Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

मतविभाजनावर विजय अवलंबून!
नितीन तोटेवार

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक या ‘हाय प्रोफाईल’ उमेदवाराच्या तुलनेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचे वर्णन नवखे व ‘लो प्रोफाईल’ उमेदवार, असेच करता येईल. या प्रतिस्पध्र्यामध्ये खरी लढत होणार असून सेनेसमोर गड राखण्याचे आव्हान उभे ठाकले असतानाच बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे.
उमेदवार कोण राहील, याचे संकेत काँग्रेसने आधीच दिले होते तर, शिवसेनेला अगदी शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करावा लागला. यामुळे पहिल्या फेरीतील प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली. एकूण २० उमेदवारांमध्ये मुकुल वासनिक, कृपाल तुमाने, सुलेखा कुंभारे यांच्याशिवाय समाजवादी पक्षाच्या माया चवरे आणि बसपचे प्रकाश टेंभुर्णे हे प्रमुख उमेदवार आहेत.

हत्तीच्या चालीवर कमळ आणि हाताचे भवितव्य
चंद्रशेखर बोबडे

सरळ लढतीत काँग्रेसला पराभूत करणे अशक्य असल्याने त्यांच्या पारंपरिक मतांची विभागणी करण्यासाठी काँग्रेस विरोधकांनी केलेली मोर्चेबांधणी यशस्वी ठरली तर यावेळी काँग्रेसला नागपूरची जागा राखणे जड जाणार आहे. मात्र, मतविभाजनाची खेळी ही दुधारी शस्त्रासारखी असून ती जर उलटली तर कमळ फुलण्याच्या मार्गातही अडसर येऊ शकतो. विद्यमान खासदार व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार, भाजपचे बनवारीलाल पुरोहित, भाजपचे बंडखोर आणि बहुजन समाज पार्टीचे माणिकराव वैद्य आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत गडकरींना पाठिंबा देणाऱ्या व ऐनवेळी लोकसभेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या प्रमुख माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह २७ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत मात्र काँग्रेस, भाजप आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारातच आहे.

चिरंजीवी चमत्कार घडवणार?
सुनील देशपांडे

आंध्र प्रदेश या दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यातील वातावरण दोन निवडणुकांमुळे सध्या ढवळून निघाले आहे. लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक या राज्यात होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांबरोबरच राज्याच्या विकासाचे मुद्दे, स्वतंत्र तेलंगणचा ‘नेहमीचा’ मुद्दा आणि चित्रपटातील ‘इंद्रा’ अर्थात तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी याच्या राजकारण प्रवेशाने निर्माण केलेला झंझावात यांनी राज्यातील निवडणुकीचा ‘माहौल’ तापला आहे. या राज्यात १६ आणि २३ एप्रिल असे दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. काँग्रेस, तेलुगू देसम, चिरंजीवीची ‘प्रजा राज्यम पार्टी’ आणि भाजप हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत.

महामार्गालगत पण निवडणुकीपासून कोसो दूर
जयप्रकाश पवार
इगतपुरी (चिंचलेखैरे), ६ एप्रिल

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली. रथी व महारथी निवडणुकीच्या रिंगणात उतरून प्रतिस्पध्र्यांविरुद्ध दंड थोपटू लागले. त्यासाठी जात, धर्म, पंथासह अन्य क्लृप्त्यांचाही वापर खुबीने होवू लागला. उमेदवार मतदारांची आर्जव करीत त्यांना विविधांगी आश्वासनांच्या माध्यमातून आपलेसे करण्याचा आटापीटा करू लागले. ज्यांनी पाच वर्षांपूर्वी भरभरून आश्वासनं दिली अन् कालौघात त्याचा विसर पडला असे काही महाभाग आता तोंड लपविण्याची कसरत करीत आहेत.

मनसेचे प्रचारगीत ‘नाय हो’!
सारी भिस्त राज ठाकरे यांच्या भाषणांवर !
मुंबई, ६ एप्रिल / खास प्रतिनिधी
शिवसेना - भाजपा युती राज्यात सत्तेवर येण्याआधीच्या १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या राजकीय विडंबनगीतांच्या ध्वनिफिती राज ठाकरे यांनी तयार करून घेतल्या होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांबरोबरच या ध्वनिफितींनीही गावागावांत शिवसेनेची हवा आणण्याचे मोठे काम केले होते.

सोनिया गांधी आणि पवारांची विदर्भात संयुक्त सभा
मुंबई, ६ एप्रिल / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या शुक्रवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोनियांची राज्यातील पहिली सभा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मतदारसंघात होत आहे.

