Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

विविध

निवडणूक आयोगाकडून मुलायमना तंबी, चिदम्बरम, जसवंतसिंह यांना नोटीस
नवी दिल्ली, ५ एप्रिल/पी.टी.आय.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गृहमंत्री पी. चिदम्बरम व भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांना नोटीसा पाठविल्या असून उत्तरप्रदेशच्या जिल्हा न्यायदंडाधिकारींविषयी अनुदार उद्गार काढल्याबद्दल समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांना तंबी देण्यात आली असून तीव्र नापसंतीही व्यक्त करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये सुरक्षाविषयक बैठकीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या गृहमंत्री चिदम्बरम यांनी तेथे काही आमिषे दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर नोटीस बजावली असून त्यांना सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोटिसीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. बारमेर जिल्ह्यात निवडणूक सभा घेताना जसवंतसिंह यांनी पैसेवाटप केल्याबद्दल त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. मैनपुरी येथून मुलायमसिंह यादव निवडणूक लढवत असून तेथील जिल्हा न्यायदंडाधिकारी श्रीमती दिलीप यांनी काही नागरिकांचे शस्त्र परवाने रद्द केल्याप्रकरणी मुलायम यांनी त्यांच्यावर कडक टीका केली. या कार्यवाहीबद्दल निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करू असा इशारा देतानाच श्रीमती दिलीप यांना सामान्य माणूस व गुन्हेगार यातील फरकही कळत नसल्याची टीका केली. श्रीमती दिलीप यांनी आपल्या मेंदूची तपासणी करावी असा अनाहूत सल्लाही मुलायम यांनी सभेत दिला. त्याबद्दल मुलायम यांना आयोगाने तंबी दिली असून त्यांच्या या शेऱ्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

‘अल-काईदा, तालिबानचा पाकिस्तानवर शिकंजा..’
नवी दिल्ली, ५ एप्रिल/पीटीआय

अल-काईदा, तालिबानने पाकिस्तानमधील प्रत्येक नगर, शहर व्यापले असून, मध्य-पूर्व आशियात अस्थिरता निर्माण करून या भागातून युरोप व अमेरिकेविरुद्ध आघाडी उघडण्याची त्यांची योजना असल्याची खळबळजनक माहिती एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
वायव्य सरहद्द प्रांताचे पोलीसप्रमुख मलिक नाविद पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या स्थायी समितीसमोर बोलताना म्हणाले की, अल-काईदा, तालिबानची अमेरिका व युरोपमध्ये ९/११ सारखे हल्ले करण्याची योजना आहे.

प्रफुल्ल पटेल गर्भश्रीमंत उमेदवार
शिशुपाल पटले २२ लाख तर अपक्ष नाना पटोले ३३ लाखांचे धनी
भंडारा, ५ एप्रिल / वार्ताहर
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. या मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.

निवडणूक खर्चापेक्षा हिशेबाचीच उमेदवारांना धास्ती
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने ठरवून दिलेली खर्चाची मर्यादा अतिशय कमी असल्याने आणि प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक खर्च होत असल्याने त्याचा हिेशेब आयोगाकडे सादर करताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

यूपीए आघाडी शाबूत-प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली, ५ एप्रिल/पीटीआय
यूपीएचे विघटन झाल्याचा दावा खोडून काढत ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी सत्ताधारी आघाडी शाबूत असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर डाव्यांचा पाठिंबा घेण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही.

विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू
लखीमपूर (आसाम), ५ एप्रिल/वृत्तसंस्था
आसाममध्ये सबोती परिसरात विषारी दारू प्यायल्याने दोन महिलांसह १४ जणांचा मृत्यू ओढवला असून १३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. येथून ११ कि. मी. अंतरावरील सबोती परिसरात हा प्रकार घडला. सहा जणांना गुवाहाटी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दारू विक्रेत्याचा तसेच ती बनविणाऱ्याचा शोध चालू आहे.