Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आबांचे हेलिकॉप्टर भरकटले
हेलिपॅडच्या शोधात दीड तास हवेतच
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीची सगळीकडे धामधूम असताना प्रचार सभेला येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांचे हेलिकॉप्टर प्रचार सभेच्या ठिकाणी हेलिपॅड दिसत

 

नसल्याने दीड तास हवेतच फिरत होते.
अमरावतीचा कार्यक्रम आटोपून आर. आर. पाटील आज सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने नागपूरला येण्यासाठी निघाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्या प्रचारार्थ दत्तवाडीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ज्या ठिकाणी ही सभा होती त्या जागेपासून अर्धा कि.मी. दूर दौलतवाडीत एका रिकाम्या भूखंडावर हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. आबांचे हेलिकॉप्टर सकाळी १० वाजता निघून दत्तवाडी परिसरात आले होते पण, ज्या ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था केली होती त्या ठिकाणाहून हेलिकॉप्टर जवळपास तीनदा गेले पण, पायलटला हेलिपॅड न दिसल्यामुळे तो जवळपास दीड तास हवेतच फिरत होता. त्यात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर या भागात ते फिरून आले. जाहीर सभेची वेळ होऊन गेली होती आणि आबा अमरावतीवरून निघून एक तास झाला तरी अजून पोहचले का नाही म्हणून सभेला उपस्थित असलेल्या नेत्यांनी मोबाईलद्वारे आबांशी संपर्क केला पण, तो होऊ शकला नाही. त्यामुळे सगळेच चिंतेत होते. आबा कुठे असतील, याची सभेच्या ठिकाणी चर्चा सुरू झाली.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांनी चार वेळा आबांशी मोबाईलवर संपर्क साधला पण, तो होत नव्हता. त्यांनी वाडीचे पोलीस निरीक्षक दिगंबर चव्हाण यांना ही बाब सांगितली. चव्हाण यांनी पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांच्या कानावर ही बाब घातली. पोलीस आयुक्त तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना कळवले. इकडे रमेश बंग तसेच इतर कार्यकर्त्यांची चिंता वाढली. विमानतळावर तर ते उतरले नसतील, दुसऱ्या सभेला तर निघून गेले नसतील, अशा नाना शंकांनी मनात घर केले. साडेअकरा वाजता रमेश बंग यांचा आबांशी संपर्क झाला. ‘पुढे निघून गेलो होतो. परतत आहोत’ असे आबांनी सांगितले तेव्हा कुठे सर्वाचा जीव भांडय़ात पडला.
दत्तवाडी परिसरात हेलिकॉप्टर फिरत असताना पायलटला हेलिपॅड दिसावे म्हणून आजुबाजूचा कचरा जाळण्यात आला. अखेर जाहीर सभेच्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसल्यानंतर हेलिकॉप्टर हेलिपॅडवर सुरक्षित उतरवले आणि सगळ्यांचा जीव भांडय़ात पडला. दरम्यान, आबांना विचारले असता ते म्हणाले, पायलट आसामचा असल्यामुळे त्याच्यासाठी हा भाग नवीन होता. ज्या ठिकाणी हेलिपॅड तयार केले आहे त्याच्या आजुबाजूला इमारती असल्यामुळे हेलिपॅडची जागा त्याला दिसली नाही. त्यामुळे उशीर झाल्याचे आबांनी खाजगीत काही वृत्तवाहिन्यांना सांगितले. या सर्व प्रकारामुळे दत्तवाडीची सभा जवळपास २ दोन तास उशिरा सुरू झाली.