Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून
उत्तर कोरियाची लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची चाचणी
सोल ५ एप्रिल/पीटीआय

उत्तर कोरियाने आज कुणालाही न जुमानता लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची चाचणी केली. या

 

घटनेनंतर लगेचच शेजारी देश तसेच अमेरिकेने उत्तर कोरियावर आगपाखड केली आहे. उत्तर कोरियाने त्यांच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या चाचण्यांना प्रारंभ केला असल्याचेच यातून दिसून येते असे अमेरिकेने म्हटले असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रक्षेपण तळावरून सकाळी साडेअकरा वाजता हा अग्निबाण सोडण्यात आला. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या या उद्दाम कृत्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्राग येथे सांगितले की, तायपोडोंग-२ क्षेपणास्त्राची केलेली चाचणी ही प्रक्षोभक घटना असून त्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या ठराव १७१८ चे उल्लंघन केले असून हा ठराव उत्तर कोरियाला आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यास मनाई करणारा आहे. ओबामा म्हणाले की, त्या देशाला संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते पण ते जुमानले नाही, आता उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आणखी अलिप्ततेची वागणूक मिळेल.
दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्याची चाचणी करण्यात आली ते अंतराळ वाहन होते व त्यावर उपग्रह ठेवलेला होता. आमच्या मते उत्तर कोरियाने अग्निबाणाची चाचणी केली आहे. तायपोडोंग क्षेपणास्त्राचा पल्ला ६ हजार किलोमीटरचा असून त्याची क्षमता अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची आहे.दरम्यान उत्तर कोरियाने या अग्निबाणाच्या चाचणीची पूर्वकल्पना आंतरराष्ट्रीय संस्थांना दिली होती व त्यात असे म्हटले होते की, हा अग्निबाण जपानच्या ईशान्य भागातून जाईल व त्याची बुस्टर्स जपानलगतच्या सागरात अकिता परफेक्चर येथे पडतील, दुसरे बुस्टर पॅसिफिकच्या जपान व हवाई दरम्यान कोसळेल.