Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

मतदार राजा तूच आत्मपरीक्षण कर
चंद्रकांत ढाकुलकर

राजकारणाच्या रणांगणात परस्परविरोधी तुताऱ्या फुंकल्या गेल्या आणि आता अनेक रणधीरांची फक्त विजयाच्याच दिशेने घोडदौड सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या या रणभूमीवर अर्जुनाला पडले तसे प्रश्न कोणत्याही रणवीराला पडणार नसले तरी त्या प्रत्येकामागे किती तरी कृष्णांची शिष्टाई आहे. स्टार प्रचारकाच्या रूपाने प्रत्येक पक्षातील काही कृष्ण प्रचार सभा गाजवत आहेत. एरवी विस्मरणात गेलेल्या मतदार राजाला आर्जवे केली जात आहेत. लोकशाही राज्यप्रणालीत ते अपरिहार्य आहे. अशा या वातावरणात काही मतदार मात्र आजही योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत.

पोखरीत गोठय़ाला आग, दोघांचा मृत्यू
पुसद, ५ एप्रिल / वार्ताहर

पुसद शहरात संचारबंदी कायम
घटनेचे परिसरात तीव्र पडसाद
शांतता समितीची बैठक
पुसद येथील हिंसाचाराचे तीव्र पडसाद परिसरातील पोखरी, बांशी, भोजला येथे उमटले असून एका गोठय़ाला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला. शहरात संचारबंदी कायम असून जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी रविवारी दुपारी १ वाजता येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शहरात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याच्यादृष्टीने नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

वचनाचा पुनरुच्चार!
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशात टिपेला पोहोचलेली असताना इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या ‘लोकसत्ता’ची विदर्भ आवृत्ती आज १८ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता, स्वतंत्र आणि निर्भीड बाणा पाळण्याचे आणि बांधिलकी केवळ वाचकांशी ठेवण्याचे जे वचन १७ वर्षांपूर्वी दिले होते त्याच्याशी आजही लोकसत्ता कटिबद्ध आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचा ‘जर्नालिझम ऑफ करेज’चा वसा आजही तेवढय़ाच प्रखर निष्ठेने आम्ही पाळत आहोत. ‘लोकसत्ता’ येण्याआधी विदर्भात दैनिके नव्हती, असे नव्हे तर ती होतीच आणि ती त्यांच्या परीने विदर्भातील समस्यांना हातही घालत होतीच पण, ‘लोकसत्ता’ने विदर्भाच्या समाजकारण, राजकारण, अर्थकारण तसेच साहित्य-कला-संस्कृतीला राज्य आणि राष्ट्रीय भान मिळवून दिले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विदर्भाची दैनंदिन दखल घेण्याचे पर्व सुरू झाले ते ‘लोकसत्ता’च्या आगमनानंतरच.

चंद्रपूर कारागृहातील ६१ कैदी गांधी विचार परीक्षेत उत्तीर्ण
चंद्रपूर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्हा कारागृहातील ६१ कैदी गांधी विचार परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी कैद्यांना नुकतेच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. गांधीविचार कैद्यांनी स्वत:च्या आचरणात आणावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्य़ामुळे बऱ्याच युवकांना बंदीवान म्हणून जीवन जगावे लागते. बंदीवानाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल व्हावा, यासाठी सवरेदय मंडळ आणि गांधी विचार मंचच्या वतीने मराठी आणि हिंदी भाषेतील महात्मा गांधींच्या जीवनावर तीन पुस्तके कैद्यांना देऊन व त्यांना वाचावयास प्रवृत्त करून १५ दिवसानंतर त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

----------------------------------------------------------------------------

सभेला गैरहजर राहून आमदार देवतळेंचा मुख्यमंत्र्यांना खो!
चंद्रपूर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

आपल्या कार्यक्षेत्रात झालेल्या प्रचार सभेला गैरहजर राहून कॉंग्रेसचे आमदार संजय देवतळे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाच खो दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील मतभेद आणखी चव्हाटय़ावर आले आहेत. याच सभेला राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने अनुपस्थिती दर्शवत आपण पुगलिया यांच्या पाठिशी नाही, असा संदेश आघाडीच्या श्रेष्ठींना दिला आहे.

