Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘मानसन्मान’ ‘गुलमोहर’ व ‘अचानक’ त्रिधारा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

संजय फिल्म प्रायव्हेट लिमिटेडतर्फे१० ते १२ एप्रिल दरम्यान लक्ष्मीनगरातील सायंटिफीक सभागृहात वेगळे आशय असलेले तीन चित्रपट त्रिधारा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार आहे.

 

१० एप्रिलला सायंकाळी सात वाजता आर के. व्हीजन निर्मित ‘मानसन्मान’ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. जोशी नावाच्या वृद्ध आई बाबांची ही कथा आहे. बदलत्या काळाबरोबर माणूस इतका बदलला की महत्त्वाची संस्कार मूल्ये तो विसरलाय, अशा संस्कार मूल्यांची आठवण करून देणारा ‘मानसन्मान’ या चित्रपटात शिवाजी साटम, रिमा लागू, यतिन कारेकर, रेशम टिपणीस, अविष्कार दारव्हेकर व पंकज विष्णू या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. शनिवार ११ एप्रिलला गजेंद्र अहिरे यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
पतीपत्नीच्या करियरमुळे, करियरसाठी होणारे संवाद त्यातून होणारे समज गैरसमज यावर आधारित असून त्यात सोनाली कुळकर्णी, रजत कपूर, मोहन जोशी, जितेंद्र जोशी, गिरीजा ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १२ एप्रिलला सूर्योदय फिल्म इंटरनॅशनल निर्मित ‘अचानक’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आचरट विनोद व उथळ चित्रपटापेक्षा वेगळा असा योगेश सोमन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मोहन जोशी, रिमा लागू आणि शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मानसन्मान आणि गुलमोहर हे दोन्ही चित्रपट प्रथमच नागपुरात प्रदर्शित होत आहेत. या महोत्सवाशिवाय १२ एप्रिलला सकाळी ९ वाजता ‘१० वीफ’ हा चित्रपट खास विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे प्रवेशपत्र कार्यक्रमस्थळी मिळतील, असे संजय पेंडसे यांनी कळवले आहे.