Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

नवनीत

अरब आणि तुर्क दोघेही आरंभी टोळय़ा करूनच लूटमार करण्यासाठी भारताकडे आले. अरबाच्या मानाने तुर्काना अधिक यश लाभले. कारण ते अधिक युद्धनिपुण तर होतेच, पण काफिरांना सजा करावी आणि अवघे लोक आपल्या धर्मात आणावेत अशी त्यांची जिद्द होती. त्यांचा उन्मादही

 

तसाच होता. त्यांनी हिंदू देवालये भ्रष्ट केली. कारण त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांनी हिंदू स्त्रियांना गुलाम केले, कारण त्यांना भोग प्रिय होता. लहान बालकांनाही कैद केले, कारण त्यांना दहशत निर्माण करायची होती. तुर्काना जेव्हा दिल्लीचे राज्य आणि सभोवतीचा गंगा-यमुनाचा मैदानी सुपीक प्रदेश मिळाला, शिवाय निमूटपणे गुलामी स्वीकारणारे प्रजाजन मिळाले, तेव्हा त्यांनी आपले सारे लक्ष भोगविलासावर केंद्रित केले. त्यासाठीच सत्ता मिळविणे आणि ती क्रूरपणे राबविणे आणि टिकविणे हे त्यांचे ध्येय बनले. सुलतानी शासनाला मुसलमानी धर्मशास्त्र म्हणजे ‘शरीअत’चा आधार घेतला जाई. ते सांगणारे धर्मशास्त्री म्हणजे ‘उलेमा’ महत्त्वाचे ठरतात. ते सत्ताधीशाचा कल पाहून निर्णय देत. अनियंत्रित सत्ताधीशच महत्त्वाचा मानून तथाकथित धर्मशास्त्राचा दांभिकपणा चालत असे. सर्वसामान्य प्रजाजन हिंदू होते. त्यांना कोणी वाली नव्हता. ते आपल्या धर्मविधीत, कर्मकांड, तीर्थयात्रांत आणि त्यामुळे पंडेपुजाऱ्यांवर अवलंबून राहात. त्यांचे राजेरजवाडे सुलतानाचे बंदे म्हणजे आधीन सेवक बनले होते. त्यांच्यात जे आचार्य पंडित होते ते बव्हंशी उच्चवर्णीय आणि आत्मकेंद्रित होते. त्यांना समाजोद्धारासाठी संघर्ष करावा, असे वाटत नसे. पांडित्य प्रदर्शन आणि त्यासाठी काथ्याकूट हा त्यांचा छंद होता. याही दुर्दैवी वास्तवाचा लाभ शरीअतकार उलेमा आणि पिसाट वृत्तीचे विलासी सुलतान यांना चांगल्याप्रकारे घेता आला. सत्ताधाऱ्यांना उपलब्ध असलेल्या चार मार्गापैकी तीन मार्ग मूर्तिपूजकांना आपल्या राज्यातून हुसकावून कसे लावावे हे सांगणारे होते. चौथा मार्ग फार वेगळा नव्हता. तो उलेमांच्या आधीन राहून सत्तेवरील माणसाने किती कडक धर्माचरण करावे ते सांगणारा असे. तो अर्थातच ऐषोआरामी सुलतानांना अनुपयोगी होता. तो स्वीकारणे त्यांना सोईचे नव्हते. व्यवहारवादी उलेमांनीही त्या मार्गाचा आग्रह धरला नाही. या साऱ्या कठोर राज्यप्रणालीत हिंदूंची सर्व बाजूंनी कोंडी झाली. त्यांची श्रद्धास्थाने भ्रष्ट केली गेली. त्यांचे ज्ञानविज्ञान उपेक्षित राहिले, उलट त्यांच्यातीलही जे हिणकस होते तेच व्यवहारात दिसू लागले. अशोक कामत