दुबळ्या काँग्रेसला निरोप द्या- नरेंद्र मोदी
अकोला, ६ एप्रिल / प्रतिनिधी

देशातील सामान्य नागरिकाला संरक्षण देण्यास असमर्थ ठरलेल्या दुबळ्या काँग्रेसला निरोप द्या, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे जाहीर सभेत बोलताना केले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सोमवारी अकोल्यात आले होते. अकोला क्रि केट क्लब मैदानावर जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी, काँग्रेसवर कडाडून टीका केली.

मुंडेंची भाजपमध्ये मुस्कटदाबी, गडकरी झाले मालक - पाटील
पाथर्डी, ६ एप्रिल/वार्ताहर

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांना कोणी विचारत नाही. त्यांची मुस्कटदाबी केली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेलेल्या या पक्षाचे नितीन गडकरीच राज्यात मालक आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज येथे केली. त्याचबरोबर काहींनी बंडाची निशाणे फडकावली. अजूनही वेळ गेली नाही. मागे फिरा. नाक कापून अपशकुन कराल तर नकटे व्हाल, या शब्दांत पाटील यांनी राजळे व गडाख या बंडखोरांचा समाचार घेतला.

आता पोलिसांच्या निवडणूक बदल्यांनाही ‘मॅट’चा खो
४० अधिकाऱ्यांना मूळच्या पदांवर पाठविण्याचे आदेश
मुंबई, ६ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या आठवडय़ात बदल्या करण्यात आलेल्या सुमारे ४० पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) आज अंतरिम स्थगिती दिली असून या अधिकाऱ्यांना त्यांच्या बदल्यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी पुन्हा रुजू करून घ्यावे, असे आदेश दिला आहे.

‘शॉटगन’ला शेखर सुमनचे ‘चॅलेंज’
नवी दिल्ली, ६ एप्रिल/खास प्रतिनिधी

बिहारच्या पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात मोठय़ा पडद्यावरील बिहारी बाबू, ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांना आव्हान देण्यासाठी छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय अष्टपैलू अभिनेते व ‘लाफ्टर चॅलेंज’ शोचे कलावंत शेखर सुमन मैदानात उतरले आहेत. आज काँग्रेस मुख्यालयात शेखर सुमन यांच्या उपस्थितीत बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

जेठमलानींना अर्ज भरतानादेखील शिवसेनेची साथ नाही!
मुंबई, ६ एप्रिल/ खास प्रतिनिधी

एकीकडे उत्तर-मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त या आपले बंधू संजय यांच्या वक्तव्यामुळे त्रस्त असताना आज वाहतुकीच्या कोंडीत अडकल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाता आले नाही. त्याचवेळी येथील भाजप उमेदवार महेश जेठमलानी यांचा अर्ज भरताना आमंत्रण न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरताना अनुपस्थित राहून आपली नाराजी दाखवून दिली.

मोदींनी शिमगा राष्ट्रीय सण करावा -पवार
ठाणे, ६ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्रात प्रचारादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा गुजरात करण्याची भाषा करताना, सोनिया गांधी व आपल्याला शिव्या देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे, आम्हाला शिव्या घालून जर गुजरातची प्रतिष्ठा वाढत असेल, तर त्यानी शिमगा हाच गुजरातचा राष्ट्रीय सण करावा, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यानी दिला. ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी व आरपीआय आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.

सोनिया गांधी करोडपती पण मालकीचे घर व मोटार नाही
रायबरेली, ६ एप्रिल/ पीटीआय

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मालमत्ता सुमारे १.३८ कोटी रुपये इतकी असली तरी देशभरात त्यांच्या नावावर कुठेही घर वा मालकीची मोटारही नाही. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे त्यांनी मालमत्तेबाबत जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात ही माहिती दिली आहे. इटलीमध्ये मात्र सोनियांच्या मालकीचे वडिलोपार्जित घर आहे. त्याची बाजारपेठेनुसार अंदाजे किंमत १८.५ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे ७५ हजार रुपये रोकड, युको बँकेत २८.६१ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. शिवाय त्यांची म्युच्युअल फंडात २० लाख रुपयांची गुंतवणूक, रिझव्‍‌र्ह बँकेचे १२ लाख रुपयांचे बॉन्ड, मारुती टेक्निकल सव्‍‌र्हिसेस प्रा.लि. चे १० तर वेस्टर्न इंडिया टॅनरिज लिमिटेडचे ५०० शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये १.९९ लाख रुपये आणि व्यक्तिगत भविष्य निर्वाह निधीमध्ये २४.८८ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. त्याशिवाय ११. ०८ लाखांचे जडजवाहीर, १८.३७ लाख रुपये किमतीची ८८ किलो चांदी आहे. सुलतानपूर आणि डेरामंदी गावात २.१९ लाख रुपये किमतीची शेतजमीन आहे. रायबरेलीतून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या सोनिया गांधी यांनी २००८-०९ या वर्षांसाठी ५.५८ लाख रुपये आयकर तर ३२ हजार ५१२ रुपये संपत्ती कर भरलेला आहे. सोनिया गांधी यांनी बँकेचे कोणतेच कर्ज घेतलेले नाही किंवा त्या कोणाचेही देणे लागत नाहीत, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांचा मुलगा राहुल गांधी यांच्याकडे २.२५ कोटी रुपये किमतीची मालमत्ता असून, त्यांत दोन फार्महाऊस आणि दिल्लीतील एका दुकानाचा समावेश आहे.

