Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शियांच्या मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात ३० ठार
इस्लामाबाद, ५ एप्रिल/पी.टी.आय.

येथे शनिवारी निमलष्करी दलाचा कॅम्प आणि वझिरीस्तानमध्ये दहशतवादी हल्ले केल्यानंतर

 

पाकिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा रविवारीही आपली रक्तरंजित खेळी चालूच ठेवली आहे. येथून ९० कि.मी. अंतरावरील चकवाल येथे शिया पंथियांच्या मशिदीमध्ये घुसून करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ३० भाविक ठार झाले असून अन्य २०० जखमी झाले आहेत. रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथील रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आले असून त्यातील १० जणांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ आहे.
ज्यावेळी हा आत्मघाती हल्ला झाला तेव्हा चकवालच्या या इमाम-बरगाहमध्ये २००० भाविक प्रार्थनेसाठी जमले होते. आत्मघाती दहशतवादी त्यामध्ये घुसला व त्याने स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले. मशिदीच्या मुख्य हॉलमध्येच रक्त, मांस आणि किंकाळ्या असे करुण दृश्य दिसून येत होते. शियापंथीयांच्या पंजाबमधील प्रार्थनास्थळावर रविवारी सकाळी हा हल्ला झाल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांचे इरादे भयानक असल्याचेच सिध्द होते आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी सिंध व वायव्य सरहद्द प्रांतातील शियांच्या इमाम-बरगाहांवर पूर्वी अनेक वेळा हल्ले केले होते. पण आज हल्ल्यासाठी निवडण्यात आलेला इमाम-बरगाह हा इस्लामाबादनजीकच्या पंजाब प्रांतातील होता.