ग्रहणांचं जे चक्र असल्याचं म्हटलं जातं, ते चक्र काय आहे?
एका ठरावीक कालावधीनंतर एकाच प्रकारचं ग्रहण पुन्हा दिसतं. या ग्रहणचक्राची प्राचीन काळापासून लोकांना कल्पना होती. सुमारे अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी मध्य आशियातील खाल्डिअन संस्कृतीमधील लोकांना ग्रहणाची ही वारंवारिता माहीत होती. आकाशातील ज्या भागात सूर्य व चंद्र असताना ग्रहण झालं होतं, त्याच भागात विशिष्ट काळानंतर साधारणपणे त्याच कालावधीचं ग्रहण होतं. कोणत्याही एका सूर्यग्रहणाची किंवा चंद्रग्रहणाची तारीख घ्या. त्यात १८ वर्ष ११ दिवस मिळवा. भविष्यातील या दिवसाच्या ग्रहणांचं भाकीत तुम्हाला करता येईल. ग्रीक संस्कृतीतील लोकांनाही या ग्रहणचक्राची कल्पना होती. शेल्स, हिप्पार्कस या ग्रीक शास्त्रज्ञांनी या ग्रहणचक्राचा आधार घेऊन भाकीतं केली होती. प्लीनी या रोमन शास्त्रज्ञाने आपल्या पुस्तकात या ग्रहणचक्राचा स्पष्ट उल्लेख केला आहे. आधुनिक काळात एडमंड हॅले या शास्त्रज्ञाने प्लीनीच्या पुस्तकाचा दाखला देऊन या ग्रहणचक्राला ‘सॅरोस’ असे नाव दिले. पौर्णिमा ते पौर्णिमा किंवा अमावस्या ते अमावस्या या सुमारे तीस दिवसांच्या कालावधीला ‘सांवासिक चांद्रमास’ म्हणतात. असे २२३ चांद्रमास मिळून १८ वर्षे ११ दिवसांचा कालावधी होतो. चंद्राची कक्षा सूर्य-पृथ्वी प्रतलाला जेथे छेदते त्या दोन बिंदूंना राहू व केतू असं म्हणतात. हे बिंदू त्या प्रतलावर हळूहळू मागे सरकतात. त्यामुळे सूर्य एकदा राहू बिंदूवर आल्यावर पुन्हा त्याच बिंदूवर यायला ३६५ दिवसांच्या ऐवजी सुमारे ३४६ दिवस लागतात. ३४६ दिवसांच्या या कालावधीला ‘ग्रहणवर्ष’ असं म्हणतात. हा १९ ग्रहणवर्षांचा कालावधी बरोबर १८ वर्षे ११ दिवस एवढाच येतो. त्यामुळे दर १८ वर्षे ११ दिवसांनी त्याच प्रकारचं ग्रहण होतं.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

‘जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत माझे नाव दुमदुमत राहील,’ असे धाडसी कृत्य केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्याने केली होती आणि ही प्रतिज्ञा ६ एप्रिल १९०९ रोजी उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवून त्यांनी खरी केली. रॉबर्ट पीअरी हे त्या वीराचे नाव. त्याचा जन्म १८५६ रोजी अमेरिकेत झाला. पेशाने सिव्हिल इंजिनिअर असणारा पीअरी अमेरिकन नौदलात कार्यरत होता. त्या काळात अनेक देशांतील गिर्यारोहक उत्तर ध्रुव गाठण्याचा प्रयत्न करीत होते. पीअरी त्यात आघाडीवर होता. ग्रीनलँड शोधून त्याने एक पाऊल पुढे टाकले होते. १८९१ ते १९०९ या अठरा वर्षांच्या कालखंडात त्याने उत्तर ध्रुवीय प्रदेशात अनेक मोहिमा आखल्या. पहिली १८९९ मधील मोहीम धुके, वादळे, बर्फाचे प्रवाह यामुळे अपयशी ठरली. १९०२ ची मोहीम हिमवादळामुळे अपयशी ठरली. १९०६ च्या मोहिमेच्या वेळेस तर तो उत्तर ध्रुवापासून केवळ १७४ मैल दूर अंतरावर उभा होता. वयाच्या ५४ व्या वर्षी तो पुन्हा उत्तर ध्रुवाच्या मोहिमेसाठी सज्ज झाला. फेब्रुवारी १९०९ च्या सुमारास तो निघाला. या मोहिमेला अमेरिकन सरकारने त्याला साहाय्य केले. १४ माणसे, १३३ कुत्री आणि १९ घसरगाडय़ा दिल्या. उ. ध्रुवापासून तो केवळ १३० मैल दूर होता तेव्हा त्याने आपल्या ब्रिटिश सहकाऱ्याला माघारी पाठवले. कारण त्याचे श्रेय फक्त तो आणि अमेरिका असेच असावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. अखेर ६ एप्रिल १९०९ रोजी त्याने उ. ध्रुवावर पाऊल ठेवून त्याने इतिहास घडवला! तेथे अमेरिकेचा झेंडा फडकावून पीअरी परतला, आणि.. फ्रेडरिक कुक या अमेरिकन संशोधकाने १९०८ सालीच आपण उ. ध्रुवावर पाऊल ठेवल्याचा दावा केला. अखेर पीअरी हाच उ. ध्रुवावर पहिले पाऊल ठेवणारा मानव हे सिद्ध झाले. १९२० च्या सुमारास वयाच्या ६४ वर्षी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

