Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जैवविविधता नसेल तर मानवी अस्तित्वालाच धोका -ए.के. जोशी
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

निसर्गातील जैव विविधता मानवच्या कल्याणासाठी आहे. ती जपण्याचे काम जंगले करीत असतात

 

म्हणूनच जंगलामुळे विकास अडतो, अशी ओरड करण्याआधी सर्वानाच क्षणभर गंभीरपणे विचारमग्न होण्याची गरज आहे. जैवविविधताच नसेल तर मानवाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल. जंगलाच्या विनाशामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. त्याला आळा घालण्यासाठीच जैवविविधता नियम २००८ तयार करण्यात आला असून त्याबाबतची जागृती समाजात भरपूर प्रमाणात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक ए.के. जोशी यांनी केले.
हा नियम आणि लोकसहभागातून त्याची अंमलबजावणी, या विषयावर विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेने शंकरनगर चौकातील मूक बधीर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वनतज्ज्ञ मारुती चितमपल्ली होते. याशिवाय, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद सुकळीकर, सचिव दिलीप गोडे, अ‍ॅड. आनंद गोडे हे मान्यवरही मंचावर उपस्थित होते.
प्रकल्पासाठी जंगल ताब्यात घेताना केवळ वृक्षांचा विचार होतो. अनंत जीवजंतूंकडे कुणाचेच लक्ष नसते. त्यामुळे संपूर्णपणे विचार झाला पाहिजे. विकासासाठी जैवविविधता धोक्यात आणू नये आणि लहान मुलांच्या मनात त्याबाबत आदर उत्पन्न करण्याचेही प्रयत्न झाले पाहिजे, असे आवाहनही जोशी यांनी यावेळी केले.
अध्यक्षपदावरून बोलताना मारुती चितमपल्ली यांनी, आदर्श काय आहे, हे बघितल्याशिवाय जैवविविधतेची अधोगती कशी होते, हे लक्षात येणार नाही. केरळमधील सायलेंट व्हॅलीत आदर्श जैवविविधता आहे. महाराष्ट्रातील जैवविविधता किती झपाटय़ाने ऱ्हास पावत आहे, याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. राजकारणी सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून या जैवविविधतेचे अक्षम्य नुकसान करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे या कायदा प्रभावी अंमलासाठी तो सर्वसामान्यांना समजेल, अशी सोप्या मराठी भाषेत साहित्य आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कायद्याच्या विविध पैलूंबाबत बोलताना अ‍ॅड. आनंद गोडे म्हणाले, या कायद्यात शासनाच्या विविध संस्था समाविष्ट आहेत परंतु, यात समन्वय नसतो. त्यामुळे अंमलबजावणी करताना अडचणी येतात. हा कायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यामागे एखादी चळवळ किंवा लोकोत्तर व्यक्ती उभी असणे आवश्यक आहे. तसे या कायद्याबाबत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जगा आणि जगू द्या, या उक्तीनुसार आम्ही जगणे शिकलो परंतु, जगू देणे मात्र सोयीस्करपणे विसरलो, असा आरोप करून ते म्हणाले. जैवविविधता नष्ट करण्याचा सपाटा लावलेल्या मानवाला जेव्हा अस्तित्वाचाच धोका लक्षात आला तेव्हा ते खडबडून जागा झाला, असे ते म्हणाले. दिलीप गोडे यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केली.