Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नामर्द सरकारला खाली खेचण्याचे युतीच्या नेत्यांचे आवाहन
चर्चा बाळासाहेबांच्या मुलाखतीची..
मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी
मराठीच्या नावावर मते मागणारे आज इतर काहीजण उपटलेत. पण मराठीचा आवाज फक्त मी

 

उभा केलाय, हे विसरू नका. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसासाठी. त्यामुळे मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व हा आमचा प्राण आहे. आता बाकीच्यांनी उचलेगिरी केली आणि स्वत:चं म्हणून मांडत आहेत, असा सणसणीत टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पुतणे राज ठाकरे यांना ‘सामना’मधून लगावला आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील बाळासाहेबांच्या आजच्या प्रदीर्घ मुलाखतीचीच चर्चा आज शिवाजी पार्कवर ऐकायला मिळत होती.
केंद्रातील आणि राज्यातील काँग्रेसचे सरकार हे नामर्दाचे सरकार आहे, त्यांनी मर्दासारखी एकही गोष्ट केलेली नाही, असा टीकेचा सूर आज शिवाजी पार्क येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराच्या सभेत युतीच्या सर्वच नेत्यांनी लावला. प्रकृतीच्या कारणास्तव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे युतीचे स्टार प्रचारक जाहीर सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेले आवाहन ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत इतकेच नव्हे तर ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून त्यांची सुरू झालेली मॅरॅथॉन मुलाखत हाच युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आहे, अशी भावना तमाम शिवसैनिक व्यक्त करीत होते.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी युतीच्या प्रचाराची पहिली जाहीर सभा आज शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे तर प्रमोद महाजन हे हयात नसल्याने या नेत्यांच्या अनुपस्थितीतही शिवसैनिकांचा उत्साह मावळलेला दिसत नव्हता. आज दुपारपासूनच शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा भगवे झेंडे लावलेले दिसत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी झिंदाबाद, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्या लाडक्या नेत्यांची छबी, भगवे झेंडे, बिल्ले यांची विक्री करणाऱ्यांची गर्दीही मोठय़ा प्रमाणावर होती.
दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकण्याचा मार्ग मुंबईतून जातो, असे प्रास्ताविक करण्यात आल्यानंतर युतीच्या नेत्यांनी आपल्या भाषणांत काँग्रेसच्या सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईतील मुख्य समस्या ही पाण्याच्या टंचाईची आणि वाहतुकीच्या कोंडीची आहे. जनतेच्या हिताचे अनेक प्रकल्प युतीच्या सरकारने राबविले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून या मुंबईत उड्डाणपूल बांधण्यात आले. मात्र काँग्रेसच्या सरकारला एकही पूल बांधता आला नाही अशी टीकाही करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेली असतानाही देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला काँग्रेसचे सरकार अद्याप फासावर लटकवू शकलेले नाही, असे दिल्लीतील नामर्दाचे सरकार आहे, अशी टीकाही या वेळी वक्त्यांनी केली.
या सभेसाठी ‘कमळा’मध्ये ‘धनुष्य-बाण’ असलेले व्यासपीठ तयार करण्यात आले होते. व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना मोठे पडदे लावून त्यावर जाहीर सभेचे प्रसारणही करण्यात येत होते. शिवसेनाप्रमुखांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारे भाषणही याच पडद्यांवरून प्रसारित करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची छबीही लक्ष वेधून घेत होती. या वेळी गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, रामदास कदम, गोपाळ शेट्टी, संजय राऊत आदी नेत्यांची भाषणे झाली.