Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

उन्हाचा तडाखा नागपूर ४३.३, अकोला ४४
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

मार्च महिन्यातच चाळीशी गाठणाऱ्या पाऱ्याने आज त्यापुढे उसळी घेत संपूर्ण विदर्भाला भाजून काढले. सर्व जिल्ह्य़ांना रणरणत्या उन्हाचा तडाखा बसला असून अकोला येथे सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. आज सकाळपासूनच उष्ण हवेने वाढत्या तापमानाची चाहूल दिली होती. दुपारकडे उन्हाची तीव्रता अधिकच वाढली. कडक उन्हाचे चटके झोंबू लागल्याने त्याचा परिणाम रहदारीवरही झाला. घश्याला कोरड पाडणाऱ्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले. लोकसभा निवडणुकीची धामधुम असतानाही उन्हामुळे कार्यकर्ते आणि मतदारांवरही मरगळ आली आहे.

आबांचे हेलिकॉप्टर भरकटले
हेलिपॅडच्या शोधात दीड तास हवेतच

नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीची सगळीकडे धामधूम असताना प्रचार सभेला येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांचे हेलिकॉप्टर प्रचार सभेच्या ठिकाणी हेलिपॅड दिसत नसल्याने दीड तास हवेतच फिरत होते. अमरावतीचा कार्यक्रम आटोपून आर. आर. पाटील आज सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने नागपूरला येण्यासाठी निघाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्या प्रचारार्थ दत्तवाडीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

नागपूर व रामटेक मतदारसंघाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजिक करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये अधिकाऱ्यांनी आदर्श निवडणूक पद्धती राबवावी यासाठी ई.व्ही.एम. मशीनचे (व्होटींग मशीन) प्रात्यक्षिक प्रशिक्षण, स्लायडिंग शो व शंका समाधान आदी बाबींचा या प्रशिक्षण शिबिरामध्ये समावेश होता.

‘मानसन्मान’ ‘गुलमोहर’ व ‘अचानक’ त्रिधारा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

संजय फिल्म प्रायव्हेट लिमिटेडतर्फे१० ते १२ एप्रिल दरम्यान लक्ष्मीनगरातील सायंटिफीक सभागृहात वेगळे आशय असलेले तीन चित्रपट त्रिधारा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार आहे.
१० एप्रिलला सायंकाळी सात वाजता आर के. व्हीजन निर्मित ‘मानसन्मान’ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. जोशी नावाच्या वृद्ध आई बाबांची ही कथा आहे. बदलत्या काळाबरोबर माणूस इतका बदलला की महत्त्वाची संस्कार मूल्ये तो विसरलाय, अशा संस्कार मूल्यांची आठवण करून देणारा ‘मानसन्मान’ या चित्रपटात शिवाजी साटम, रिमा लागू, यतिन कारेकर, रेशम टिपणीस, अविष्कार दारव्हेकर व पंकज विष्णू या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. शनिवार ११ एप्रिलला गजेंद्र अहिरे यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

‘तांदळा’ने लावला चटका वक्त्यांचा सूर
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार लिखित ‘तांदळा’ या चित्रपटाने जीवाला चटका लावण्याची भावना या चित्रपटावरील चर्चेदरम्यान वक्तयांनी व्यक्त केली. ‘तांदळा’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रसार-प्रचाराचा एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व आकांक्षा मासिकातर्फे परिचर्चा आयोजित करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. आशा सावदेकर, कादंबरीकार डॉ. रवीन्द्र शोभणे, स्टेट बँकेचे सहायक व्यवस्थापक सतीश पिंपळे, निर्माती माधुरी अशिरगडे, आनंद अशिरगडे आणि लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी या चित्रपटाविषयी जमेची बाजू मांडली. या चर्चेच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी हे होते. या चित्रपटात स्त्रीची घुसमट दाखवण्यात आली असून स्त्रीच्याच नजरेतून हा चित्रपट पाहावा, असे आवाहन डॉ. आशा सावदेकर यांनी केले. सतीश पिंपळे यांनी, स्त्रीचे अबलापण दाखवू नये, अशी सूचना केली. डॉ. शोभणे यांनी, या चित्रपटाचा आरंभ व शेवट अंगावर येणारा आहे, असे मत व्यक्त केले. गिरीश गांधी यांनी, या चित्रपटाने मनाला चटका लावला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रा. द्वादशीवार म्हणाले, १९५० मध्ये तेलंगणातील एका गावात घडलेल्या घटनेत या चित्रपटाची बिजे दडलेली आहेत. कथानकातील सर्व पात्रे आपल्याला भेटली आहेत. स्त्रीचे व्यक्तिमत्त्व मारून टाकणारा असा ‘तांदळा’चा अर्थ असून तो आज काळसंगत ठरला आहे. यावेळी श्रोत्यांनीही प्रश्न उपस्थित केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. संचालन शुभा साठे यांनी केले. अरुणा सबाने यांनी आभार मानले.

