Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ाला बगल
शंकराप्रमाणे तिसरा डोळा उघडा - अडवाणी

गणेश कस्तुरे, देगलूर, ५ एप्रिल

‘‘छोटी-छोटी राज्ये केल्यामुळे विकास होतो. बिहारचे विभाजन करून झारखंड, मध्य प्रदेशचे विभाजन करून छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशचे विभाजन करून उत्तराखंड राज्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निर्माण केले,’’ असा दावा करून तेलंगणासारखी छोटी छोटी राज्ये व्हावेत ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आज सांगितले. वेगळ्या विदर्भावर भाष्य करण्याचे कटाक्षाने त्यांनी टाळले; या मुद्दय़ाला त्यांनी बगलच दिली!

कराडांनाच हाबाडा!
घ्राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील उमेदवार रमेश आडसकर यांच्याअंबाजोगाई येथे प्रचारसभेत अनेक वक्त्यांची भाषणे झाली. पण गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बोलणाऱ्या फुलचंद कराड यांची मोठी फसगत झाली. भाषण करताना कराड यांनी उपस्थित लोकांना हात वर करण्यास सांगितले आणि तेव्हा फक्त पाच-सहा लोकांनीच हात वर केले. पंधरा हजारांच्या सभेत फक्त पाचच कराड समर्थक उपस्थित असल्याचे त्यांच्याच भाषणामुळे दिसून आले. त्यामुळे खसखस पिकली. गोपीनाथरावांना हाबाडा देण्याची भाषा करणाऱ्या फुलचंदरावांनाच कधी हाबाडा बसला हे कळले नाही!

बंधनात मुक्त मी
एक दिवस ‘आपल्यासाठी’ म्हणून मुद्दाम ठरवलं. मनावर ओझं घेऊन काहीही करायचं नाही. कसलीही घाई करायची नाही. कुणामुळं आपल्याला विचलित होऊ द्यायचं नाही. कुणाचं मनावर घ्यायचं नाही. कुणी दुखवलं, मनावर घ्यायचं नाही. खूप आनंद व्हावा, असं कुणी आपल्या बाबतीत वागलं, जास्त हुरळून जायचं नाही. शांत चित्ताच्या एका बिंदूपाशी स्थिर राहायचं. इकडं-तिकडं जराही हलायचं नाही. नाही तर इतर दिवसात आणि आपल्या अशा स्वत:साठी असलेल्या दिवसात काही फरक राहणार नाही. वाटलं तर बाहेर फिरून यायचं.

‘गुरू’ला भास आणि ‘शिष्या’ला आस!
आसाराम लोमटे

रणांगणात शत्रूच खरा गुरू असतो. कारण त्याची चाल आपल्याला रणनीती ठरवायला भाग पाडत असते. लोकसभेच्या परभणी मतदारसंघातील लढाई गुरू-शिष्याची असली तरीही ‘गुरू’ला दीड तपाचे लागलेले ग्रहण आणि दरम्यानच्या काळात शिष्याने जिल्ह्य़ाच्याच राजकारणाची हाती घेतलेली सूत्रे या पाश्र्वभूमीवर ही लढत सरळ राहिलेली नाही. गुरू गाफील राहिल्यानेच शिष्याला आपले साम्राज्य निर्माण करता आले, हा इतिहास असला तरीही त्यापासून गुरू काहीच बोध घ्यायला तयार नाहीत. मतदानाआधीचजिंकल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या गुरूला शिष्याने डावपेचात कधीच मागे टाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

‘स्वीस बँकेत पैसा गुंतविणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर करा’
औरंगाबाद, ५ एप्रिल/खास प्रतिनिधी

काळा पैसा गुंतविण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांत विशेषत: स्वित्र्झलडचा दौरा करणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांची यादी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आज पत्रकार बैठकीत केली. या वेळी भा. ज. प.चे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी, प्रचारप्रमुख विनोद तावडे उपस्थित होते. संरक्षण, विकास आणि सुशासन या तीन मुद्दय़ांवर श्री. अडवाणी यांनी भाष्य केले.

