Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार जागृती अभियानासाठी भ्रष्टाचारी व गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांच्या विरोधात पिपल्स हेल्पलाईनतर्फे ‘भारत पेरणी अभियान’ राबविण्यात आले.

शंकरराव काळे यांचे आज ८९व्या वर्षांत पदार्पण
कोपरगाव, ५ एप्रिल/वार्ताहर

ज्येष्ठ नेते माजी खासदार शंकरराव काळे उद्या (सोमवारी) ८९व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.
शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या काळे यांनी कष्टप्रद स्थितीत अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नोकरीच्या मागे न लागता मातुश्री राधाबाई काळे यांच्यापासून प्रेरणा घेत स्वतला समाजसेवेत झोकून दिले.

एसएमएस, रिंगटोनद्वारे प्रचाराचे तंत्र!
पाथर्डी, ५ एप्रिल/वार्ताहर

निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा खुबीने वापर चालविला आहे. ‘एसएमएस’ तसेच रिंगटोनद्वाराही प्रचाराची आगळी पद्धत राबविली जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेला मोबाईल प्रचाराचा खर्च देणे टाळता येत असल्याने आता मोबाईलचा अधिक वापर करण्यावर सर्वच पक्षांनी चांगलाच भर दिला आहे.

गुणवत्तेला न्याय
संगमनेरचे सर डी. एम. पेटीट हायस्कूल तसे बरेच जुने. ते पूर्वी नगरपालिकेमार्फत चालविले जायचे. त्या वेळी नगर जिल्ह्य़ात दोनच हायस्कूल होती. त्यापैकी हे एक आणि दुसरे अहमदनगरला. त्यामुळे या विद्यालयाचा नावलौकिक तत्कालीन मुंबई इलाख्यात खूपच मोठा होता. विद्यालयाच्या कीर्तीला साजेसे मो. के. शालिग्राम नावाचे मुख्याध्यापक शाळेला लाभले होते.

पारा ४१ अंशांवर! असह्य़ उष्म्याने नगरकर हैराण
नगर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच शहरातील उष्म्यातही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. शहरातील तपमान आज ४१ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. उन्हाचा कडाका सकाळी आठपासूनच सुरू होतो. दुपारी तर भाजून काढणारे कडक ऊन असते. आजच्या उन्हाचा कडाका नेहमीपेक्षा जास्तच होता. शहरातील दैनंदिन व्यवहारांवर उन्हाचा चांगलाच परिणाम होऊ लागला आहे. दुपारी सर्वच रस्त्यांवर सामसूम असते.

आणखी १६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जिल्ह्य़ाबाहेर १०, तर जिल्ह्य़ांतर्गत ६
नगर, ५ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्य़ातील १६ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात ६ अधिकाऱ्यांच्या जिल्ह्य़ांतर्गत बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यापूर्वी वरिष्ठ ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

प्रयास ग्रुपतर्फे कुष्ठरोगी महिलांना साडय़ांचे वाटप
नगर, ५ एप्रिल/प्रतिनिधी
रामनवमीनिमित्त प्रयास ग्रुपतर्फ कुष्ठरोगी महिलांना हमाल पंचायतीचे पदाधिकारी व साहित्यिक अप्पा कोरपे यांच्या हस्ते साडय़ांचे वाटप करण्यात आले. कोरपे यांनी यावेळी प्रयास ग्रुपच्या कामाचे कौतुक केले. हमाल पंचायत महिला मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन लता वाघ यांनी केले. आभार मनीषा फटांगरे यांनी मानले. ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, नीना गवळी, नंदा तोडकर, अनिता गाडे आदी उपस्थित होत्या.

