून निघून जाणाऱ्या राजश्री दूधभाते, दगडू वाघमारे, संजय वाघमारे यांना वाळवंटातील नावाडय़ांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले अन् निष्पाप जिवाची हत्या केल्या प्रकरणी तिघांना अटक केलीच परंतु अशा प्रकाराला मदत करणाऱ्या उमरगा येथील एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मातोळी, जि. उस्मानाबाद येथे राहणाऱ्या राजश्री व दगडू यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यातून राजश्री हिस दिवस गेले. या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून उमरगा येथील एका डॉक्टराकडे जाऊन त्यांनी गर्भपात करून घेतला. त्यामुळे त्या बालिकेच्या देहाची विल्हेवाट लावण्यासाठी दगडू वाघमारे याने आपला लष्करातून आलेला जवान भाऊ संजय याची मदत घेऊन त्या बालिकेस घेऊन पंढरी गाठली. त्यांनी आपले पाप चंद्रभागेच्या पोटात टाकले. तेथे हजर असलेल्या नावाडय़ांना संशय आल्याने राजश्री, संजय, दगडू यांना पकडले. नंतर शहर पोलीस स्टेशनला कळवताच पोलिसांनी येऊन राजश्री दूधभाते, दगडू वाघमारे, संजय वाघमारे यांना ताब्यात घेतले.

फोटो काढण्याच्या बहाण्याने कॅमेरा व साहित्य लंपास
आटपाडी, ५ एप्रिल / वार्ताहर

फोटो काढण्याचा बहाणा करून विटा येथील माणिक फोटो स्टुडिओतून पाचजणांनी कॅमेऱ्यासह एक लाख रूपयांचे साहित्य लंपास केले. दिवसाढवळ्या स्टुडिओमालकासमोरून साहित्य लांबविण्याच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजी चौकानजीक संजय नारायण पवार यांच्या मालकीचा माणिक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तीन पुरूष व एक महिला तिच्यासमवेत एक पुरूष व दीड वर्षांच्या मुलीसह आले. लहान मुलीचे फोटो काढायचे आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर संजय पवार यांनी या महिलेस मुलीसह फोटो स्टुडिओमधील केबिनमध्ये जाण्यास सांगितले. यावेळी अन्य तिघेजण संजय पवार यांच्या वडिलांशी बोलत उभे राहिले. याचवेळी केबिनमधील संबंधित पुरूष व महिला आपल्या मुलीसह बाहेर पडले. मुलगी फोटो काढण्यास तयार होत नाही. नवीन कपडे घालून पुन्हा येतो, असे सांगून ते बाहेर पडले. थोडय़ावेळाने अन्य तिघेजण या केबिनमध्ये गेले. त्यानंतर संजय पवार हेही आत केबिनमध्ये गेले असता साहित्य लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्या पुरूष व महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे जोडपे काही हाती लागले नाही. संजय पवार यांनी तत्काळ विटा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.

अपघातात जखमी झालेले संजय शहा यांचे निधन
इचलकरंजी, ५ एप्रिल / वार्ताहर

अपघातात गंभीर जखमी झालेले अरिहंत सूतगिरणीचे व अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय चंद्रकांत शहा यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी वर्षां, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. शहा व त्यांचे कुटुंबीय १२ दिवसांपूर्वी पुण्याला जात असताना त्यांच्या मोटारीची धडक टँकरला बसली होती. पाचवड येथे झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले होते. जखमी शहा यांना पुण्यातील रुबी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. चेहरा, डोके व डोळय़ाला जबर मार बसल्याने शर्थीचे प्रयत्न करूनही वैद्यकीय उपचारास प्रतिसाद मिळाला नाही.