दोन वर्षांत वीजकपात हद्दपार करू - गडकरी
नांदेड, ५ एप्रिल/वार्ताहर

राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सत्ता आली की, दोन वर्षांमध्ये राज्य वीजकपातमुक्त करू, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांनी आज दिली. नांदेड मतदारसंघातील भा. ज. प.चे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ देगलूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पवार, आमदार सुभाष साबणे व अनसूया खेडकर, हेमंत पाटील, रोहिदास चव्हाण, खासदार डी. बी. पाटील आदी उपस्थित होते.

‘विकास निवडणार की विध्वंस?’
लातूर, ५ एप्रिल/वार्ताहर

एकीकडे देशाला काँग्रेसने विकासाची परंपरा दिली, तर दुसरीकडे विकृत विचार मांडत विध्वंस करण्याचे काम भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची मंडळी करीत आहेत. जनतेने यातील कोणता पर्याय योग्य आहे ते स्वत: ठरवावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले.
काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव आवळे यांच्या प्रचारास काल रात्री टाऊन हॉलच्या मैदानावर श्री. देशमुख यांच्या सुरुवात झाली. त्या वेळी ते बोलत होते. सभेस सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, क्रीडामंत्री दिलीप देशमुख, आमदार विक्रम काळे, व विलासराव उंडाळकर, गुलाबराव घोरपडे, अमित देशमुख, त्र्यंबकदास झंवर, बसवराज पाटील नागराळकर, नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे उपस्थित होते.

पुन्हा दर्शन दुराव्याचे!
हरिहर धुतमल. लोहा, ५ एप्रिल

मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात दुरावा असल्याचे चित्र आज पुन्हा पाहायला मिळाले. लातूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव आवळे यांच्या प्रचारासाठी माळाकोळी येथे आयोजित सभेत या दुराव्याचे दर्शन घडले. मुख्यमंत्रीसमर्थक एकही प्रमुख पदाधिकारी या सभेकडे फिरकला नाही.

आमचा जाहीरनामा
युवक विकासाचे बोला की राव!

जाहीरनामा म्हणजे निव्वळ फसवाफसवी! जगाच्या सर्वात बलवान अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या अध्यक्षपदी बराक ओबामा यांची निवड जगभरातील तरुणांना सुखद आनंद देणारी ठरली. आपल्या देशामध्ये मात्र स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हुतात्मा राजगुरु, शहीद भगतसिंग आदी तरुण क्रांतिकारकांच्या आत्मबलिदानाचे केवळ पोवाडे गायिले जातात. लोकसभेत अनेक तरुणांना संधी मिळते. प्रत्यक्षात मात्र ज्येष्ठ मंडळींकडून तरुण खासदारांना तयार करण्यासाठी पुरेशी संधी मिळत नाही. देशातील तरुण बलशाली भारताचा मोठा आधारस्तंभ आहे. परिणामी प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात युवक विकासासाठी सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे.

सर्वागीण विकास हेच आमचे धोरण
उस्मानाबाद जिल्ह्य़ाला मिळणारे २१ टी. एम. सी. पाणी, उजनी जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा उस्मानाबादला पुरवठा आणि रेल्वेच्या नकाशावर उस्मानाबाद हे नाव आणण्यासाठी डॉ. पद्मसिंह पाटील आणि शरद पवार हे नेतेच सातत्याने कार्यरत होते. त्यांच्यामुळेच ही कामे झाली. जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असणारा नेता म्हणून डॉ. पद्मसिंह पाटीलच योग्य उमेदवार आहेत, अशी मतदारांची भावना आहे. त्यामुळेच या निवड-णुकीत त्यांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी ठामपणे उभी आहे.