सुपीक प्रदेश. त्यातले छोटेसे खेडे. त्यातले चिमुकले घर आणि त्या घराच्या मालकीची दोन-पाच एकरांची शेती. घरात आई-वडील आणि भावंडे. थोरला मुलगा धर्मा. त्याच्याखालोखाल छोटी भावंडे. लहान भावंडे घरात आईला मदत करायची आणि धर्मा वडिलांना शेतावर शेतकामात मदत करायचा. जमीन नांगरायला, पेरणी करायला, शेताला पाणी सोडायला, दार धरायला, खत घालायला, तंबाखूचं औषधी पाणी मारायला.. एक ना दोन.. शेतीची काम तरी किती म्हणून असायची. धर्माला खूप वेड होतं वाचनाचं. जेव्हा बघावं तेव्हा हातात गोष्टीचं पुस्तक असायचं. धर्मा पंधरा वर्षांचा होता. उशीरा शाळेत घातल्याने आठवीच्या वर्गात शिकत होता. पण वाचन खूप. त्यामुळे वर्गातल्या इतर मुलांच्या मानाने त्याला कितीतरी जास्त माहिती होती. त्याच्याजवळ शहाणपण आणि समजूतदारपणाही आला होता वाचनामुळे. तो घरी आईला कामात मदत करायचा. शिवाय धाकटय़ा भावंडांचा गृहपाठ करून घ्यायचा. त्याच्या वडिलांना तर शेतीच्या कामात धर्मा उजवा हातच वाटायचा. धर्माच्या शिवाय पानसुद्धा हलायचे नाही शेतकामातले. आई कौतुकाने म्हणायची,‘‘माझा धर्मा खूप बुकं वाचतो. त्यामुळेच इतका गुणी झालाय. शहाणा झालाय.’’ वडिलांनाही धर्माचा फार अभिमान वाटायचा. ते म्हणायचे,‘‘पुस्तकं वाचून तो खूप हुशार होणार, खूप शिकणार आणि कलेक्टरसाहेब होणार.’’ कोणी त्याच्याबद्दल काही स्वप्ने पाहोत, काही म्हणोत, धर्मा आपला काम करण्यात आणि वाचन करण्यात दंग असायचा. त्या छोटय़ाशा खेडय़ातले लोक म्हणायचे,‘‘धर्मा खूप बुकं वाचतो. जेव्हा बघावं तेव्हा हातात पुस्तक असतं त्याच्या. हा नक्की शाळामास्तर होणार.’’ वाचताना एकदा धर्माच्या हातात छोटेसे बत्तीस पानांचे पुस्तक आले. ते पुस्तक धर्माला फार आवडले. युवराजपद सोडून तरुणपणीच जग दु:खमय आहे हे समजल्याने जो राज्य, राजवाडा, पत्नी, मुलगा यांचा त्याग करून बाहेर पडला. जगातली दु:खं पाहून त्याच्या हृदयात असीम करुणा उत्पन्न झाली. जगाचे दु:ख दूर करण्याच्या मार्गाचा शोध त्याने सुरू केला. खडतर तप, ध्यानसाधनेनंतर त्याला ज्ञान प्राप्त झाले. बौद्ध धर्माचा उपदेश त्याने जगाला केला. धर्मा हे पुस्तक वाचून भारावला. त्याने बुद्धधर्माचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. आपलं छोटं गाव सोडून तो पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संस्कृत व पाली शिकण्यासाठी आला. तिथे त्याला काशीला जाऊन संस्कृतचे प्राथमिक ज्ञान मिळवण्यास सांगितले गेले. ते धर्माने केले. पुन्हा येऊन उच्च शिक्षण घेतले आणि अत्यंत मेहनत, अभ्यासूवृत्ती आणि आपण जे करतो आहे त्यावरची अढळ निष्ठा यांच्या बळावर हा लहान मुलगा मोठेपणी बौद्ध धर्माचा विश्वविख्यात पंडित धर्मानंद कोसंबी झाला. एका छोटय़ा पुस्तकाने जीवनावर केवढा मोठा परिणाम केला. आपल्या जडणघडणीत कुठून कुठून काय काय आपल्या कामी येते. लेखक, कवी, नट, चित्रकार, शिल्पकार व त्यांची निर्मिती, क्रांतिकारक, प्रवासी, संशोधक, तत्त्वज्ञ, संत यांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. आजचा संकल्प - माझे वाचन व कलाप्रेम मी जाणीवपूर्वक वाढवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com