Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

कलमाडी जाणार ‘दादां’च्या भेटीला!
पुणे, ५ एप्रिल/प्रतिनिधी

‘अजित पवार पुण्यात आल्यानंतर आपण त्यांना स्वत: भेटायला जाणार आहोत आणि नवा मार्ग स्वीकारू’, अशा शब्दांत पुणे लोकसभा मतदारसंघाचे कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी सांगताच उपस्थित राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार झिंदाबादच्या घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. दरम्यान, कार्यकर्त्यांचा आणि पक्षाचा स्वाभिमान कोठेही दुखावला जाणार नाही याची काळजी घेत कलमाडी यांचा प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्धारही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी बोलून दाखविला.

अलुरकर यांच्या खुनाचे गूढ अद्याप कायमच !
पुणे, ५ एप्रिल/प्रतिनिधी

१४ डिसेंबर २००८- सुरेश अलुरकर यांचा खून.
१५ डिसेंबर २००८- अलुरकर यांच्या खूनप्रकरणी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध. १६ डिसेंबर २००८- अलुरकर यांचा खून मालमत्ता विक्रीच्या वादातून झाल्याचा संशय. १७ डिसेंबर २००८- अलुरकर खूनप्रकरणी तपास ‘जैसे-थे’.

.. खिशात रुपया नाही!
‘निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण एक वेळचे जेवायला तरी द्यायला पाहिजे.. फिरायला गाडय़ा हव्यात.. पत्रकेही छापायचीत, वाटायचीत..हो! पण माझ्या खिशात एक पैसा नाही, तरी मी हे बोलतोय!’ सामान्यातील सामान्यांचे, कामगार, गोरगरीब, कष्टकऱ्यांचे प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराचे हे प्रांजळ मनोगत ऐकून उपस्थितांना जरासे हसू फुटले. तितक्यात स्वत:ला सावरत, ‘मित्रांनो, काळजी करू नका! जनता आपल्या पाठीशी आहे.’ याशिवाय दोघा-तिघा बलाढय़ कार्यकर्त्यांचा बोट दाखवून नोमोल्लेख करत, ‘असे ताकदीचे लोकही आपल्याकडे आहेत बरं का’ अशी पुष्टी त्यांनी जोडली.

पाणीचोरीमुळे वारज्यात एकवेळच पाणी
शेकडो नळजोड बेकायदा

पुणे, ५ एप्रिल/खास प्रतिनिधी

दररोज होणारी लाखो लीटर पाण्याची चोरी, बेकायदा कनेक्शनचा सुळसुळाट, मशीनने पाणी खेचण्याचा प्रकार यामुळे वारजे माळवाडी परिसराच्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम झाला असून, या भागाला उद्या, सोमवारपासून एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बेकायदा कनेक्शन व पाण्यासाठी मशीनचा वापर करणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार आहे.
वारजे माळवाडी भागाला गेल्या आठवडय़ापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सकाळी वा सायंकाळी एक तासच पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी धांदल उडत आहे. ज्या भागात पाणी असेल तेथे अक्षरश: झुंबड होत आहे.

समझनेवालोंको इशारा काफी है..
लोक तर म्हणतात..
स्थळ : पुण्यातील एका प्रमुख राजकीय पक्षाचे कार्यालय.
वेळ: ‘भाईंचा प्रचार करा’, या साहेबांनी आक्रमक शैलीत दिलेल्या आदेशानंतरचा दिवस.
कार्यक्रम: साहेबांच्या आदेशाची चर्चा, चर्चा आणि चर्चा (काही उलट, काही सुलट, पण बहुतेकवेळा उलटच..) ‘‘काय बोललेत साहेब, भाईंच्या गोटात कालपर्यंत ‘भय हो’ गाणं वाजत होतं. साहेबांमुळं आता तेच ‘जय हो’, असं ऐकू यायला लागलंय..’’ ‘‘उंहूं, मला नाय पटत तुमचं, साहेब एवढं बोलले, पण दादांचा पत्ता कुठंय?, त्यांना का नाही साहेबांनी आणलं येरवडय़ाच्या सभेला नाही तर ‘रेसिडेन्सी’ला..’’ ‘‘साहेब एवढं थेट बोलताना मी तर पहिल्यांदाच ऐकतोय, दिल्लीच्या ‘सेटींग’चं आश्वासन मिळाल्यासारखं वाटतयं..’’