पत्नीला त्रास देणाऱ्या पतीचा पलायनाचा प्रयत्न
इचलकरंजी, ५ एप्रिल / वार्ताहर

पत्नीला त्रास देतो म्हणून ताब्यात घेतलेल्या पतीने पोलिसांनाही त्रास देत हातावर तुरी देऊन पोलिस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी व लोकांनी पाठलाग करून त्यास बागवान गल्लीत पकडले. कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी पोलिस गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न आरोपींकडून झाला होता. ही घटना ताजी असतानाच येथील गावभाग पोलिस ठाण्यातून आरोपीने पळून जाण्याचा प्रकार घडल्याने त्याची जोरदार चर्चा होती. जयवंत यशवंत मोरबाळे (वय ३०, रा.योगाश्रम परिसर शहापूर) असे त्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. अर्चना जयवंत मोरबाळे यांनी पती जयवंत हा शारीरिक मानसिक छळ करतो, अशी फिर्याद गावभाग पोलिसांत दिली होती. त्याला पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले होते. सायंकाळी ५ वाजता जयवंत हा पाणी पिण्याच्या बहाण्याने पोलिस ठाण्यातून बेपत्ता झाला. तो भगवान गल्लीतून सांगली रस्त्याकडे पळून जात होता. पोलिस व नागरिकांनी त्याचा पाठलाग करून मशिदीजवळ पकडले.

प्रदेश काँग्रेस तक्रार निवारण समिती अध्यक्षपदी निर्मला ठोकळ
सोलापूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश पातळीवर स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी सोलापूरच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास मुंबईच्या दादर भागातील टिळक भवन येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात श्रीमती ठोकळ यांच्याकडे कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘उदयनराजेंना मोठय़ा मताधिक्याने विजयी करा’
वाई, ५ एप्रिल/वार्ताहर

शरद पवार यांचे केंद्रातील स्थान बळकट करण्यासाठी उदयनराजे भोसलेंना मोठय़ा मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा साठे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता तेव्हा खासदार पाटील बोलत होते. मेळाव्याला राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, चंद्रकांत चव्हाण, महादेवशेठ मांढरे आदी उपस्थित होते. केंद्रातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी व संरक्षण देणारे अनेक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही राज्यात कर्जमाफी, कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. उदयन महाराजांना निवडून देणे ही आता सर्वाची जबाबदारी आहे, असेही खासदार पाटील यांनी सांगितले. बैठकीत आनंदराव पाटील, मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ आदींची भाषणे झाली.

सातारा जिल्हा बँकेच्या ठेवी २ हजार कोटींच्यावर - लक्ष्मणराव पाटील
सातारा, ५ एप्रिल/प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २००८-०९ या आर्थिक वर्षांत मार्चअखेर दोन हजार कोटींच्या वर ठेवीचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी दिली. सातारा जिल्ह्य़ाची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेने राष्ट्रीय ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत सलग सहा वेळा उत्कृष्ट कार्यक्षमतेचा पुरस्कार प्राप्त करून राज्यात व देशात नावलौकिक मिळविला आहे. संकलित ठेवींतून जिल्ह्य़ातील शेती व्यवसायाकरिता मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा तसेच विविध सहकारी संस्थांना मागणीनुसार कर्ज पुरवठा केला जात आहे. छोटे व्यावसायिक, व्यापारी, शैक्षणिक कारणासाठी तसेच घर बांधणीसाठी वैयक्तिक स्वरूपाचा कर्जपुरवठा, अनिष्ट तफावतीमधील संस्थांना विशेष कर्जपुरवठा करण्यासाठी या ठेवींचा जास्तीत जास्त वापर करून, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे. बँकेच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्व ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, सहकारी संस्था यांचे विशेष आभार बँकेचे अध्यक्ष खासदार लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व सरव्यवस्थापक अंकुशराव नलावडे यांनी मानले आहेत.