दानवे यांच्याविरुद्ध तीन,काळे यांच्याविरुद्ध दोन खटले
जालना, ५ एप्रिल / वार्ताहर

जालना लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध तीन तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्याविरुद्ध दोन खटले विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. दानवेंविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या १३३ कलमान्वये खटला प्रलंबित आहे. भोकरदन येथील प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी न्यायालयात भारतीय दंड विधानाच्या ३२३, ३२५, ५०४, ३४ कलमांन्वये खटला प्रलंबित आहे. जालना येथील प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी न्यायालयात मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमांन्वये खटला प्रलंबित आहे. डॉ. कल्याण काळे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन, चिकलठाणा, औरंगाबाद येथे भारतीय दंड विधानाच्या १४७, १४९, ३२३, ४४७ कलमांन्वये गुन्हा दाखल असून मुख्य न्याय दंडाधिकारी औरंगाबाद यांच्या न्यायालयात खटला प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे करमाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या १४३, ३४१, १३५ कलमांन्वये गुन्हा दाखल असून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी औरंगाबाद (न्यायालय क्र. ९) येथे खटला प्रलंबित आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपल्या नामनिर्देशनपत्रांमध्ये ही माहिती दिली आहे.

उपेक्षितांच्या न्यायासाठी मुंडेंना विजयी करा - पंकजा पालवे
अंबाजोगाई, ५ एप्रिल/वार्ताहर

बीड जिल्ह्य़ातील ऊसतोड मजुरांसह रेल्वे प्रश्न, महिला, शेतकरी, तरुण यांच्या प्रश्नांची जाण फक्त आमदार गोपीनाथ मुंडे यांनाच आहे. प्रश्न सोडवून जिल्ह्य़ाच्या उपेक्षितांना न्याय देण्यासाठी आमदार मुंडे यांनाच विजयी करा, असे आवाहन पंकजा पालवे यांनी केले. श्री. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ पंकजा पालवे यांनी अंबाजोगाईत प्रचार दौरा काढला. शहरातील गांधीनगर, सदर बाजार, ईदगाह रोड, बलुत्याचा मळा, करबला वेश, रविवार पेठ, परळी वेश आदी भागात प्रचार सभा झाल्या. पंकजा पालवे म्हणाल्या की, अंबाजोगाई शहराने देशाच्या राजकारणात दोन तेजस्वी हिरे दिले आहेत आणि दोघांचीही ही कर्मभूमी आहे. बीड जिल्ह्य़ातील विविध प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यात रेल्वे प्रश्नावर आजपर्यंत राजकारण झाले आहे. मात्र हा प्रश्न मुंडेच मार्गी लावू शकतात. सर्व मतदारांनी आपल्याला कसा खासदार हवा हे आत्ताच निश्चित करण्याची वेळ आली आहे.
या वेळी राजेंद्र लोमटे, शिवसेनेचे अशोक गाढवे, मदन परदेशी आदींची भाषणे झाली. सभेस गयाबाई कराड, वैशाली विर्धे, सुमन लाड, डॉ. नयना सिरसट उपस्थित होत्या.

‘पवारांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत’
गेवराई, ५ एप्रिल/वार्ताहर

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व त्यांचे पुतणे, जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाही, असे मत क्रांती सेनेचे उमेदवार प्रमोद (परमेश्वर) मोटे यांनी व्यक्त केले.
आर्थिक निकषावर आरक्षण देणार असा जाहीरनामा काढून राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत सत्ता मिळविली. त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडणाऱ्या आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्यावर या दोन्ही नेत्यांनी अन्याय केला, असे सांगून श्री. मोटे म्हणालेक की, मराठा-मुस्लीम समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे खोटे आश्वासन ते देत आहेत. परंतु मतदारराजा आता अशा भूलथापांना बळी पडणार नाही. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. मोटे म्हणाले की, ५० वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या पवारांनी मराठा समाज किंवा बहुजन समाजासाठी काहीही केले नाही. आता खोटय़ा आश्वासनांची बरसात ते करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीत बारामतीचे उदाहरण देऊन जातीच्या नावाखाली भावनिक आवाहन करून पवारांनी महाराष्ट्रातील मराठा जनतेची मते घेतली.