आठवलेंच्या प्रचारासाठी आज बैठक
नेवासे, ५ एप्रिल/वार्ताहर
रामदास आठवले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी उद्या नेवाशात इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआयसह मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार यशवंतराव गडाख यांनी केले. नेवासे येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात बोलवण्यात आलेल्या या बैठकीला उमेदवार रामदास आठवले, आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, युवा नेते शंकरराव गडाख, साखर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, आरपीआयचे कार्याध्यक्ष अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मिरावली पहाडावर आजपासून उरूस
नगर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

शहराजवळ असलेल्या मिरावली पहाडावर दि. ६ ते ८ एप्रिल दरम्यान हजरत सय्यद इसहाक शाह कादरी ऊर्फ मिरावलीबाबा यांचा संदल व उरुसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मुजावर गोटूबाबा जहागीरदार यांनी दिली. सोमवारी पहाटे दग्र्यास आंघोळ घालून मुजावर यांच्या हस्ते नवीन चादर व गलफ चढविण्यात येईल. सकाळी ७ वाजता ध्वजारोहण, दुपारी १ वाजता भंडारा होईल. उत्सवाच्या काळात धार्मिक कव्वाली, कुराण पठण आदी कार्यक्रम होतील.

पिपल्स हेल्पलाईनतर्फे मतदार जागृती अभियान
नगर, ५ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार जागृती अभियानांतर्गत पिपल्स हेल्पलाईनतर्फे भारत पेरणी अभियान राबविण्यात आले. भ्रष्टाचारी व गुन्हेगारी वृत्तीच्या उमेदवारांना मतदान करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पेराल तसे उगवेल या न्यायाने काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, प्रदीप भिंगारदिवे, सावित्री शिरसाठ, आनंदा आढाव आदी उपस्थित होते.

प्राथ. शिक्षक समिती, गुरुकुल मंडळाचा उद्या त्रवार्षिक मेळावा
नगर, ५ एप्रिल/वार्ताहर
नगर तालुका प्राथमिक शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाचा त्रवार्षिक मेळावा मंगळवारी (दि. ७) लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होत आहे. मेळाव्यास तालुक्यातील गुरुकुल समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष संजय धामणे यांनी केले आहे.
तालुक्यातील शिक्षक समिती, गुरुकुल मंडळ, गुरुकुल महिला आघाडी, सांस्कृतिक समितीच्या आगामी तीन वषार्च्या निवडी या मेळाव्यात होणार आहेत.

पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कर्डिलेंचे प्रामाणिक काम करू - शेलार
श्रीगोंदे, ५ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पाठीत अनेक राजकीय वार केले. कार्यकर्त्यांना वारंवार अपमानित केले. मात्र, पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासाठी सगळे सहन केले. आताही तालुक्यात पक्षांतर्गत अपमान बाजूला ठेवून सगळे कार्यकर्ते पवारांना पंतप्रधान करण्यासाठी आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचेच प्रामाणिक काम करतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांनी केले.

धर्मनिरपेक्ष पक्षांच्या उमेदवारांनाच निवडून द्या - मलिक
नगर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

संसदेत अणुकरारासंबंधी मतदानाच्या वेळी ‘खोक्यां’च्या मोहात पडलेल्या खासदार तुकाराम गडाख यांचे ‘खोके’ या लोकसभा निवडणुकीतून पार्सल करा. ‘राम’भरोसे निवडणूक लढविणाऱ्या भाजपचा रामनाम सत्य करा आणि मुस्लिमांना नोकरी, शिक्षणात १० टक्के आरक्षणाची शिफारस करणाऱ्या रंगनाथ मिश्रा कमिटीच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह धर्मनिरपेक्ष पक्षांच्या उमेदवारांना मत देऊन निवडून आणा, असे आवाहन राज्याचे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी आज येथे केले.

कार्यकर्त्यांचा मानपान
कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मानपान फार सांभाळावा लागतो. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या मंगल कार्यालयचं असणाऱ्या केशरगुलाब संपर्क कार्यालयात खाण्याची, चहाची रेलचेल आहे. तिथे एका पदाधिकाऱ्याने पोरगेलासा दिसणाऱ्या एकाला हाक मारून पाणी आणण्यास सांगितले. तो नेमका कार्यकर्ता निघाला. ही गोष्ट बघत असणारे गांधी यांचे प्रचारप्रमुख श्रीकांत साठे यांनी लगेचच ‘केटरिंगच्या सर्वानी उद्यापासून गणवेष घालून यावे,’ असा फतवा काढला. त्या कार्यकर्त्यांसमोरच त्यांनी ही सूचना केल्याने तोही खूष झाला.

