Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

पंतप्रधान ज्यांना व्हायचंय त्यांना होऊ द्या..
बाळासाहेबांनी अडवाणी यांचा नामोल्लेख टाळला

मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी

देशाचा पंतप्रधान जो कोणी होणार असेल, तो होऊ द्या. यापूर्वी झोपाळू, कृपाळू असे अनेकजण पंतप्रधान झाले आहेत. आम्हाला त्यांची सवय झाली आहे. मी मात्र शिवसेनाप्रमुख पदावर समाधानी आहे, असे उद्गार काढत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी ‘रालोआ’चे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना निसंदिग्ध पाठींबा जाहीर करण्याचे आज टाळले. ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप अथवा अडवाणी यांचा नामोल्लेखही केला नाही. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा आरंभ दादर-शिवाजी पार्कवर जाहीर सभेने झाला. आजारपणातून अलीकडचे बरे झालेले शिवसेनाप्रमुखया सभेला हजर नव्हते. त्यांच्या भाषणाची चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली ठाकरे म्हणाले की, सध्या देशात निवडणुका येत आहेत. मजेशीर साटीलोटी सुरु आहेत. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची फुगडी सुरू असनू दुसरीकडे शिवसेना-भाजपचीही फुगडी सुरू आहे. तो रामदास आठवले एकटाच फू फू करत फुगडी घालत आहे. आता छुपी कारस्थाने सुरू होतील. आम्ही मात्र आमचे हात स्वच्छ ठेवले आहेत.

दि ग्रेट गंभीर शो!
वेलिंग्टन, ५ एप्रिल / पीटीआय

किवीभूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न ४१ वर्षांनंतर आता पुन्हा प्रत्यक्षात अवतरणार आहे. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच भारताने ५३१ धावांची ‘गंभीर’ आघाडी उभारून विजयाच्या दिशेने कूच केली आहे. ‘दुसरी भिंत’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या गौतम गंभीरने १६७ धावांची धडाकेबाज खेळी साकारून भारताच्या ऐतिहासिक शतकी विजयाच्या अभियानातील महत्त्वाचा अध्याय लिहिला आहे. डावखुऱ्या गौतम गंभीरने कसोटी कारकीर्दीतील सहावे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सलग दुसरे शतक साकारल्यामुळे भारताने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ५ बाद ३४९ अशी हुकमी मजल मारली आहे.

नामर्द सरकारला खाली खेचण्याचे युतीच्या नेत्यांचे आवाहन
चर्चा बाळासाहेबांच्या मुलाखतीची..

मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी

मराठीच्या नावावर मते मागणारे आज इतर काहीजण उपटलेत. पण मराठीचा आवाज फक्त मी उभा केलाय, हे विसरू नका. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसासाठी. त्यामुळे मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व हा आमचा प्राण आहे. आता बाकीच्यांनी उचलेगिरी केली आणि स्वत:चं म्हणून मांडत आहेत, असा सणसणीत टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पुतणे राज ठाकरे यांना ‘सामना’मधून लगावला आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील बाळासाहेबांच्या आजच्या प्रदीर्घ मुलाखतीचीच चर्चा आज शिवाजी पार्कवर ऐकायला मिळत होती.

शियांच्या मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात ३० ठार
इस्लामाबाद, ५ एप्रिल/पी.टी.आय.

येथे शनिवारी निमलष्करी दलाचा कॅम्प आणि वझिरीस्तानमध्ये दहशतवादी हल्ले केल्यानंतर पाकिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा रविवारीही आपली रक्तरंजित खेळी चालूच ठेवली आहे. येथून ९० कि.मी. अंतरावरील चकवाल येथे शिया पंथियांच्या मशिदीमध्ये घुसून करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ३० भाविक ठार झाले असून अन्य २०० जखमी झाले आहेत. रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथील रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आले असून त्यातील १० जणांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ आहे.