बीड मतदारसंघात तीन निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या
बीड, ५ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या बीड मतदारसंघासाठी तीन निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्तया करण्यात आल्या असून, यात गेवराई व माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी मधुकर गुप्ता तर परळी विधानसभा मतदारसंघासाठी नवनीत आणि आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी बी. के. वर्मा यांचा समावेश आहे. तीनही निवडणूक निरीक्षकांचे वास्तव्य हे तालुका ठिकाणावरील शासकीय विश्रामगृहात असून निवडणुकीसंबंधी त्यांच्याशी संपर्क साधता येईल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शांतिगिरी महाराज लढणार कोठून यावर आज निर्णय
औरंगाबाद, ५ एप्रिल/प्रतिनिधी

वेरुळ येथील जनार्दनस्वामी मठाचे शांतिगिरी महाराज मौनगिरी यांनी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे औरंगाबादबरोबरच नजीकच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मात्र दोन्हीपैकी कोणत्या मतदारसंघातून लढायचे याचा निर्णय उद्या (सोमवारी) जाहीर करण्यात येणार आहे.जनार्दन स्वामी यांचा आदेश ६ एप्रिलला येणार असून त्यानुसार सर्व काही ठरेल, असे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले होते. दरम्यान उद्या नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातील भक्त मंडळींची बैठक होणार असल्याचे मठाचे विश्वस्त दादासाहेब अधाने पाटील यांनी सांगितले. सकाळी साडेअकरा वाजता दोन्ही जिल्ह्य़ातील भक्त मंडळांच्या बैठकीस सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता कोठून लढायचे याचा निर्णय स्वत: शांतिगिरी महाराज जाहीर करणार आहेत. आमच्याच मतदारसंघातून लढा, असा दोन्हीही जिल्ह्य़ातील भक्त मंडळींचा आग्रह असल्याचे अधाने पाटील यांनी सांगितले. शांतिगिरी महाराज काय निर्णय घेतात याकडे शिवसेनेसह काँग्रेसच्या उमेदवाराचेही लक्ष लागले आहे. ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे महाराज कोठून उमेदवारी अर्ज मागे घेतात हा सध्या दोन्ही मतदारसंघातील चर्चेचा विषय आहे.

दुचाकींच्या वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
औरंगाबाद, ५ एप्रिल/प्रतिनिधी

दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार झाले. एक अपघात आज सकाळी फुलंब्रीनजीक तर दुसरा काल सायंकाळी नक्षत्रवाडी येथे झाला. दोन्हीही अपघातात दुचाकी झाडावर आदळली. दत्ता शिवलाल सोनवणे (२७, रा. कोलते पिंपळगाव, ता. भोकरदन) आणि दिलीप प्रभाकर ढाके (४०, रा. पैठण) अशी मृतांची नावे आहेत. दत्ता सोनवणे हे आज सकाळी कोलते पिंपळगाव येथून फुलंब्रीकडे येत होते. वाटेतच त्यांची दुचाकी झाडावर आदळली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दुसरी घटना काल सायंकाळी नक्षत्रवाडी येथे घडली. ढाके हे औरंगाबादकडे येत असताना त्यांची दुचाकी झाडावर आदळली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

अक्षरधारा माय मराठी शब्दोत्सवाचे उद्घाटन
औरंगाबाद, ५ एप्रिल/खास प्रतिनिधी

अक्षरधाराच्या वतीने आयोजित माय मराठी शब्दोत्सवाचे उद्घाटन मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा पद्मा तापडिया यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन २६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. वाचन ही चिंतन करायला लावणारी गोष्ट आहे. इतर अनेक माध्यमांपेक्षा ग्रंथांचे महत्त्व अधिक आहे. सकारात्मक दृष्टी असेल तर कुठलीही गोष्ट संपत नाही. तीच दृष्टी अक्षरधाराने ठेवल्यामुळे ते १४ वर्षांपासून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. अक्षरधारा म्हणजे ज्ञानाचा जागरच आहे, असे मत साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी व्यक्त केले. या वेळी विकास रायमाने, अक्षराधाराचे लक्ष्मण राठीवडेकर, बाबा भांड, रुस्तुम अचलखांब, श्रीकांत काशीकर आणि मधुकरअण्णा वैद्य आदी उपस्थित होते.