वाढत्या उन्हाचा प्रचाराला फटका
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक आता केवळ दहा दिवसांवर आली असल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. मात्र, वाढत्या उष्म्यामुळे प्रचारसभा, मिरवणुकींना मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने विविध राजकीय पक्षांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. यावेळी ऐन उन्हाळ्यात निवडणुका आल्या आहेत. या उन्हाळ्याची झलक फेब्रुवारीत मिळाली आणि मार्चमध्येच पाऱ्याने विक्रमी वेग घेतला. सकाळपासूच कडक उन्हाचे चटके बसू लागतात.

सारीपटावरून सरकला स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा!
नितीन तोटेवार

निवडणुका आल्या की राज्यकर्ते व विरोधी पक्षाला विदर्भाची आठवण येते. सत्तेच्या सारीपटावर हा प्रांत महत्त्वपूर्ण असल्याने याकडे दुर्लक्ष झालेले महागात पडू शकते म्हणून वेळोवेळी स्वतंत्र विदर्भ किंवा विदर्भ विकासाचे गाजर दाखवून राजकारण करण्यात आलेले आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर विविध राजकीय पक्ष व पुढाऱ्यांनी रान उठवले पण, यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे अद्याप एकाही पक्षाने किंवा पुढाऱ्याने विदर्भाबद्दल अवाक्षरही उच्चारलेला नाही. असमतोल विकास, अनुशेष, अन्याय असे अनेक मुद्दे निवडणुकीच्या काळात उपस्थित करण्यात येतात पण, या सर्व मुद्यांना यंदा ग्रहण लागले आहे. ‘जय विदर्भ’ म्हणणाऱ्यांचा आवाजही दबला आहे.

मोदींच्या झंझावाताबद्दल दावे-प्रतिदावे
विलासरावांची सभा ‘विक्रमी’ ठरवण्याचा प्रयत्न

वर्धा, ५ एप्रिल / प्रतिनिधी

भाजप नेते, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या येथे झालेल्या जाहीर सभे वर्धा मतदारसंघात भाजपचा झंझावात निर्माण झाल्याचा दावा भाजप-सेना युतीचे उमेदवार सुरेश वाघमारे यांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार अमर काळे यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. आर्वी येथील जाहीर सभेत भाजपचे ‘स्टार’ प्रचारक नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठा समुदाय उपस्थित होता. पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमे व पक्षाचे स्थानिक नेते उपस्थितांचा आकडा ४० हजारापेक्षा वाढत्या क्रमानेच सांगत आहेत, तर काँग्रेस नेत्यांनी १५ हजारापेक्षा जास्त गर्दी नसल्याचे स्पष्ट केले.

निवडणूक खर्चापेक्षा हिशेबाचीच उमेदवारांना धास्ती
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने ठरवून दिलेली खर्चाची मर्यादा अतिशय कमी असल्याने आणि प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक खर्च होत असल्याने त्याचा हिेशेब आयोगाकडे सादर करताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने २५ लाखाची खर्च मर्यादा ठरवून दिली आहे. पुनर्रचनेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघ हा सरासरी २५ लाख लोकसंख्येचा आहे. एका मतदारसंघात सरासरी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मतदारसंघाचा भौगौलिक विस्तार आणि त्यासाठी राबवावी लागणारी प्रचाराची साधने व त्यासाठी येणारा खर्च पाहता त्याचा मेळ आयोगाने घालून दिलेल्या खर्च मर्यादेत बसत नाही.

काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये आरोप-प्रत्यारोप
अकोल्यात राजकीय वातावरण तापले
अकोला, ५ एप्रिल/प्रतिनिधी

