Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उन्हाचा तडाखा नागपूर ४३.३, अकोला ४४
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

मार्च महिन्यातच चाळीशी गाठणाऱ्या पाऱ्याने आज त्यापुढे उसळी घेत संपूर्ण विदर्भाला भाजून काढले. सर्व जिल्ह्य़ांना रणरणत्या उन्हाचा तडाखा बसला असून अकोला येथे सर्वाधिक ४४

 

अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
आज सकाळपासूनच उष्ण हवेने वाढत्या तापमानाची चाहूल दिली होती. दुपारकडे उन्हाची तीव्रता अधिकच वाढली. कडक उन्हाचे चटके झोंबू लागल्याने त्याचा परिणाम रहदारीवरही झाला. घश्याला कोरड पाडणाऱ्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले. लोकसभा निवडणुकीची धामधुम असतानाही उन्हामुळे कार्यकर्ते आणि मतदारांवरही मरगळ आली आहे. प्रचारसभांमध्ये गुंतलेल्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचेही या उन्हामुळे हाल झाले. संपूर्ण विदर्भातच तापमानात वाढ झाली असून अनेक शहरांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या तडाख्यामुळे बाजारपेठांमधील वर्दळ कमी झाली. यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मार्चच्या शेवटीच पाऱ्याने चाळीशी गाठल्याने पुढचा उन्हाळा कसा असेल या धास्तीत नागरिक असतानाच एप्रिलच्या आरंभापासूनच पाऱ्याचा वेग वाढला आहे. रात्रीच्या तापमानातही झपाटय़ाने वाढ होत आहे. आज अकोल्यात ४४ अंश (किमान २३.४), नागपूर ४३.३ (२३.४), अमरावती ४३ (२२.८), वर्धा ४३.२, यवतमाळ ४१.४ (२४.२), ब्रह्मपुरी ४२.७ (२५.१) तर बुलडाण्यात ३९.२ (२६.६) अंश तापमान नोंदवण्यात आले.