हा खेळ सत्तेचा!
दिवसाही खेळ चाले
हा गूढ माणसांचा
संपेल ना कधीही
हा खेळ सत्तेचा..

विनायकरावांची छाप!
भाजपच्या प्रतापकाकांचं डोकं विचार करून करून शिणलं. काय बर कला असेल विनायकरावांकडे? इथे प्रदेशचे नेते भेटायची मारामार! बरोबर घेऊन फिरणं तर लांबच राहिले. आणि विनायकराव मात्र! डोकंच काम करत नाही.

काँग्रेसवर श्रद्धा असेल तर माघार घ्या; आठवले यांचा रुपवतेंना सल्ला
राहाता, ५ एप्रिल/वार्ताहर
शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसने मला उमेदवारी दिल्याने प्रेमानंद रुपवते नाराज झाले. परंतु त्यांची खरोखरच काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर श्रद्धा असेल, तर त्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी, असे प्रतिपादन खासदार रामदास आठवले यांनी केले.

शेळकेसमर्थकांना बरोबर घेत कर्डिलेंचा तालुक्यात प्रचारदौरा
नगर, ५ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील शेळके समर्थकांना बरोबर घेत राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी वाळकी, अरणगाव, चिचोंडी पाटील, जेऊर गटातील गावांमध्ये मतदारांच्या भेटी घेतल्या.

निवडणुकीच्या तयारीची केंद्रीय निरीक्षकांकडून पाहणी
पारनेर, ५ एप्रिल/वार्ताहर
जिल्ह्य़ात पारनेर तालुक्यात सर्वाधिक १७३ गावे व ३५० मतदान केंद्रे आहेत. निवडणूक आयोगाचे केंद्रीय निरीक्षक चेनप्पा गौडा यांनी आज पारनेरला भेट देऊन निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली. सहायक निवडणूक अधिकारी जी. आर. दांडगे यांनी ही माहिती दिली.

प्रचाराच्या पातळीवर ग्रामीण भाग शांतच
शेवगाव, ५ एप्रिल/वार्ताहर
ग्रामीण भागात अजूनही निवडणुकीचे वातावरण तयार झाल्याचे दिसत नाही. पक्षांचे प्रचारदौरे खेडय़ापाडय़ांतून सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, तसेच भाजप उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जाहीर सभा अशा दोन महत्त्वाच्या राजकीय घटना वगळता अजून तरी शेवगावात इतर कोणत्याच राजकीय पक्षाची प्रचारफेरी अथवा अन्य कार्यक्रम झाला नाही. सध्या उन्हाळी मशागतीचे दिवस असल्याने नांगरणी व इतर कामांत शेतकरी व्यस्त आहेत. परिणामी दिवसा खेडय़ापाडय़ात वयस्कर माणसे सोडल्यास कोणीही भेटत नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

भारिप महासंघाची गडाख यांच्यावर टीका
नगर, ५ एप्रिल/प्रतिनिधी
स्वतला ‘हभप’ म्हणविणाऱ्या मायावतींच्या मनुसंस्कृतीच्या पक्षाचे तिकीट घेऊन िरगणात उतरलेल्या उमेदवारास मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार वकील भानुदास होले यांनी केले. शेवगाव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत होले बोलत होते. या वेळी त्यांनी या मतदारसंघातील अनेक प्रश्नांची चर्चा केली. बसपचे उमेदवार तुकाराम गडाख यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. महासंघाचे शेवगावचे अध्यक्ष शहाजी नरवडे, अशोक शिरसाठ, सहदेव बढे, नांगरे, बसीर आदी उपस्थित होते. पक्षाचे संघटन सरचिटणीस अशोक सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.