भारिप-बमसं आणि काँग्रेसनेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्यामुळे अकोला जिल्ह्य़ातील राजकीय वातावरण गेल्या दोन दिवसापासून चांगलेच तापले आहे. अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस नेते श्रावण इंगळे यांनी हिवरखेड येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत भारिप-बमसंविरुध्द जोरदार टीका केली. भारिप-बमसं जातीचे राजकारण करून अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी सभेत बोलताना केला. भाजपशी भारिप-बमसंची छुपी युती असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. इंगळे यांनी केलेल्या आरोपाचे संतप्त पडसाद भारिप-बमसंमध्ये उमटले. भारिप-बमसं नेते आमदार हरीदास भदे यांनी श्रावण इंगळे यांचे आरोप खोडून काडीत भारिप-बमसंची खरी लढत भाजपशीच असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्य़ाचे मतदार काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर ठेवतील, असा दावाही त्यांनी केला. मागील निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे माळी समाजाचे मतदान त्यांना मिळाले. यावेळी माळी समाजातील मतदार काँग्रेससोबत जाणार नाही. मुस्लिम मतदारही काँग्रेसकडे वळणार नाही. त्यामुळे अकोल्यात खरी लढत भारिप-बमसं आणि भाजपमध्येच होईल, असे भदे यांनी स्पष्ट केले. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि भारिप-बमसंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे वातावरण तापले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांनी काही दिवसांपासूर्वीच भारिप-बमसंशी सोडचिठ्ठी घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. परंतु मतभेदांची धार अद्यापही तीव्र असल्यामुळेच त्यांनी हिवरखेड येथे सभेत बोलताना भारिप-बमसंवर जोरदार टीका केली.

२०० काँग्रेस कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
चंद्रपूर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

बंगाली कॅम्प परिसरातील सुमारे दोनशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. कन्यका परमेश्वरी मंदिर सभागृहात सदर काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप-प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भाजपाचे बंगाली समाजाचे नेते तुषार सोम यांच्या नेतृत्वाखाली रमेन बार आणि रमेश सरकार यांच्या सोबत त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश घेतला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शहरात केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश घेतला असल्याचे व हंसराज अहीर यांच्या विजयासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचे रमेन बार आणि रमेश सरकार यांनी यावेळी म्हटले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार हंसराज अहीर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, तुषार सोम, प्रभाकर पटकोटवार, मदन शहा, नगरसेवक मनोरंजन रॉय, विश्वजीत शहा, संजय हलधर, कालीपद पाल, अमल देबनाथ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अकोला व मलकापुरात नरेंद्र मोदींच्या आज सभा
अकोला, मलकापूर ५ एप्रिल/प्रतिनिधी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची सोमवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी ते अकोल्यात येत आहेत. सोमवारी दुपारी ३ वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमीळीने वेग घेतला असून विविध पक्षाच्या प्रचारसभांनी राजकीय वातावरण तापले आहे. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांची सभा अकोल्यात पार पडली. सोमवारी नरेंद्र मोदींची सभा असल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी ६ एप्रिलला दुपारी २ वाजता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश भाजपचे सह संघटन सचिव डॉ. राजेंद्र फडके यांनी दिली. सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार नितीन गडकरी, विधिमंडळ गटनेते आमदार एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, प्रदेश सरचिटणीस आमदार चैनसुख संचेती, पंजाबराव देशमुख, गिरीश महाजन, अरुण पाटील, सुरेशदादा जैन, गुलाबराव पाटील, ज्ञानदेव मानकर, राजेश इंगळे, चंद्रकांत पाटील, अशोक कांडेलकर, उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. फडके यांनी दिली.

मराठी पंतप्रधानाच्या भूमिकेवरून ढोणेंचा आंबेडकरांना पाठिंबा
अकोला, ५ एप्रिल/प्रतिनिधी

मराठी पंतप्रधानाच्या भूमिकेवरुन अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जगन्नाथ ढोणे यांनी अ‍ॅड. आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी शनिवारी पातूरला पत्रकार परिषद घेऊन भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना समर्थन देत असल्याचे जाहीर केले. मराठी पंतप्रधानाला समर्थन देण्याच्या अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेमुळे त्यांना समर्थन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार पंतप्रधानपदी बसावे हे मराठी माणसाचे स्वप्न असून यासाठीच हा पवित्रा घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिस्तभंगाची कारवाई केली तरी, त्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ढोणेंच्या या पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉ. ढोणे निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकरांसाठी प्रचार करणार असल्यामुळे अकोला जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे वेगाने बदलणार असल्याचेही संकेत आहेत.
----------------------------------------------------------------------------

‘सवरेदय’ वसतिगृहाचे भूमिपूजन
चंद्रपूर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