विकासासाठी काँग्रेसला विजयी करा - हर्षवर्धन पाटील
लोहा, ५ एप्रिल/वार्ताहर

केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने शेतकरी व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेअसून विकासासाठी आपण काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि भास्करराव पाटील-खतगावकर यांना विजयी करा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी सोनखेड येथे केले.
नांदेड मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या प्रचारार्थ सोनखेड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शंकरअण्णा धोंडगे होते. व्यासपीठावर अमिता चव्हाण, कल्याण सूर्यवंशी, ओमप्रकाश पोकर्णा आदींची उपस्थिती होती. हर्षवर्न पाटील म्हणाले, केंद्राने शेतकऱ्यांना कर्ज माफ केले. राज्य सरकारनेही कर्जमाफी दिली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विकासाला साथ द्या. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून खतगावकरांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी मोठय़ा संख्येने मतदार उपस्थित होते.

‘धर्माध शक्तींपासून जगाला धोका’
औसा, ५ एप्रिल/वार्ताहर

धर्माध माणसे धर्माबद्दल बोलतात, इतरांना शिकवण देतात; परंतु तेच धर्माच्या शिकवणीप्रमाणे वागत नाहीत. या धर्मांध शक्तीपासून जगाला धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण भारत एकसंघ राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइंच्या उमेदवाराचा प्रचार करावा, असे आवाहन क्रीडा व भूकंप पुनर्वसन मंत्री दिलीपराव देशमुख यांनी औसा येथील बैठकीत केले.
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ औसा व निलंगा तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. माजी आमदार शिवशंकर उटगे अध्यक्षस्थानी होते.
श्री. देशमुख म्हणाले, इतरांबरोबर प्रेमाने वागावे, ही प्रत्येक धर्माची शिकवण आहे. ज्यांनी हातात तलवार घेऊन धर्माची शिकवण देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना अपयश आले आहे. राजा अशोक यांनासुद्धा हातातील तलवार टाकावी लागली. त्या वेळी धर्माचा प्रचार करता आला. दोन भाऊ बाजूला राहिले तरी त्यांचे गोत्र बदलत नाही. याप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वधर्मसमभाव हेच सूत्र आहे. याच सुत्रामुळे मी आमदार व मंत्री झालो. ही लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत मतभेद विसरून कामाला लागा. या भागातील विरोधक चलाख आहे. हाताने घडय़ाळ जपले पाहिजे. कुठे बंद पडणार नाही, कुणी सेल काढणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