पवार उद्या भुवनेश्वर दौऱ्यावर !
मुंबई, ६ एप्रिल / खास प्रतिनिधी
विमानातील तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून गेल्या शुक्रवारी भुवनेश्वरचा दौरा टाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या बुधवारी भुवनेश्वरला जाणार आहेत. या वेळी मात्र डावे नेते उपस्थित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेस डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्र व गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडी करणारे पवार हे भुवनेश्वरमध्ये डाव्या आघाडीच्या नेत्यांबरोबर व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसण्यास काँग्रेसने आक्षेप घेतला होता. पवारांनी भुवनेश्वरला जाण्याचे टाळावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी केले होते. काँग्रेसच्या दबावामुळेच पवारांनी भुवनेश्वरला जाण्याचे टाळल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आपल्याला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, असे सांगत पवारांनी काँग्रेसच्या दबावामुळे जाण्याचे टाळल्याच्या आरोपाचा इन्कार केला होता. ओरिसात राष्ट्रवादीने बिजू जनता दलाबरोबर आघाडी केली असून, तेथे राष्ट्रवादी लोकसभेची एक तर विधानसभेच्या सात जागा लढवीत आहे. भुवनेश्वर दौऱ्यात पवार हे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याबरोबर सभांमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र या दौऱ्याच्या वेळी डाव्या पक्षांचे नेते उपस्थित नसतील, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.

नक्षलवादीही निवडणुकीच्या रिंगणात !
मुंबई ६ एप्रिल / प्रतिनिधी
देशाच्या विविध भागांत कार्यरत असणाऱ्या नक्षलवादी पक्षांत निवडणुकीच्या राजकारणावरून मतभेद आहेत. सीपीआय ( माओवादी- पीपल्सवॉर) हा पक्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकत असतो तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्‍सवादी- लेनिनवादी) या पक्षाने मात्र निवडणुकीत भाग घेण्याचा निर्णय घेतला असून मुंबई -कल्याण लोकसभा मतदारसंघासह देशभरात ६० उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आज या पक्षाचे नेते अ‍ॅड. संजय सिंगवी यांनी ही घोषणा केली. प्रस्थापित पक्ष हे जनतेचे खरे प्रतिनिधी नाहीत तर अमेरिकी साम्राज्यवादाचे दलाल आहेत. त्यांच्या धोरणामुळेच देश सध्या अतिशय कठिण परिस्थितीतून जात असून देशातील कष्टकरी वर्गापुढे अमेरिकी साम्राज्यवादाचे संकट उभे आहे. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोकळे रान दिले जात असून याबाबतीत सर्व प्रस्थापित पक्षांचे धोरण सारखेच आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी निवडणुकांत भाग घेण्याचा निर्णय घेतला, असे सिंगवी यांनी सांगितले. उत्तर मध्य मतदारसंघातून देवचंद रणदिवे तर कल्याणमधून बबन कांबळे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. केरळमध्ये पक्षाचे सर्वात जास्त म्हणजे दहा उमेदवार आहेत तर आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतही उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

‘गांधीजींच्या इच्छेची चाड असेल तर आधी काँग्रेस विलीन करा’
अकोला, ६ एप्रिल / प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते म्हणतात, मोदी महाराष्ट्राचा गुजरात करायला निघालेत. मोदींचा गुजरात आम्हाला नको, महात्मा गांधींचा गुजरात हवाय. गांधींच्या स्वप्नातील केवळ गुजरातच नव्हे तर, संपूर्ण भारताचे चित्र फार वेगळे होते. महात्मा गांधींची इच्छा होती, स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेल्या काँग्रेसची स्वातंत्र्यानंतर गरज नाही. हा पक्ष विलीन करावा. परंतु तसे झाले नाही. त्यांच्या इच्छेला काँग्रेसने तिलांजली दिली. त्यांच्या इच्छेची एवढीच चाड असेल तर काँग्रेस विलीन करा, असा टोला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत मारला. सामान्य नागरिकाला संरक्षण देण्यास असमर्थ ठरलेल्या दुबळ्या काँग्रेसला निरोप द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मनमोहन सिंग सर्वात दुबळे पंतप्रधान ठरले आहेत, असेही ते म्हणाले.