सवरेदय शिक्षण मंडळाच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वसतिगृहाचे भूमिपूजन येथील प्रतिष्ठित नागरिक सांबशिव आईंचवार व लक्ष्मीबाई आईंचवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री व सवरेदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. यावेळी सवरेदय शिक्षण मंडळाचे सचिव बाबासाहेब निंबाळकर, उपाध्यक्ष मदन धनकर, उपाध्यक्ष रमेशपंत मामीडवार, सहसचिव प्रशांत पोटदुखे, सदस्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ. विजय आईंचवार व विभागप्रमुख डॉ. जयेश चक्रवर्ती उपस्थित होते.
सांबशिव आईंचवार यांनी १० लाख रुपयांची देणगी जाहीर केली असून त्यातील एक लाख रुपयांची रोख रक्कम शांताराम पोटदुखे यांना सुपूर्त करण्यात आली. येथील व्यवस्थापन महाविद्यालयाची नवी इमारत पडोली फाटय़ाजवळील परिसरात कोसारा रोड येथे असून याचे वास्तुशिल्पकार पराग आईंचवार हे आहेत. प्रास्ताविक डॉ. विजय आईंचवार, संचालन डॉ. जयेश चक्रवर्ती यांनी केले तर आभार उमाकांत धांडे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

तेली समाजाचा वापर केवळ मतदानासाठी -बबन देव्हडे
चिखली, ५ एप्रिल / वार्ताहर

राज्यात व प्रामुख्याने विदर्भात मोठय़ा संख्येत असलेल्या तेली समाजाला सत्तेत कोणताही वाटा न देता निव्वळ मतदानासाठी या समाजाचा वापर होत असल्याचा आरोप महाराष्ट्र तेली महासभेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष बबन देव्हडे यांनी केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी नेहमीच समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून समाजाच्या सांघिक शक्तीचा परिचय करून देण्याची योग्य वेळ आल्याचे देव्हडे यांनी पत्रकात म्हटले आहे. बहुजन समाज पक्षाने तेली समाजाचे उमेदवार दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत देव्हडे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी तेली समाजास गृहीत धरल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या या भूमिकेचा विचार करूनच मतदान करण्याचे आवाहन देव्हडे यांनी केले आहे.

ट्रक उलटला; वाहक जखमी
दारूसाठी गर्दी, वाहतूक ठप्प
अंजनगावसुर्जी, ५ एप्रिल / वार्ताहर

तालुक्यातील विहीरगावजवळ विदेशी दारू घेऊन नेणारा ट्रक उलटल्यामुळे रस्त्यावर दारू वाहू लागली. दारू गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळे राज्य मार्गावरील वाहतूक शनिवारी सायंकाळी काही काळ खोळंबली. अपघातात चालक आनंद पाटील सुखरूप असून वाहक वारस्कर किरकोळ जखमी झाला आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विदेशी दारूच्या विक्रीत मोठय़ाप्रमाणात वाढ झाल्यामुळे मालाची मागणी वाढली आहे. रेवसा येथील संजय सोजवानी या वितरकांचा हा माल अंजनगावसुर्जी येथे येत होता. दर्यापूर मार्गावर विहीरगावजवळ ट्रकचे (एम.एच.३१/ए.पी.१३८) टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक उलटला. दारूच्या बाटल्या फुटल्यामुळे रस्त्यावर दारू वाहू लागली. सांडणारी दारू लोक गोळा करू लागले. गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली. ही वार्ता रहिमापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या संरक्षणात अपघातग्रस्त ट्रकमधील माल दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यात आला.

दर्यापूर तालुक्यातील ८८ मतदान केंद्र संवेदनशील
दर्यापूर, ५ एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसाठी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील ८८ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. दर्यापूर पोलीस ठाण्यांतर्गत ८ केंद्र, खल्लार अंतर्गत १६ मतदान केंद्र, येवदा अंतर्गत ३४ केंद्र, अंजनगाव पोलीस ठाण्यांतर्गत २४ केंद्र, खोलापूरमधील ३ तर आसेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३ मतदान केंद्रांचा यात समावेश आहे. संवेदनशील म्हणून घोषित या मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये व मतदान शांततेने पार पडावे म्हणून पोलीस विभागाने बंदोबस्ताची पुरेशी आखणी केली असून संवेदनशील मतदान केंद्रावर अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण विधानसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवून मतदान शांततेने पार पडावे म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशीचा पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात येणार असून इतर मतदान केंद्रावरही भरारी पथक राहणार असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली.