Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ट्वेन्टी-२० न खेळता भाष्य करू नका..
शाहरूखचा गावसकर यांच्यावर बाऊन्सर
मुंबई, ५ एप्रिल/क्री.प्र.

सुनील गावसकर हे एक महान फलंदाज होते. त्यांचा मी आदर करतो. पण ट्वेन्टी-२० हा

 

क्रिकेटचा नवीन प्रकार आहे. त्यांनी ट्वेन्टी-२० क्रिकेट न खेळल्यामुळे यासंदर्भात भाष्य करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांना जर काही वाटत असेल तर आयपीएलमधील एखादा संघ खरेदी करून त्यावर त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करावी. क्रिकेटचे हित कशात आहे हे आम्हाला माहीत असून हे सांगण्याची त्यांना गरज नाही, अशा शब्दांत कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. काही दिवसांपूर्वी गावसकर यांनी एका लेखात कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या धोरणांवर टीका केली होती.
प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांनी चार कर्णधारांचा प्रस्ताव मांडलेला असून, त्याची अंमलबजावणी करायची की नाही यावर अजून निर्णय झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावर आमचा संघ चार सराव सामने खेळणार असून, जर त्यामध्ये हा प्रस्ताव यशस्वी झाला तरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. अन्यथा सौरव गांगुली हा संघाचे नेतृत्व करील, असे शाहरूख यावेळी म्हणाला.
या प्रयोगाबद्दल शाहरूख म्हणाला की, बुकॅनन हे एक प्रयोगशील प्रशिक्षक आहेत. त्यामुळे संघाच्या हितासाठी ते नवनवे प्रयोग करीतच राहतील. पण या प्रयोगादरम्यान कोणीही दुखावला जाणार नाही ना, याची काळजीही घेण्यात येईल. आयपीएलमधील एक उदाहरण देताना शाहरूख म्हणाला की, गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने तीन कर्णधारांची नेमणूक केली होती. युवराज सिंग हा फलंदाजीचा तर ब्रेट ली हा गोलंदाजीचा कर्णधार होता. तसेच क्षेत्ररक्षणाचे कर्णधारपद श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकाराने भूषविले होते. त्यांनी ही गोष्ट कुणालाही सांगितली नसल्यामुळे त्यावर जास्त टीका झाली नव्हती.