बनवसमध्ये राजकारण्यांना ‘प्रवेश बंद’
गंगाखेड, ५ एप्रिल/वार्ताहर

पालम तालुक्यातील बनवस हे गाव म्हणजे नांदेड, लातूर व परभणी जिल्ह्य़ांच्या सीमावर्ती भागावरील दुर्लक्षित व दळणवळणाचा अभाव असलेले गाव. राजकीय मंडळींनी निवडणुकीत दिलेल्या भुलथापांना बळी पडलेल्या ग्रामस्थांना जिल्हाधिकारी प्रशासनानेही उपेक्षित केल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केल्यानंतर आता राजकीय पुढाऱ्यांनाही ‘गाव बंदी’ करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. लव्हराळ ते माळेगाव हा सात कि.मी.चा रस्ता, बनवस ते माळेगाव हा सहा कि.मी.चा रस्ता तसेच बनवस ते चोरवड रस्त्याचे अर्धवट सोडलेले काम करण्याचे राजकारण्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने ग्रामस्थांची सहनशीलता अखेर संपली आहे. प्रथम गावक ऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी प्रशासनास त्वरित रस्ता बांधकाम न झाल्यास लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकल्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने, ग्रामस्थांत प्रचंड संताप पसरला. अखेर ग्रामस्थांनी ज्यांच्या इशाऱ्यावर प्रशासन चालते अशा राजकारण्यांनासाठी गाव बंदी फलकच गावाच्या मुख्य चौकात लावला आहे. विशेष म्हणजे बनवस परिसरातील क्षेत्रातील गावांनीही या उपक्रमास जाहीर पाठिंबा व्यक्त करीत रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवल्याने राजकारण्यांना या नवीनच संकटाला कसे सामोरे जावे, हा यक्षप्रश्न पडला आहे.

पंतप्रधानपदासाठी पवारांना पाठिंबा - विनय कोरे
भोकर, ५ एप्रिल/वार्ताहर

जनसुराज्य शक्तीच्या उमेदवार प्रिती शिंदे निवडून आल्या तर पंतप्रधानपदासाठी मराठी माणूस म्हणून शरद पवारांना पाठिंबा राहील, असे प्रतिपादन जनसुराज्य शक्तीचे संस्थापक विनय कोरे यांनी केले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीच्या उमेदवार प्रिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी भोकरच्या मोंढा मैदानावर जाहीर सभा झाली. त्यावेळी विनय कोरे बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून मते मागतो तर भाजप हिंदुत्ववाद पुढे करतो.स्वार्थी राजकारणामुळे देशात गरीब हा गरीबच राहिला तर श्रीमंत माणूस श्रीमंत होत गेला. प्रिती शिंदे यांनी गुंडागर्दीचे राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा असे आवाहन केले.

मुंडे यांना विरोध नाही - मेटे
बीड, ५ एप्रिल/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे मराठा आरक्षण समन्वय समितीचा त्यांना आता विरोध नाही, अशी घोषणा समन्वय समितीचे प्रमुख माजी आमदार विनायक मेटे यांनी आज केली. जिल्हा मराठा आरक्षण समन्वय समितीची आज बैठक झाली. त्यानंतर बैठकीतील निर्णयाची माहिती समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीनंतर महिन्याभरात आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होऊन आरक्षण समितीत सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते असल्यामुळे कोणत्याच पक्षाला विरोध अथवा पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय झाला. पण आरक्षणाला विरोध करणारे मुंडे-भुजबळ यांना त्यांच्या मतदारसंघात विरोध करण्याचा निर्णयही झाला होता. श्री. मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाला आपला विरोध नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षण समन्वय समितीचा विरोध नाही. मुंडे यांच्याप्रमाणेच छगन भुजबळ यांचे मतपरिवर्तन झाले तर त्यांनाही समिती विरोध करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मात्र आपली पक्षीय भूमिका वेगळी असेल, अशी पुष्टीही मेटे यांनी जोडली.

