Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

व्यक्तिवेध

‘माणसानं नेहमी नम्र, निरहंकारी आणि साध्या वृत्तीचे असायला हवे. विनयशीलता आणि नम्रता हे गुण तर प्रत्येक माणसात असायलाच हवेत. खास करून डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये! त्यातही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लो प्रोफाइल राहायला हवे’.. हे शब्द आहेत डॉक्टरांमधील ईश्वर मानल्या गेलेल्या डॉ. कृष्णन राममूर्ती यांचे! ‘डॉक्टरांचेही डॉक्टर’ म्हणून गौरविले गेलेले डॉ. राममूर्ती यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी लोटलेल्या जनसागरावरून त्यांच्या लोकप्रियतेची खात्री पटावी. डॉक्टर आणि वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी यांच्यामध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय होते. अनेक रुग्णांना त्यांनी मृत्यूच्या दारातून खेचून परत आणले होते. प्रत्येक रुग्णाशी संवाद साधण्याची एक अनोखी हातोटी त्यांनी विकसित केली होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर या सर्वामध्ये तुफान लोकप्रिय असतानाही ते स्वत मात्र नेहमीच लो प्रोफाइल रहात. वैद्यकशास्त्राची पदवी हाती पडल्यानंतर हाय प्रोफाइलचे

 

वेध लागलेल्या तरुण डॉक्टरांसाठी म्हणूनच त्यांचे हे शब्द खूप महत्त्वाचे होते..! डॉ. राममूर्ती यांच्या शब्दांना अधिक महत्त्व प्राप्त होते ते त्यांच्या ‘बोले तैसा चाले’ या वृत्तीमुळे. जे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, ते स्वत आयुष्यभर जपून एक वेगळा आदर्शच सर्वासमोर ठेवला. त्यामुळेच त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित होत असे. डॉ. राममूर्ती यांचा जन्म मुंबईचाच. शालेय शिक्षण किंग्ज सर्कल येथील एसआयईएस शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया कॉलेजमध्ये झाले. ज्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले ती शाळा स्थापन करण्यात त्यांच्या वडिलांचा मोलाचा वाटा होता, तर ज्या रुग्णालयात त्यांचा जन्म झाला तेदेखील त्यांच्या वडिलांचेच रुग्णालय होते. त्यांचे वडील डॉ. कृष्णन हेदेखील उत्तम डॉक्टर होते. जी. एस. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी मेडिसिन आणि फार्माकॉलॉजी या विषयांमध्ये एम. डी. केले. लोकमान्य टिळक वैद्यक महाविद्यालयामध्ये मेडिसिन आणि फार्माकॉलॉजीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गेली अनेक वर्षे ते शुश्रूषा, लीलावती आदी रुग्णालयांमध्ये मानद डॉक्टर म्हणूनही काम पाहत होते. परंतु, आयुष्याच्या अखेपर्यंत शिक्षण हाच त्यांचा मुख्य आवडीचा विषय राहिला. वैद्यक महाविद्यालयांमध्ये याही वयात ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून दर सोमवारी व्याख्यानांसाठी जात असत. त्या व्याख्यानांमध्ये कधी खंड पडला नाही. १९९१ साली ते लोकमान्य टिळक वैद्यक महाविद्यालयातून निवृत्त झाले. पण ते मनाने तहहयात शिक्षकच होते. त्यांचे अनेक विद्यार्थी नंतर विख्यात डॉक्टर्स झाले. अनेक पुरस्कारांनी डॉ. राममूर्ती यांना गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये कर्मयोगी या वैद्यक क्षेत्रासाठीच्या सर्वोत्तम पुरस्काराचाही समावेश आहे. पण रुग्णाकडून व्यक्त झालेले समाधान हाच सर्वात मोठा पुरस्कार असे ते नेहमी म्हणत. महत्त्वाचे म्हणजे ते दाक्षिणात्य असले तरी अस्खलित मराठी बोलत. मराठीतून बोलणेही त्यांना आवडायचे. रुग्णाशी संवाद साधायला हवा. तो नेमका असेल तर त्या संवादानेच रुग्ण अर्धा बरा होतो, असे ते मानायचे. अधिकाधिक रुग्ण स्वीकारायचे की, मग मिळकतही बऱ्यापैकी होते हा सध्याचा खाक्या आहे. डॉ. राममूर्ती हे त्याला अपवाद होते. रुग्णाला अधिक वेळ दिला पाहिजे, असे ते नेहमी म्हणायचे. रुग्णांना पुरेसा वेळ देऊन नेमके निदान करावे. निदान त्याला स्पष्टपणे आणि व्यवस्थित समजावून सांगावे. त्याच्या मनात कोणतीही शंका राहाता कामा नये. रुग्ण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अ‍ॅक्टिव्ह असतील, हे डॉक्टरांनी पाहिले पाहिजे. डॉक्टर हाही माणूसच असतो. तोही चुकतो कधीतरी. पण शिक्षण हे स्वतच्या आणि दुसऱ्यांच्याही चुकांमधून घडते.. असा कानमंत्र प्रत्येक विद्यार्थ्यांला ते देत असत. आज त्यांचे हे विद्यार्थीच वैद्यक क्षेत्रामध्ये समाजाची सेवा करत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढील पिढीसाठी आदर्श ठरू पाहात आहेत. एका शिक्षकासाठी यापेक्षा वेगळी आदरांजली काय असू शकते!