Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दि ग्रेट गंभीर शो!
वेलिंग्टन, ५ एप्रिल / पीटीआय

किवीभूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न ४१ वर्षांनंतर आता पुन्हा प्रत्यक्षात

 

अवतरणार आहे. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच भारताने ५३१ धावांची ‘गंभीर’ आघाडी उभारून विजयाच्या दिशेने कूच केली आहे. ‘दुसरी भिंत’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या गौतम गंभीरने १६७ धावांची धडाकेबाज खेळी साकारून भारताच्या ऐतिहासिक शतकी विजयाच्या अभियानातील महत्त्वाचा अध्याय लिहिला आहे.
डावखुऱ्या गौतम गंभीरने कसोटी कारकीर्दीतील सहावे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सलग दुसरे शतक साकारल्यामुळे भारताने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ५ बाद ३४९ अशी हुकमी मजल मारली आहे. राहुल द्रविड (६०) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (६१) यांनीही अर्धशतके झळकावित भारताच्या खंबीर फलंदाजीचे प्रत्ययकारी दर्शन घडविले. अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला. त्यावेळी युवराज सिंग आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनुक्रमे १५ आणि १६ धावांवर खेळत होते. आता सोमवारी अर्धा तास लवकर खेळ सुरू होईल.
सामन्याचे अद्याप दोन दिवस शिल्लक असतानाच भारताने २-० अशा फरकाने मालिका जिंकण्याचे निश्चित केले आहे.
नेपियरमधील दुसऱ्या कसोटीत ६४२ मिनिटे किल्ला लढवून सामना वाचविणारी १३७ धावांची खेळी साकारणाऱ्या गंभीरने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही तब्बल सहा तास नेटाने फलंदाजी केली. यात त्याने दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. राहुल द्रविडसोबत दुसऱ्या विकेटसाठी १७० आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत चौथ्या विकेटसाठी १०६ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताच्या फलंदाजीला स्थर्य लाभले.
गंभीरने दोन शतकांसह मालिकेत एकंदर ४४५ धावा जमविल्या आहेत. त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर ३४४, राहुल द्रविड ३१४ आणि व्हीव्हीएस लक्ष्मण २९५ यांच्यापेक्षा तो स्पष्टपणे पुढे आहे.
गेल्या वर्षीच्या जुलैपासून २२ डावांत गंभीरने १५५६ धावा जमविल्या आहेत. १६ चौका आणि दोन षटकारांसह फुलणारी गंभीरची खेळी द्विशतकाकडे कूच करीत असतानाच दुसऱ्या नव्या चेंडूने त्याचा घात केला. ८८व्या षटकात इयान ओ’ब्रायनने त्याला पायचीत केले.
बसिन रिझव्‍‌र्हच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर अंकुश निर्माण करण्यासाठी जंग जंग पछाडले. फलंदाजीसाठी नंदनवन ठरू पाहणाऱ्या या खेळपट्टीवर गोलंदाजांना पुरेशी साथ न मिळाल्यामुळे वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही.
कर्णधार डॅनियल व्हेटोरी आणि ओ’ब्रायन सर्वात यशस्वी किवी गोलंदाज ठरले. त्यांनी अनुक्रमे ८८ आणि ७७ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी दोन बळी मिळविले.