तामिळनाडूला गेलेले पोलीस मोकळ्या हाताने परतले
जिंतूर, ५ एप्रिल/वार्ताहर

संसारोपयोगी वस्तू अध्र्या किमतीत देण्याचे आमीष दाखवून जिंतूरवासियांना तीन कोटींना लुटणाऱ्या बालाजी नाडल व त्याच्या सहकाऱ्याच्या शोधात तामिळनाडूला गेलेले जिंतूर येथील पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले. तामिळनाडूतील बालाजी नाडल व त्याच्या सहकाऱ्यांनी रॉयल ट्रेडर्सच्या नावाने १५ डिसेंबर २००८ रोजी दुकान थाटले. घरातील संसारोपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवले. या वस्तू अध्र्या किमतीत दिले जाणार असल्याचे आमीष दाखविण्यात आले. मात्र त्यांची किंमत १५ दिवस आधी भरण्याची अट ठेवण्यात आली. वस्तू अध्र्या किमतीत मिळत असल्याने शहरातील अनेकांनी आगाऊ रक्कम जमा केली. बालाजी नाडल याने सुरुवातीला काहींना सामानाचे वितरण केले. वस्तू मिळत असल्याने लोकांचा विश्वास वाढला. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात सामानाची आगाऊ रक्कम लोकांनी भरली. मात्र १२ जानेवारी २००९ ला बालाजी नाडल व त्याचे सहकारी जिंतूरवासियांना तीन कोटींचा चुना लावून फरार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक खुशाल शिंदे व पोलीस कर्मचारी या लुटारूंच्या शोधार्थ तामिळनाडूला गेले. परंतु तेथून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

तंटामुक्त गाव मोहिमेत सारोळा अव्वल स्थानी
सिल्लोड, ५ एप्रिल/वार्ताहर

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्हा पातळीवर पहिले तीन लाख रुपयांचे बक्षीस सिल्लोड तालुक्यातील सारोळा गावाने पटकाविले. पोलीस उपअधीक्षक विश्वनाथ जटाळे यांच्या हस्ते या बक्षिसाचा धनादेश रविवारी सिल्लोड पंचायत विस्तार अधिकारी प्रभाकर दौड व ग्रामसेवक सुनील मंगरुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. बक्षीस वितरण सोहळ्यास अजिंठय़ाचे सहायक पोलीस निरीक्षक शिरीष वाघ, पत्रकार राजेश चोबे, नीलेश सोनटक्के, प्रकाश वराडे, गजानन जाधव आदी या वेळी उपस्थित होते. जटाळे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, शांततेच्या मार्गातूनच विकासाचा मार्ग जात असल्याने आता तंटामुक्तीनंतर सारोळा येथील ग्रामस्थ अधिक जोमाने विकासाकडे लक्ष देतील.पत्रकार राजेश चोबे यांनी सांगितले की,सरकार व नागरिक यांच्या समन्वयाने समाजात निश्चित बदल घडू शकतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख विश्वनाथ काकडे यांनी केले. या वेळी या गावच्या तलाठी रोहिणी होळंबे, सरपंच नारायण लहाने, उपसरपंच प्रभाकर बांबर्डे, श्रीरंग वाघ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम वराडे आणि गावकरी उपस्थित होते.

‘विद्यार्थ्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे’
लातूर, ५ एप्रिल/वार्ताहर

जागतिकीकरणाच्या या युगात गॅट करारानुसार परदेशातील शिक्षणसंस्था स्वत:ची केंद्रे भारतात स्थापन करत आहेत त्यामुळे शिक्षक, प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी केले. अभिनव अध्यापक महाविद्यालयात २००८-०९ च्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रा. सुधाकर कुलकर्णी, प्रा. सुशीला पिंपळे, प्रा. गोपाळ पवार, नवनाथ घोडके उपस्थित होते. डॉ. गोरे म्हणाले की, कौशल्यपूर्ण, गुणवत्ताधारक, विकसित व्यक्तिमत्त्वाचे व सकारात्मक दृष्टिकोन बाळगून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनाच नोकरीच्या संधी अधिक आहेत. फक्त नोकरीच करायची हे अंतिम ध्येय न मानता स्वत:च्या पायावर उभे राहता येणाऱ्या शिक्षणप्रणालीचा पुरस्कार करण्याचे आवाहन त्यांनी केले. निरोप समारंभाप्रसंगी उत्तरा लामतुरे, सुवर्णा देशमुख, प्रतिभा बुरले, बालिका शिंदे, हणमंत करळे, अजय सोमवंशी, अशोक गुमनाळे, मारुती कोकरे, विनोद करदुरे, विनायक येवले आदी प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील डोपे यांनी केले तर आभार जीवन डांगे यांनी मानले.