गणेश तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी
मिरज, ५ एप्रिल / वार्ताहर

मिरज शहरातील ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश तलावाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन सरकार हे जाणीवपूर्वक अडथळा आणत असून सांगली महापालिकेने ही सार्वजनिक मालमत्ता समजून विकास करावा, असे निवेदन गणेश तलाव क्रीडा व व्यायाम मंडळाने आयुक्त दत्तात्रय मेतके यांना दिले आहे. गणेश मंडळाचे संस्थापक दत्तात्रय माळवदे यांनी गणेश तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन संस्थाने खालसा झाली, त्यावेळी गणेश तलावाचा समावेश यादीत नसल्याचे म्हटले आहे.
श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांनी तब्बल ६० वर्षांनंतर या तलावावर मालकी सांगण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे नागरिकांची दिशाभूल असून त्यांनी मिरज शहरासाठी आत्मियतेचे कोणतेही कार्य केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गणेश तलावातील पाण्याचा उपसा होत नसल्याने तलावातील जलचर नष्ट होत असून मंडळाच्या मागणीनंतर महापालिकेने कारंजा व धबधबा तयार करून पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले. या ठिकाणी सुशोभिकरणासाठी बगीचा तयार केला. पण तो कुलूपबंद आहे. नौका विहारासारखे प्रकल्प हाती घ्यावेत. महापालिकेने तीन कोटी रूपयांचा आराखडा मंजूर केला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही दत्तात्रय माळवदे यांनी केली आहे.

‘महिलांच्या सुरक्षिततेसाठी भाजपला विजयी करा’
सांगोला, ५ एप्रिल/ वार्ताहर

राज्यात व केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांची सत्ता आहे. या सरकारच्या काळात महिलांवर सर्वाधिक अन्याय झाले आहेत. म्हणून या सरकारने सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असून, उद्याच्या निवडणुकीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी भाजपला सत्तेवर आणावे. त्यासाठी सुभाष देशमुख यांना विजयी करावे, असे आवाहन भाजपच्या माजी नगरसेविका (सोलापूर) चंद्रिका चौहान यांनी केले. सांगोला येथे भाजपचा महिला मेळावा झाला. या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शनकरीत असताना चंद्रिका चव्हाण बोलत होत्या. चंद्रिका चव्हाण पुढे म्हणाल्या, की खासदार सुभाष देशमुख हे देशाातील एकमेव खासदार आहेत की ते दर सोमवारी जनता दरबार भरवतात. सर्व सामान्य व्यक्तींना ते भेटतात. त्यांना कुणाचीही सिफारस चिठ्ठी लागत नाही. ते सर्व सामन्यांचा मोबाईल स्वत: उचलतात. महिलांना सुरक्षितता पाहिजे असेल तर सुभाष देशमुख यांना विजयी करावे असे आवाहन चव्हाण यांनी केले. या महिला मेळाव्यास सौ. इंदुमती भाकरे, सौ. स्मिता सुभाष देशमुख, संध्या पवार, ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज, लोकमंगल दूध शितकरण केंद्राचे सरव्यवस्थापक रामचंद्र गवळी, अ‍ॅड. गजानन भाकरे, प्राचार्य एस., के. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अजिंक्यताऱ्यावर शिवसेनेचा भगवा फडकवणार- पुरुषोत्तम जाधव
सातारा, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

सातारा जिल्ह्य़ाचा विकास हाच मुद्दा घेऊन आपण लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून, सातारच्या अजिंक्यताऱ्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा संपर्कप्रमुख आमदार दगडू सपकाळ, जिल्हाप्रमुख दीपक पवार, उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, वासुदेव माने, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आपली भूमिका सांगताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, आपली लढाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही. शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, वाढते भारनियमन, पाणीप्रश्न घेऊन उदयनराजे यांनी आंदोलन केले. त्याच भावनेने त्यांच्या भूमाता शेतकरी दिंडीत सहभागी झालो होतो. परंतु ज्यांच्या विरोधात ते बोलत होते त्याच पक्षात ते सामील झाल्यानंतर हे प्रश्न कोण सोडवू शकेल याचा विचार करून आपण शिवसेनेत प्रवेश केला. आपला संघर्ष कोणा व्यक्तीविरुद्ध नसून, पक्षाविरुद्ध आहे. लोकसभेत सातारचा खासदार व मुंबईतील गोविंदा हे सर्वात निष्क्रिय ठरले. ही दुर्दैवी प्रतिमा बदलण्यासाठी आपण मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांसाठी दक्षिण भारत, गोवा सोलापूर एसटीची सहल
सोलापूर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाच्यावतीने उन्हाळी सुट्टीनिमित्त मुलांसाठी दर शनिवारी बंगळुरू, म्हैसूर, गोवा आणि मुरुडेश्वर अशी एस.टी. बस सहल काढण्यात येत आहे.
मिनी दक्षिण भारतसह निसर्ग समुद्र दर्शन सहलीत बंगळुरू, म्हैसूर, श्रीरंगपट्टणम, श्रवणबेळगोळ, हळेबीड, बेलूर, धर्मस्थळ, श्रंगेरी, उडुपी, मुरेडश्वर, गोकर्ण, गोवा आणि सोलापूर या गावांचा धर्मस्थळांचा समावेश आहे. ही बससहल दर शनिवारी दुपारी ४ वाजता खास मुलांसाठी निघणार आहे. या सहलीचे शुल्क १७५० रुपये इतके राहणार आहे. यासाठी प्रभाकर माशाळे (९८५०८८२१२०) किंवा ताराचंद राठोड (९९६०७३६७३२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ आगार व्यवस्थापक संजय नेर्लेकर यांनी केले आहे.

अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी
गडहिंग्लज, ५ एप्रिल / वार्ताहर

छ. शिवाजी महाराजांना गौण स्थान देवून मोगलांचे उदात्तीकरण करणारा एन.सी.ई.आर.टी.चा अभ्यासक्रम रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हिंदूू जनजागरण समितीने दिला. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (एन.सी.ई.आर.टी.) अभ्यासक्रम नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. यापूर्वी अभ्यासक्रमातून विकृत इतिहास मांडण्याबरोबच भगतसिंगांचाही दहशवादी म्हणून अपमान केला आहे. यावर्षीच्या इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोगल सम्राटांची माहितीसाठी बहुतांश पृष्ठे खर्ची घातली आहेत. याउलट मोघलांशी लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापण करणाऱ्या शिवरायांचा इतिहास केवळ सहा ओळीमध्ये मांडला आहे. तसेच दहावीच्या पुस्तकातही लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या राष्ट्रपुरुषांचा अवमान केला आहे. हा अभ्यासक्रम त्वरित बदलावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.

गॅस एजन्सी कार्यालय फोडून ७० हजार लंपास
इचलकरंजी, ५ एप्रिल / वार्ताहर

इचलकरंजीतील स्टेशनरोडवरील म्हावशे इन्डेन या गॅस एजन्सीचे कार्यालय फोडून चोरटय़ांनी ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. भरवस्तीत ही घटना घडली. या घटनेची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे.इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील रघुनंदन प्रोसेससमोर चंद्रकांत श्रीरंग म्हावशे यांचे म्हावशे इन्डेन नावाचे गॅस एजन्सीचे दुकान आहे. दुकानाच्या इमारतीतच व्यवस्थापक उमेश पाटील राहतात. उमेश पाटील हे चंद्रकांत म्हावशे यांचे नातेवाईक आहेत. पाटील हे कुटुंबांसह शनिवारी निपाणी येथे गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी दिवसभरात जमा झालेली रक्कम कार्यालयातील काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. आज सकाळी कामगार आल्यानंतर या ठिकाणी चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर अपघातात ११ जखमी
पेठवडगाव, ५ एप्रिल/ वार्ताहर

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पैजारवाडीजवळ मिनीडोअर रिक्षा व मोटारकार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षामधील अकराजण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असून, या सर्व जखमींवर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बोरपाडळेकडून बांववडेकडे चाललेल्या गौतम कांबळेच्या मोटारीची या रिक्षाला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. रिक्षातील प्रवासी जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सर्व शाहूवाडी तालुक्यातील आहेत.