Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘मंडालेचा राजबंदी’ची ‘सावाना’ वाङ्मयीन पुरस्कारासाठी निवड
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

नासिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी यंदा ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक अरविंद व्यं. गोखले लिखित ‘मंडालेचा राजबंदी’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. शनिवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित १६९ व्या वार्षिक समारंभात या पुरस्काराचे वितरण समारंभपूर्वक होणार असून लेखिका

 

गिरीजा कीर या समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याच समारंभात सावानाचे अन्य वाड्मयीन पुरस्कारदेखील प्रदान करण्यात येणार आहेत. त्यात आसाराम लोमटे, शरद गोगटे (मराठी ग्रंथप्रकाशनाची दोनशे वर्षे), अपर्णा पेंडसे (मार्गस्थ), विजय कापडी (लालूचा घोडा) या लेखक व ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. १२ एप्रिलला सायंकाळी ६.३० वा. कै. बाळ गंगाधर जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा होईल. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक प्रकाश अकोलकर यांना उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
१४ एप्रिलला कै. काकासाहेब आकूत स्मृतीप्रित्यर्थ ज्येष्ठ विधीज्ज्ञ भास्करराव आव्हाड यांचे ‘लोकशाहीची साठी’ या विषयावर व्याख्यान होईल. १५ एप्रिलला ‘शतकातील कविता’ हा काव्यवाचन, गायन आणि नृत्य हा बहुरंगी कार्यक्रम होणार असून त्यात मधुरा बेळे, आनंद अत्रे, सदानंद जोशी, स्वानंद बेदरकर, नवीन तांबट, निनाद तांबट आणि कीर्ती कलामंदिराच्या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. वाड्मयीन पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून प्रा. अनंत येवलेकर, प्रा. निशा पाटील व डॉ. वृंदा भार्गवे यांनी काम पाहिले.