फौजदार शेळकेला पकडण्यासाठी दोन स्वतंत्र पथके
अमोल कुचेकर मृत्यू प्रकरण
पुणे, ५ एप्रिल / प्रतिनिधी

वारजे पोलिसांच्या अटकेत असलेल्या तरूणाचा कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामदास शेळके यांच्यासह अन्य पाच पोलीस कर्मचाऱ्यांना दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दिले असून याकरिता विभागाची दोन स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. वारजेतील एका सोसायटीमध्ये घरफोडी करताना अमोल रघुनाथ कुचेकर (वय २७, रा. माळवाडी) याला तेथील रहिवाशांनी सहा मार्च रोजी सायंकाळी पकडले होते. त्यानंतर त्याला वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कुचेकर याला मारहाण करून गुन्हा कबूल करायला लावल्याप्रकरणी शेळके यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुचेकर याची पत्नी माधवी (वय २०) हिने याप्रकरणी फिर्याद दिली. कुचेकर याला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती, असे विभागाने आतापर्यंत केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. शेळके याच्यासह वारजे चौकीतील अन्य संबंधित पोलीस अद्याप पसार आहेत.

कुचेकर खूनप्रकरणी पोलीस अद्याप अटकेपासून दूर
पुणे, ४ एप्रिल / प्रतिनिधी

वारजे पोलिसांच्या अटकेत असलेल्या तरूणाचा कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलीस उपनिरीक्षक रामदास शेळके यांच्यासह अन्य पाच पोलीस कर्मचाऱ्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. शेळके यांना दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश सीआयडीने सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत, अशी माहिती विभागाचे पोलीस उपअधिक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी दिली. वारजेतील एका सोसायटीमध्ये घरफोडी करताना अमोल रघुनाथ कुचेकर (वय २७, रा. माळवाडी) याला तेथील रहिवाशांनी सहा मार्च रोजी सायंकाळी पकडले होते. त्यानंतर त्याला वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कुचेकर याला मारहाण करून गुन्हा कबूल करायला लावल्याप्रकरणी शेळके यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुचेकर याची पत्नी माधवी (वय २०) हिने याप्रकरणी फिर्याद दिली.

मार्सेलिसच्या बंदरावर सावरकरांच्या स्मारकाची मागणी
पुणे, ५ एप्रिल/प्रतिनिधी

‘सावरकरांची मार्सेलिस बंदरातील उडी’ हा एक चित्तथरारक इतिहास आहे आणि म्हणूनच मार्सेलिसच्या बंदरावर कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभे राहिलेच पाहिजे, अशी इच्छा सामाजिक कार्यकर्ते सुरेश बर्गे यांनी प्रकट केली. स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्थेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. बर्गे म्हणाले की, शेतकरीसुद्धा पोळा साजरा करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, परंतु आपले सरकार सावरकरांच्या प्रतिमेला साधा पुष्पहार देखील अर्पण करू शकत नाही. त्यामुळे आपले नेते व लोक वीर सावरकरांविषयी किती कृतघ्न आहेत. याचा प्रत्यय यातून येतो. या वेळी सावरकर साहित्याचे प्रसारक सूर्यकांत पाठक यांना ‘स्वा. सावरकर रत्न हा पुरस्कार’ संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला. या वेळी सूर्यकांत पाठक, मृत्युंजय कापसे, अभिजित कापसे आदी उपस्थितच होते.