कृपाल तुमाने यांची कुही तालुक्यात पदयात्रा
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजप युतीचे रामटेक लोकसभा क्षेत्रातील उमेदवार कृपाल तुमाने यांनी कुही तालुक्यात पदयात्रा काढली. पदयात्रेमध्ये उपजिल्हा प्रमुख बंडू तागडे, पांडुरंग बुराडे, चंद्रहास राऊत, अरविंद गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी तुमाने यांनी घरोघरी जाऊन मोठय़ांचे आर्शिवाद घेतले व अधिका अधिक मतांनी निवडून द्यावे, असे जनतेला आवाहन केले.
गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार माजी नगरसेवक दिलीप मडावी यांनी शहरातील आदिवासी भागांमध्ये बैठका घेऊन बोगस आदिवासींमुळे दोन लाख मुलांना नोकरी मिळाली नाही, असा आरोप केला. प्रत्येक राजकीय पक्षाने आदिवासींचा गैरफायदा घेतला असून समाजात बेरोजगारी निर्माण करण्यास सर्व पक्षातील राजकारणी जबाबदार आहेत. मात्र, आता समाजात लोकजागृती झाली असल्याचे मडावी म्हणाले. पक्षातर्फे दक्षिण पश्चिम, पश्चिम पूर्व, उत्तर नागपुरात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रा. मधुकर उईके, डॉ. मोतीराव कंगाले, मधुकरराव पस्चाके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

संत ताजुद्दीन बाबांचा वार्षिक उत्सव प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात साजरा
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

बाबा ताज पागलखाना शरीफ प्रबंधक समितीद्वारे २९ मार्च ते १ एप्रिलपर्यंत संत ताजुद्दीन बाबांचा ३६ वा वार्षिक उत्सव प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात साजरा करण्यात आला. मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डावरे यांच्या हस्ते झेंडावंदनाने उत्सवास सुरुवात झाली. चार दिवस चाललेल्या या उत्सवात ताजाबाद शरीफचा शाही संदल, वाकी दरबारचा संदल, मनोरुग्णालय कर्मचारी संघाचा संदल व भक्तांनी काढलेल्या संदलने दरबार परिसर दुमदुमून गेला होता. हरिओम बाबा ताज पारायण मंडळद्वारा बाबांच्या स्त्रोत्राचे पारायण करण्यात आले. कर्मयोगी दादाजी गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली भागवत गीतेचा पाठ करण्यात आला. यावेळी भक्त समुदाय मोठय़ा संख्येने उपस्थित होता. भक्तांना प्रसाद स्वरूप चादरी भेट देण्यात आल्या. या उत्सवादरम्यान केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी पूजा अर्चना करून दर्शन घेतले. सनारू ग्लोबल डेन्टल क्लिनिकच्या संचालिका डॉ. अरुणा पानसे यांनी उत्सवादरम्यान आरोग्य सेवा प्रदान केली. बाबा ताज पागलखाना शरीफ प्रबंधक समितीद्वारा पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष नारायणराव काटरपवार, फनीशचंद्र पिल्ले, शंकरराव निंबाळकर, मेवालाल वर्मा, अलीम, मो. सलीम, रफीक, सागर सहारे, सुनील बागडे, राजू सावरकर यांनी उत्सव साजरा करण्यास सहकार्य केले.

रिअर अ‍ॅडमिरल अशोक सुभेदार यांना विशिष्ट सेवा मेडल प्रदान
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

भारतीय नौदलात विशाखापट्टनममध्ये रिअर अ‍ॅडमिरल पदावर सेवेत असलेले अशोक सुभेदार यांना नुकतेच विशिष्ट सेवा मेडल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९७७ पासून भारतीय नौदलात रुजू झालेले अशोक सुभेदार दिंव. माजी आमदार वि.मा. सुभेदार व सामाजिक कार्यकर्त्यां शैलजा सुभेदार यांचे चिरंजीव आहेत. नागपुरात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल शाखेत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. ७७ पासून आजतागायत नौसेनेत गौरवास्पद कामगिरीबद्दल अशोक सुभेदार यांना विशाखापट्टनममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात चीफ ऑफ नेव्हल स्टाफ अ‍ॅडमिरल सुरेश मेहता यांच्या हस्ते विशिष्ट सेवा मेडल प्रदान करण्यात आले.

तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

काँग्रेसनगरमधील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता तीसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १० एप्रिलला शिबिराला प्रारंभ होणार असून या शिबिरात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खोखो. आटय़ा पाटय़ा तायक्वांडो, योगासने प्राणायम आदीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रीडा शिबीर १० एप्रिल ते २ मे आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा शिबीर १७ एप्रिल ते २ मे या कालावधित होईल. अधिक माहितीसाठी न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेसनगरमध्ये मोबाईल क्रमांक ९७६६८९३३८० येथे संपर्क साधावा.

सर्ववर्गीय कलार समाजाचे स्नेहमिलन
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ जिल्हा समिती, जैन कलार सेवा समिती, भारतीय कलचुरी सर्ववर्गीय महासभा, अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाज, उत्तर नागपूर कलार समाज, सर्व भाषिक कलार महासंघ, क्षत्रिय कलार समाज, महिला मंडळ कलार समाजाच्या संयुक्त विद्यमाने, सर्ववर्गीय कलार समाज स्नेहमिलन समारंभ जैन कलार समाज भवनात नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र दुरूगकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, छाया मुत्तेमवार, माजी आमदार अविनाश वारजूरकर, अनिल अहीरकर, अशोक खानोरकर, नगरसेवक विकास खोब्रागडे, भूषण दडवे, प्रा. राजा दुरुगकर, शशी समर्थ, यशवंत तिडके, नगर काँग्रेसचे महासचिव कमलेश समर्थ, डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष यादव शिरपूरकर, सेवादलचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, महाराष्ट्र राज्य पंचायतच्या संयोजिका मंदा ठवरे, शीला दुरुगकर, कृष्णा खानोरकर, सचिन दुरुगकर, अनिल तिडके, विलास हरडे, मनीष भांडारकर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

पोलीस लाईन्स टाकळी येथील चोपडे लॉन्समध्ये गुडीपाडव्याला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम माजी नगरसेवक रमेश चोपडे यांनी आयोजित केला होता.
राष्ट्रीय भाजप कार्यकारिणी सदस्य संजय जोशी यांच्या हस्ते बोरगाव, िझगाबाई टाकळी, गोरेवाडा, मकरधोकडा व हजारी पहाड या परिसरातील नागरिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तीमध्ये वामनराव बरडे, श्यामराव चोपडे, बाबा लतिफ पटेल, धर्मराज नगराळे, घनश्याम अंजनकर, देवराव डोर्लीकर, उमराव राऊत, दादासाहेब राऊळ, वामनराव खडगी, वासुदेवराव शिंगणे, रुपचंद्र उईके, रामाजी सातपुते यांचा समावेश आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. मंगेश निलजकर, भूषण शिंगणे, किशन गावंडे, राजीव हडप, अ‍ॅड. ललित सगदेव, अवधुत मेटकर, कृष्णाजी बरडे, चंद्रकांत नवघरे, अरविंद मदने, रवी वऱ्हाडे, प्रदीप बोरडे, मीना तिडके, नगरसेवक परिणय फुके, कमलेश चौधरी, माजी नगरसेवक दत्तू थेटे, संजय हेजीब प्रामुख्याने उपस्थित होते. ज्येष्ठांचा सत्कार केल्यास त्यांना जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. आपण उपेक्षित नसून समाजाचेच घटक असल्याचे ज्येष्ठांच्या लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या मनातील नकारार्थी भावना नष्ट होत असल्याचे संजय जोशी याप्रसंगी म्हणाले. स्वप्नील लाबडे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण काळे यांनी संचालन केले. रमेश चोपडे यांनी आभार मानले.

उद्या केंद्र व राज्य शासनाची कार्यालये सुरू राहणार
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक २००९ चे द्वितीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आदेश वितरित करावयाचे असल्यामुळे उद्या, मंगळवारी, ७ एप्रिलला सर्व केंद्रीय व राज्य शासनाची कार्यालये सुरू ठेवण्यात येत आहेत. ७ एप्रिल (मंगळवारला) महावीर जयंतीची शासकीय सुटी असली तरी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

युवा स्नेह प्राथमिक शाळेत स्नेहमिलन सोहोळा
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

युवास्नेह मंडळद्वारा संचालित अयोध्यानगरातील युवा स्नेह प्राथमिक शाळा व शिशु मंदिर येथे सरस्वती पूजन व स्नेहमिलन सोहोळा पार पडला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यवाह दिलीप सुरकार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पालक कृती समितीचे संयोजक रमेश तळेकर, भावसार विकास मंचचे संयोजक विष्णुपंत रितपूरकर, युवा स्नेह मंडळाचे सचिव रमेश काळे, राजे रघुजी नगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष घनश्याम कामुने उपस्थित होते. अशा कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होत असल्याचे सुरकार म्हणाले. याप्रसंगी अन्य पाहुण्यांनीही त्यांचे विचार मांडले. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वत्कृत्व व नृत्य स्पर्धेचा समावेश होता. शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी घोटकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संचालन जाधव यांनी केले. चौधरी यांनी आभार मानले.

