Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तापमानासह शीतपेयांच्या दुकानांसमोरील गर्दीतही वाढ
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

गेल्या आठवडय़ापासून लिंबू सरबत, बर्फाचे गोळे आणि शीतपेयांच्या दुकानांसमोरील गर्दी अचानक वाढली आहे. छत्र्या, स्कार्फस् आणि स्टायलिश गॉगल्स् वापरणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागपूरकर मेटाकुटीला आले आहेत.

 

पाच दिवसांपूर्वी तापमानाने ४२ डिग्री सेल्सिअसची उंची गाठल्याने एप्रिल अखेर व मे महिन्यात उन्हाची दाहकता अधिक वाढेल की काय, या भीतीनेच नागपूरकरांनाघाम फुटू लागला आहे. दरम्यान, पुढील दोन महिन्यात तापमानात बरीच वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
दरम्यान, उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची पातळी कमी झाल्याने तापमानात अचानक वाढ झाली आहे. येणाऱ्या दिवसात उकाडा वाढेल का, याबाबत विचारणा केली असता, त्याबद्दल आताच भाकित करता येणार नाही, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले. मार्चमध्ये होळीनंतर आणि एप्रिलच्या सुरुवातीला हवेत काहीसा गारवा होता. उन्हाचे चटके जास्त जाणवत नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर यंदा उन्हाळा चटके देणार नाही, या आशेने नागपूरकर सुखावले होते परंतु, गेल्या पाच सहा दिवसांपासून हवेतील आद्र्रता अचानक कमी होऊन तापमानाने एकदम ४२ अंश सेल्सिअस उंची गाठली आणि उन्हाचे चटके बसू लागले. अचानक वाढलेल्या तापमानाने अंगाची लाहीलाही होऊ लागल्याने नागपूरकर हैराण झाले आहेत.
त्यातच ऐन उन्हाळ्यात शहरात व ग्रामीण भागात काही भागात दुपारच्या वेळी तीन ते चार तास वीज भारनियमन सुरू झाल्याने नागरिक अधिकच त्रस्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असली तरी दुपारच्या वेळी तर रस्ते सानसुन दिसतात. गेल्या तीन चार दिवसांमध्ये ही अवस्था झाल्याने उर्वरित एप्रिल आणि मे महिन्यात काय अवस्था होणार, या चिंतेने नागपूरकरांना ग्रासले आहे. उन्हाची काहिली दूर करण्यासाठी शीतपेयांच्या दुकानांसमोर तर, कलिंगडाच्या स्टॉलवर गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, एकीकडे उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असली आणि उकाडय़ाने जीव मेटाकुटीला येत असला तरी वेधशाळेने मात्र सध्याचे तापमान सर्वसाधारण असल्याचा दावा केला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची पातळी कमी झाल्याने अचानक तापमानात वाढ झाली आहे आणि सर्वत्र उकाडा जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया व बुलढाणा नागपुरात तापमान वाढत आहे. साधारणत एप्रिल महिन्यात ४० अंश सेल्सिअसवर तापमान असते. गेल्या चार दिवसात तापमानात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १ एप्रिलला ४२.१ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली होती. एप्रिल-मे महिन्यात तापमानात वाढ होणे साहजिक आहे. या दोन महिन्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची पातळी कमी होत असल्याने उन्हाळाही प्रचंड असतो पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्याप तरी हे प्रमाण कमी आहे व गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात झालेली वाढ लक्षात घेता त्याला अतितापमानाची नोंद म्हणता येणार नाही.
हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे का, असे त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, वेधशाळा केवळ दोन दिवसांच्या हवामानाचा अंदाज वर्तवू शकते. त्यामुळे उर्वरित एप्रिल आणि विशेष म्हणजे मे महिन्यात तापमानाची काय स्थिती असेल, याचा अंदाज आताच सांगता येणे शक्य नाही पण, आताच्या परिस्थितीवरुन पुढील दोन महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता असल्याची वेधशाळेने वर्तविली आहे.