टेम्पोच्या धडकेने शिक्षणसेवक मृत्युमुखी
आळंदी, ५ एप्रिल/वार्ताहर

पुण्याकडील बाजूने आळंदीत पायी येत असताना मागील बाजूने टेम्पोने ठोस दिल्याने झालेल्या अपघातात शिक्षणसेवक जागेवरच ठार झाला. या अपघातात ठार झालेल्या शिक्षणसेवकाचे नाव नितीन केमटारणे (रा. आळंदी, काळे कॉलनी) असे आहे. ते अविवाहित होते. येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत शिक्षणसेवक म्हणून गेले वर्षेभर काम पाहात होते. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. केमटारणे हे पुणे-आळंदी मार्गावरील झोपडपट्टीसमोरून आळंदीकडे पायी येत होते. त्यांना मागील बाजूने येऊन मुऱ्हे मोटर्स टेम्पो क्रमांक एमएच १२, ए क्यू ४९४७ ने जोरदार धडक दिल्याने ते जागेवरच ठार झाले. अपघातासंदर्भात पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत. ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालकांनी शिक्षणसेवकांचे दुर्दैवी निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली. विद्यालयाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ख्रिस्ती बांधवांचा ‘झावळ्याचा रविवार’उत्साहात साजरा
पिंपरी, ५ एप्रिल / प्रतिनिधी

उपदेश, भक्ती गीतांच्याद्वारे पिंपरी-चिंचवड, खडकी, दापोडी या परिसरातील ख्रिस्ती बांधवानी आज (रविवार), ‘झावळ्यांचा रविवार’(पाम संडे) मोठय़ा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या परिसरात देवाची गौरव गीत गाऊन प्रभात फेरी काढण्यात आली. चर्चचे धर्मगुरु यांनी विविध चर्चमधून शुभसंदेश व उपदेश दिले. खडकी दापोडी भागात कवायत ग्रुपच्यावतीने या प्रसंगी भक्तिगीते सादर करण्यात आली. गणेशनगर येथील विनियार्ड वर्कर्स चर्च येथे विविध कार्यक्रमांनी झावळ्याचा रविवार साजरा के ला. सकाळी ९ वाजता फुगेवाडी ते दापोडी चर्चपर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. पास्टर पिटर डेव्हिड सिल्वे,सिस्टर डयश्री सिल्वे यांच्यासह परदेशातून आलेले पास्टर बर्चनम यांना यावेळी उपदेश व शुभसंदेश दिले.ख्रिस्ती बाधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

‘पाकिस्तानविषयी ठोस भूमिका न घेतल्याने दहशतवादात वाढ ’
पुणे, ५ एप्रिल/प्रतिनिधी

काँग्रेस नेतृत्वाखालील शासनाने पाकिस्तानच्या विरोधात ठोस भूमिका न घेतल्याने देशात दहशतवादाचा धोका वाढला आहे असा आरोप शिवसेना नेते अविनाश धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजप-सेना युतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारार्थ तयार केलेल्या परिवर्तन प्रचार रथाचे धर्माधिकारी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अनिल शिरोळे, भाजप शहराध्यक्ष गिरीश बापट, नगरसेवक उज्ज्वल केसकर उपस्थित होते. धर्माधिकारी म्हणाले, की दहशतवादामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यूपीए सरकारने दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेऊन पाकिस्तान विरोधी कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र शासनाने काहीही केले नाही. त्याचप्रमाणे काही भारतीयांची स्विस बँकेत १४७६ बिलियन डॉलर रक्कम पडून आहे. हा काळा पैसा देशात आणल्यास देश जगातील कोणत्याही देशाला मागे टाकेल. त्यापेक्षा जास्त येथील काही नेत्यांनी ही रक्कम लुबाडली आहे. खासदार सुरेश कलमाडी यांनी शहराच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिले नाही असे सांगून सुशिक्षित मतदारांनी राजकीय डाव बाजूला सारून मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. देशातील राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी मध्यमवर्गीय सुशिक्षित मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे असे आवाहनही धर्माधिकारी यांनी केले.