Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

.. खिशात रुपया नाही!
‘निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण एक वेळचे जेवायला तरी द्यायला पाहिजे.. फिरायला गाडय़ा हव्यात.. पत्रकेही छापायचीत, वाटायचीत..हो! पण माझ्या खिशात एक पैसा नाही, तरी मी हे बोलतोय!’ सामान्यातील सामान्यांचे, कामगार, गोरगरीब,
क ष्टकऱ्यांचे प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराचे हे प्रांजळ मनोगत ऐकून उपस्थितांना

 

जरासे हसू फुटले. तितक्यात स्वत:ला सावरत, ‘मित्रांनो, काळजी करू नका! जनता आपल्या पाठीशी आहे.’ याशिवाय दोघा-तिघा बलाढय़ कार्यकर्त्यांचा बोट दाखवून नोमोल्लेख करत, ‘असे ताकदीचे लोकही आपल्याकडे आहेत बरं का’ अशी पुष्टी त्यांनी जोडली. त्याबरोबर मागच्या तथाकथित ताकदवान महाशयांनी माझ्याकडून उद्यापासूनच निवडणुकीपुरत्या एक नाही तर दोन जीपगाडय़ा, अशी ग्वाही दिली. ‘ताकदवान’ हे संबोधन इतके लागू पडले, की पाठोपाठ आणखी दोघांनी आमचीही संपूर्ण निवडणुकीसाठी एक-एक गाडी, अशी घोषणा केली. निवडणूक साधनसामग्रीची ही देणगी पाहून एका पक्षसंघटनेने थेरगाव येथे कार्यालय, दुसऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेने वेबसाईटवर उमेदवाराची माहिती देण्याचे आश्वासन दिले. निधिसंकलनाचा विषय निघाला तेव्हाही या उमेदवाराने आवाहन करण्यापूर्वीच एका प्राध्यापकांनी आम्ही संकलन सुरू केले, दोन दिवसांत तुमच्याकडे पैसे पोहोचतील, इतकी खात्री दिली. सामान्य जनतेच्या या उमेदवाराला मिळणारा हा पाठिंबा पाहून सभागृहात त्यांच्या शेजारी बसलेला सहज बोलून गेला, ‘आजवरच्या चळवळीतील तुमच्या कामाची ही पावती आहे, याला खरी ‘ताकद’ म्हणतात. कारण दुसरे उमेदवार स्वत:चे पैसे वाटतात, मात्र इथे चक्क जनताच उमेदवारासाठी पैसे गोळा करते. मग सांगा, ताकदवान क ोण?’ हा सवाल ऐकून उमेदवारही काहीसा गहिवरला इतकेच!
मते आणि ताटे
उमेदवाराचे प्रचार दौरे म्हणजे खरं तर तहानभूक विसरून मतदार राजापर्यंत पोहचणं, असे असताना उमेदवार एक वेळ भुकेसाठी तग धरील, कारण निवडून आल्यावरच तो खऱ्या अर्थाने राजा बनतो. परंतु, त्याचे समर्थक, कार्यकर्त्यांचे तसे नसते. पोटाला चिमटा घेऊन फार काळ ते प्रचार करू शकत नाहीत. ऐन उन्हाच्या तडाख्यात कावळे ओरडू लागतात त्यावेळी या कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था गावातल्या एखाद्या निष्ठावानालाच करावी लागते. जुन्नर तालुक्यातील अशाच एका प्रचार दौऱ्यावरील कार्यकर्त्यांची व्यवस्था एका गावातील कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली होती. त्यानेही त्यासाठी उत्तम व्यवस्था केली. मात्र सभेच्या निमित्त या दौऱ्यातील कार्यकर्त्यांची संख्या एकदम वाढल्याने त्याचा ताण भोजन व्यवस्थेवर आला. त्याच्याकडील ताटे संपल्याने त्याने शेजाऱ्या- पाजाऱ्यांकडून ती गोळा करायला सुरुवात केली. चाणाक्ष पत्रकारांनी नेमके हे टिपले. त्यामुळे तर अर्धमेला झाला. आपल्या अस्सल ग्रामीण ढंगात तो म्हणाला ‘काय करता, ‘पितळ्या’ शोधतोय!’ पत्रकारांनीही ही बाब नजरेआड केली. मात्र, मते मागण्यासाठी आलेल्या उमेदवारामुळे दारोदार फिरून पितळ्या गोळा करण्याची वेळ या यजमानावर आली.