Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पंतप्रधान ज्यांना व्हायचंय त्यांना होऊ द्या..
बाळासाहेबांनी अडवाणी यांचा नामोल्लेख टाळला
मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी

देशाचा पंतप्रधान जो कोणी होणार असेल, तो होऊ द्या. यापूर्वी झोपाळू, कृपाळू असे अनेकजण

 

पंतप्रधान झाले आहेत. आम्हाला त्यांची सवय झाली आहे. मी मात्र शिवसेनाप्रमुख पदावर समाधानी आहे, असे उद्गार काढत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी ‘रालोआ’चे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना निसंदिग्ध पाठींबा जाहीर करण्याचे आज टाळले. ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप अथवा अडवाणी यांचा नामोल्लेखही केला नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा आरंभ दादर-शिवाजी पार्कवर जाहीर सभेने झाला. आजारपणातून अलीकडचे बरे झालेले शिवसेनाप्रमुखया सभेला हजर नव्हते. त्यांच्या भाषणाची चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली ठाकरे म्हणाले की, सध्या देशात निवडणुका येत आहेत. मजेशीर साटीलोटी सुरु आहेत. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची फुगडी सुरू असनू दुसरीकडे शिवसेना-भाजपचीही फुगडी सुरू आहे. तो रामदास आठवले एकटाच फू फू करत फुगडी घालत आहे. आता छुपी कारस्थाने सुरू होतील. आम्ही मात्र आमचे हात स्वच्छ ठेवले आहेत.
संसदेवरील हल्ला नामर्द लोक सहन करतात, असा टोला भाजप व तत्कालीन ‘रालोला’ सरकारला लगावत ठाकरे म्हणाले की, अफजल गुरुला केंद्रातील सरकारने फाशी दिली नाही, आता कसाबचे ही लाड सुरु आहेत. जोपर्यंत कसाबला फाशी देत नाहीत तो पर्यंत आमचे एकही मत मिळणार नाही, असे सांगा, असे म्हणत त्यांनी मुंबईकरांना सूचक इशारा दिला.
‘तांदुळ, गहू स्वस्त आणि हे मात्र बिनधास्त’ अशी कोटी करत ठाकरे यांनी भाजपसकट सर्व पक्षांच्या जाहीरमान्यातील आश्वासनांची खिल्ली उडवली. मराठीचा अजेंडा माझा असून काहींनी उचलेगिरी करून या विषयावर बकबक चालवली आहे, असा टोला राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. मुंबईवर दहशतवादी हल्ला मालेगावचे आरोपी पकडल्यानंतर झाला त्याची आठवण करून देत ठाकरे यांनी पवार साहेबांचे वाचन कमी दिसते, अशी टीप्पणी केली. उद्धवच्या पाठीशी उभे राहा, आणि दिल्लीवर शिवसेनेचा भगवा फडकवून सेनेच्या खासदारांचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन ठाकरे यांनी या वेळी केले.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान होण्यास कोण लायक आहे, असा सवाल करत सोनिया गांधी यांच्यापासून जयललिता तर मनमोहन सिंह यांच्यापासून लालूप्रसाद यादव, मायावती यांची नावे घेतली. परंतु शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पंत्प्रधानपदासाठी नेमका कोणाला पािठबा द्यायचा, त्याचा हुकमी एक्का जाहीर न करता शिवसेनेने सस्पेन्स कायम ठेवला.
देशात भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले तर देशातील नागरिकांना ओळखपत्र देण्याची घोषणा अडवाणी याांनी केली. लक्षावधी बांगलादेशीय नागरिकांनीदेशात घुसखोरी करून शिधापत्रिका मिळवल्या आहेत. हे लोक देशाचे राजकारण नष्ट करत आहेत, असेही अडवाणी म्हणाले. मुंबईतील शिवाजी पार्कवरील जाहीर सभेपेक्षा नांदेड, नाशिक, पंढरपूर येथील सभांना मोठी गर्दी होती, अशी कबुली देत अडवाणी यांनी शिवसेनेला धक्का दिला. मुंबईलरील दहशतवादी हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यानी केली.
या वेळी खासदार संजय राऊत, विरोधीपक्ष नेते रामदास कदम, ‘भाजप’नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई यांचीही भाषणे झाली.