Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

परप्रांतात दुकानात जाऊन चोरी
टाटा सुमोसह दागिने जप्त
परप्रांतात दुकानात जाऊन दागिने चोरणारी महिलांची सोनेरी टोळी शहर पोलिसांच्या विशेष पथकाने

 

शनिवारी सापळा रचून गजाआड केली.
काही महिला दागिने विकण्यास नागपुरात येत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर गावित यांना मिळाली. या टोळीला पकडण्याचे आदेश त्यांनी विशेष पथकाला दिले. पोलीस उपनिरीक्षक समीर गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भंडारा मार्गावरील पारडी नाक्याजवळ पाळत ठेवली. भंडाऱ्याकडून आलेल्या एका टाटा सुमोत (एमएच/३१/सीएम/१४९०) सहा महिला बसलेल्या पाहून त्यांना शंका आली. या पथकाने युमोचा पाठलाग केला आणि वर्धमान नगरातील पावर हाऊस चौकात सुमोला कडे केले. एक चालक व सहा महिला टाटा सुमोत बसलेल्या होत्या. त्यांची विचारपूस केली असता त्या उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागल्या़ त्यांना लकडगंज पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सुमो चालक वसंत भाऊराव नगराळे, आशा हरिचंद्र शेन्द्रे (रा. कैलासनगर), रेखा विकास वासे, रजनी भावेश मशरू (रा़ विश्वकर्मानगर), पुष्पा रवी साठे, छाया मधुकर डोंगरे (रा़ वर्धा), संतोषी पंजाबराव इशंबरे (रा़ दिघोरी) अशी नावे त्यांनी सांगितली. त्यांच्याजवळून अडीच किलो चांदीच्या पायपट्टय़ा व इतर सोन्याचे दागिने मिळाल़े या दागिन्यांबाबत त्यांच्याजवळ कागदपत्र नव्हती़ पोलिसी हिसका बसताच त्यांनी तोंड उघडले. जगदलपूर, छत्तीसगड येथील सराफा ओळीमधील विविध दुकानांमध्ये दागिने पाहण्याच्या बहाणा करून पाहता पाहता ते लांबवायचे, अशी आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत असल्याचे आरोपींनीच पोलिसांना सांगितले. टाटा सुमो व दागिने मिळून तीन लाखाहून ऐवज जप्त करण्यात आला. लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण राठोड, उपनिरीक्षक समीर गायकवाड, हवालदार वीरेंद्र सवाई, रमेश तायडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
अल्पवयीन मुलांकडून मोबाईल व दागिने जप्त
अजनी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून मोबाईल व दागिने जप्त केले.
पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल व त्यांचे सहकारी काल रात्री श्री नगरातील नासुप्र उद्यानाजवळून जात असताना चार मुलांची त्यांना शंका आली. त्या मुलांना लगेचच पकडून झडती घेतली असता विविध कंपन्यांचे ४ मोबाईल व सोन्या-चांदीचे दागिने सापडले. एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दुर्गानगरमधील एका बंद दाराचे कुलूप तोडून त्यांनी हा ऐवज चोरल्याचे पोलिसांना सांगितले.
भामटय़ांनी बसमधील प्रवाशाची सुटकेस लांबवली
भामटय़ांनी बसमधील प्रवाशाची सुटकेस लंपास केल्याची घटना मध्यवर्ती बस स्थानकावर रविवारी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली. फागेश्वर हरिभाऊ पडोळे (रा. गव्‍‌र्हमेंट सोसायटी, जयताळा रोड) हे तुमसर जाण्यासाठी बसमध्ये बसले.
आसनावरील जागेत त्यांनी सुटकेस ठेवली आणि शेंगदाणे घेण्यासाठी ते बसबाहेर आले. काही वेळात परत आले असता तेथे सुटकेस नव्हती. त्यात पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत साठ हजार रुपये) होते. गणेशपेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.