Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

प्रादेशिक

ओव्हरटाईम, डबल-डय़ुटीमुळे एसटी कर्मचारी मेटाकुटीला
आचारसंहितेमुळे रखडली चालक-वाहकांची भरती

मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे गाडय़ांना गर्दी वाढल्याने एसटीच्या मुंबई व ठाणे विभागाने दररोज प्रत्येकी १९ अतिरिक्त गाडय़ांचे नियोजन केले आहे. मात्र चालकांच्या तुटवडय़ामुळे आधीच नियमित गाडय़ा चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याने, या अतिरिक्त गाडय़ांसाठी चालक आणायचे कोठून, अशी चिंता एसटीच्या आगारप्रमुखांना सतावत आहे. सातत्याने ओव्हरटाईम व डबल डय़ुटी करून एसटीचे चालक-वाहकसुद्धा मेटाकुटीला आले आहेत. परिणामी प्रवासी सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एसटीच्या राज्यभरातील सर्व आगारांत थोडय़ाफार फरकाने जवळपास सारखीच परिस्थिती आहे.

पं. वि. रा. आठवले यांना ‘चतुरंग संगीत सन्मान’
मुंबई, ५ एप्रिल/प्रतिनिधी

संगीतक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठान आणि म्हैसकर फाऊंडेशन यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘चतुरंग संगीत सन्माना’साठी या वर्षीचे मानकरी म्हणून अभिजात शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक आणि बुजुर्ग गायक पं. विनायक रामचंद्र आठवले यांची घोषणा निवड समितीच्या सदस्यांनी केली. पंडितजींनीही हा पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिली आहे. चतुरंग प्रतिष्ठान वर्धापनदिनानिमित्ताने योजल्या जाणाऱ्या ‘चैत्रपालवी संगीतोत्सवा’ची मुंबईत तपपूर्ती झाल्यानंतर आता गेल्या दोन वर्षांपासून हा संगीतोत्सव डोंबिवली येथे आयोजित केला जातो.

मुंबईत आजपासून विनोद दोशी स्मृती नाटय़महोत्सव
मुंबई, ५ एप्रिल/नाटय़-प्रतिनिधी
प्रीमियर ऑटोमोबाइल्स लि.चे चेअरमन आणि प्रख्यात उद्योगपती तसेच रसिकाग्रणी कै. विनोद दोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुंबई व पुण्यात विनोद दोशी स्मृती नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत रवींद्र नाटय़मंदिरमध्ये सोमवार, ६ एप्रिलपासून ते शुक्रवार, १० एप्रिलपर्यंत हा नाटय़महोत्सव होत असून, पुण्यात कोथरूडला यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात ७ ते ११ एप्रिलदरम्यान तो साजरा होणार आहे. उद्योगजगताबरोबरच विविध कला तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही तितक्याच जिव्हाळ्याने रस घेणाऱ्या विनोद दोशी यांनी आपल्या हयातीत हौशी रंगभूमी तसेच समांतर चित्रपटांना आणि या कलाक्षेत्राशी संबंधित मंडळींना नेहमीच सर्व प्रकारे मदतीचा हात दिलेला आहे. त्यांच्या कला-अभ्यासक पत्नी डॉ. सरयू दोशी याही त्यांच्यासमवेत त्यांच्या उपक्रमात सक्रीय सहभागी असत. विनोद दोशी यांची नाटय़कलेतील आत्यंतिक भावनिक गुंतणूक लक्षात घेऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी प्रीमियर लि.ने मुंबई आणि पुण्यात या नाटय़महोत्सवांचे आयोजन केले आहे.

पुनर्रचित बीएमएम अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षांपासून
मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाने पुनर्रचना केलेला मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतील ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ हा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी दिले आहे. पुनर्रचित ‘बीएमएम’ अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याच्या मागणीसाठी मराठी अभ्यास केंद्राचे प्रतिनिधी व वरिष्ठ पत्रकार यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने नुकतीच कुलगुरूंची भेट घेतली त्यावेळी कुलगुरूंनी हे आश्वासन दिले.

सीईटीच्या सरावासाठी सॉफ्टवेअर
मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी
अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’साठी (सीईटी) विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. जेमतेम पाच आठवडय़ांवर येऊन ठेपलेल्या या परीक्षेच्या सराव करण्यात विद्यार्थी गुंतले आहे. विद्यार्थ्यांची ही निकड ओळखून ‘एज्युकेशन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीने खास सॉफ्टवेअर तयार केले आहे.
‘सीईटी’ देणाऱ्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा या सॉफ्टवेअरमार्फत घेण्यात येईल. हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शनही करेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या चुका दुरूस्त करण्याची संधी मिळेल. याबाबत अधिक माहितीसाठी ०२२-३२१५१२०० या दूरध्वनीवर संपर्क साधावा.