हिंदू ज्ञानपीठात गुणगौरव कार्यक्रम
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

शिक्षक मुलांना घडवण्याचे कार्य करतात. गेल्या ४० वर्षांपासून हिंदू ज्ञानपीठ मुलांना घडवण्याचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन महापौर माया इवनाते यांनी केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून धरमपेठेतील हिंदू ज्ञानपीठात गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अशोक मानकर होते. हिंदू ज्ञानपीठ हे सुसंस्कारीत नवपिढी घडवण्याचे कार्य करून राष्ट्रघडणीस मोठा हातभार लावत आहे, असे मत अशोक मानकर यांनी मांडले. गेल्या ४० वर्षांंपासून हिंदू राष्ट्राचा गुढीपाडवा हा नूतनवर्षदिन म्हणून साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हिंदू ज्ञानपीठ करत आहे, ही अतिशय प्रशंसनीय बाब आहे, असे मानकर म्हणाले. या कार्यक्रमात हर्ष चुडासामा, सागर गुप्ता, पीयूष डवले, अभिजित आंबोकर, रोहित ढोले यांचा सत्कार करण्यात आला. सुपर क्रिकेट स्पध्रेत यश मिळवणाऱ्या तेजोबाला मारीशेट्टी, स्वप्नील महाजन, रजत पिल्लेवान, रजत केवटे, आकाश शुक्ला, नितेश झा, अमित झा, राहूल शाहू यांचा सत्कार करण्यात आला. शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पूजा जोशी, निखील मोहाडीकर, रीमा बोकडे, वृषाली गायकवाड, सौरभ प्रधान, मोना खंडाईत, संकेत भोयर, गिरीजेश त्रिपाठी तसेच रियल टेक्नॉलॉजी कॉम्प्यूटरमध्ये यश मिळवणाऱ्या आकाश कुंभारे, उत्कर्षां दशपुत्रे, रोशनी गुंडावाले यांचाही सत्कार करण्यात आला.

सारथीचा जाहीरनामा, मतदारांना जागृत करण्याचा उद्देश
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

निवडणुकीनिमित्त सारथी संस्थेने स्वत:चा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लोकशाहीमध्ये मतदान हेच एकमेव निर्णायक शस्त्र आहे. परंतु मतदारांना बरेचदा त्याची जाणीव नसते. भारतात पक्षीय व जातीय मतदारांची मते पक्की झालेली असतात. परंतु तरीही अनेक मतदार असतात व प्रत्येक निवडणुकीचे विश्लेषण पाहिल्यास हे स्पष्ट जाणवते की केवळ ५ ते १० टक्के मतदारांचा कल एका पक्षाकडे झाल्यास तो पक्ष राज्यावर येतो. म्हणून मतदारांनी त्यांची ताकद ओळखून विवेकपूर्ण मतदान केल्यास चांगले सरकार निवडून देऊ शकतात. मतदारांना स्वत:चा अभ्यास व मुद्दे आहेतच परंतु राष्ट्राचा विकास हा केंद्रबिंदू मानून काही मोजके मुद्दे सारथीने या जाहीरनाम्यात मांडले आहेत. जाहीरनाम्याचा उद्देश मतदारांना जागृत करण्याचा आहे. सारथीचे केवळ संपूर्ण विदर्भातच हजारो कार्यकर्ते व हितचिंतक आहेत, असे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, नासिक व इतरत्रही पसरलेले आहेत. या सर्व कार्यकर्त्यांवर हा जाहीरनामा उमेदवारांपर्यंत पोहचवून मतदारांना जागृत करण्याची जबाबदारी आहे. मतदारांनीही या सर्व मुद्दय़ांवर उमेदवारांना प्रश्न विचारावेत व त्यांच्याकडून ठोस उत्तरे घ्यावीत, अशी अपेक्षा आहे. हा विकास जाहीरनामा राष्ट्रीय मुद्दय़ांचा विचार करून केलेला आहे.