Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विलासराव देशमुख आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर
नागपूर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दोन दिवसांचा प्रचार दौरा आटोपल्यानंतर आता काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि लोकसभा निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे उद्या, सोमवारपासून

 

विदर्भातील प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
आज देशमुखांच्या विदर्भ विभागीय प्रचार कार्यालयाचे गणेशपेठ येथे रवींद्र दुरुगकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रचार कार्यालयातून विलासराव देशमुख विदर्भभर प्रचार करणार आहेत. या प्रचार दौऱ्यात देशमुखांच्या अनेक जाहीर सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि बैठकी आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचे उद्या, सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागपुरात आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता दक्षिण नागपुरातील कार्यकर्त्यांचा मेळाव्यामध्ये ते सहभागी होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता पूर्व आणि ७ वाजता उत्तर नागपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी रात्री ९ वाजता ते मध्य नागपुरातही जाहीर सभा घेतील.
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दुरुगकर यांनी सर्व मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा कशाप्रकारे राबवण्यात यावी याबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली. तसेच नवीन विकसित हायटेक यंत्रणेची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या दहाही जागा जिंकण्याचा निर्धार केला. उद्घाटनप्रसंगी राजेंद्र काळमेघ, प्रभावती ओझा, पिंटू देशमुख, भूषण दडवे, सचिन दुरुगकर आदी मान्यवर उपस्थित होते.