ट्वेन्टी-२० न खेळता भाष्य करू नका..
शाहरूखचा गावसकर यांच्यावर बाऊन्सर

मुंबई, ५ एप्रिल/क्री.प्र.
सुनील गावसकर हे एक महान फलंदाज होते. त्यांचा मी आदर करतो. पण ट्वेन्टी-२० हा क्रिकेटचा नवीन प्रकार आहे. त्यांनी ट्वेन्टी-२० क्रिकेट न खेळल्यामुळे यासंदर्भात भाष्य करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांना जर काही वाटत असेल तर आयपीएलमधील एखादा संघ खरेदी करून त्यावर त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करावी. क्रिकेटचे हित कशात आहे हे आम्हाला माहीत असून हे सांगण्याची त्यांना गरज नाही, अशा शब्दांत कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.

लखनौमध्ये संजय दत्तऐवजी आता नफिसा अली
नवी दिल्ली, ५ एप्रिल/पी.टी.आय.

अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांंपेक्षा अधिक शिक्षा झालेली असल्याने त्याला लोकसभेची निवडणूक लढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध केल्यामुळे समाजवादी पार्टीने आता लखनौमधून संजय दत्तऐवजी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्यां नफिसा अली लोकसभेची उमेदवारी दिली आहे. या आधी २००४ मध्ये नफिसा अली यांनी दक्षिण कोलकाता मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती; मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या. याबाबत पत्रकारांशी बोलताना समाजवादी पार्टीचे सरचिटणीस अमरसिंह म्हणाले की, नफिसा अली या आपल्या वैयक्तिक स्नेही आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कोणताही मजबूत पाया नसलेल्या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार की समाजवादी पार्टीचे लखनौमधून प्रतिनिधित्व करणार असे आपण त्यांना विचारले असता त्यांनी आपला मुलायमसिंह यादव यांच्या निधर्मी विचारसरणीवर विश्वास असल्याने आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. नफिसा अली या आता लखनौमध्ये आपला किती प्रभाव पाडतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून
उत्तर कोरियाची लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची चाचणी
सोल ५ एप्रिल/पीटीआय
उत्तर कोरियाने आज कुणालाही न जुमानता लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची चाचणी केली. या घटनेनंतर लगेचच शेजारी देश तसेच अमेरिकेने उत्तर कोरियावर आगपाखड केली आहे. उत्तर कोरियाने त्यांच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या चाचण्यांना प्रारंभ केला असल्याचेच यातून दिसून येते असे अमेरिकेने म्हटले असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रक्षेपण तळावरून सकाळी साडेअकरा वाजता हा अग्निबाण सोडण्यात आला.

श्रीलंकेमध्ये चकमकीत ४२० तामीळ बंडखोर ठार
कोलंबो, ५ एप्रिल/पी.टी.आय.
देशाच्या उत्तरेकडील एलटीटीईचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुडुकुडिरीयिरीप्पू या शहरावर श्रीलंकेच्या लष्कराने ताबा मिळवला असून हा बालेकिल्ला घेताना लष्कराने केलेल्या संघर्षांमध्ये एलटीटीईचे ४२० गनिम ठार केल्याचा दावा केला आहे. गेले तीन दिवस लष्कर आणि लिट्टे यांच्यात ही चकमक चालू होती. चकमकीच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी या शहराच्या युध्दभूमीतून लिट्टेच्या ४२० गनिमांची शवे ताब्यात घेण्यात आल्याचे श्रीलंकेच्या लष्कराचे प्रवक्ते उदया नानायकारा यांनी सांगितले. या चकमकीत लिट्टेने आपले अनेक पुढारी गमावले असून विदुशा, नागेश, दुर्गा, दीपन आणि पाताबी अशी या नेत्यांची नावे असल्याचे नानायकारा म्हणाले. पुडुकुडिरीयिरीप्पू शहराचा सर्व परिसर श्रीलंकेच्या लष्कराने ताब्यात घेतला असून लिट्टेचा अखेरचा बालेकिल्ला उध्द्वस्त केल्याचे ते म्हणाले. याच चकमकीत लिट्टेचा सगळयात ज्येष्ठ पुढारी बानू जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र अनधिकृत सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार लिट्टेच्या गनिमांनी २० कि.मी.च्या या युध्दभूमीच्या परिसरातून सर्व नागरिकांना ओलीस म्हणून ठेवले आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी