Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

अर्ज छाननी
कोल्हापूर, ६ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाच्या छाननीअखेर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी १२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. या उमेदवारांना आपला अर्ज माघारीसाठी बुधवारी दुपापर्यंत मुदत असून सायंकाळी दोन्ही मतदारसंघातील निवडणूक रिंगणाचे चित्र स्पष्ट होईल.

सांगलीत वसंतदादा घराण्याची तिसरी पिढी वर्चस्व राखणार?
सांगली, ६ एप्रिल / गणेश जोशी

राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सांगली लोकसभा मतदारसंघावर एक दृष्टीक्षेप टाकल्यास काँग्रेसचा बालेकिल्ला ते वसंतदादा घराण्याची घराणेशाही हा इतिहासही मोठा रंजक आहे. अजून विरोधी पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी वसंतदादा घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणारे विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा या मतदारसंघावर उमटेल का? याचे उत्तर मतदारच देणार आहेत.

सोलापुरात २१ तर माढय़ात १८ अर्ज वैध
सोलापूर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात ६ तर माढा लोकसभा मतदारसंघात ३ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरविण्यात आल्यामुळे आता सोलापुरात २१ आणि माढय़ात १८ उमेदवारांचे अर्ज छाननीत मंजूर झाले आहेत. सोलापुरातील अ‍ॅड. शरद बनसोडे व माढय़ातील सुभाष देशमुख या दोघा भाजपच्या उमेदवारांविरुद्ध घेण्यात आलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्या.

रंकाळा घेऊ लागलाय मुक्त श्वास
कोल्हापूर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

जलपर्णीमुळे आणि कमालीच्या प्रदूषणामुळे मृतवत बनत चाललेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाला पुन्हा संजीवनी प्राप्त झाली आहे. या तलावाच्या पृष्ठभागावर व्यापून राहिलेली सुमारे नऊ हजार डंपर भरतील इतकी जलपर्णी गेल्या दोन महिन्यांत काढून टाकल्यामुळे या तलावाला पुन्हा वैभव प्राप्त झाले आहे. बुधवार, ८ एप्रिलपासून रंकाळा तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ केला जाणार असून, हा तलाव कायम स्वच्छ राहावा यासाठी महापालिका प्रशासनाने मुंबईच्या एन.व्ही.क्लिन असोसिएशन या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

बेवारस वाहने भंगार विक्रीप्रकरणावर न्यायालयात धाव
कोल्हापूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

पोलिस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहने परस्पर भंगारात विकून स्वत:चे खिसे भरणाऱ्या तसेच या प्रकरणाचा तपास करताना विलंब लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठविणाऱ्या इंटरनॅशनल ह्य़ुमन फौंडेशनच्या अध्यक्षा चारूलता चव्हाण यांनी आता न्यायालयातच धाव घेऊन दाद मागितली आहे.

प्रादेशिक पक्षही मोठय़ा ताकदीने पुढे आले- पवार
सांगली, शिराळा, ६ एप्रिल / प्रतिनिधी

दगडफेक करून अथवा वाहनांच्या काचा फोडून प्रश्न सुटत नाहीत. देश चालवायचा असेल, तर सर्व जाती-धर्माच्या जनतेला एकत्र घेऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागेल. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या गुजरातपेक्षा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात महाराष्ट्रीयन जनतेला प्रिय आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केली.

‘काय रे भाऊ, सीट निघेल ना!’
घर असो ऑफिस की मोटार, फुल्ल ‘एस्सी’शिवाय काम नाही, अशी दैनंदिनी असणारे महाशय आता लोकसभेच्या िरगणात उतरले आहेत. अव्वाच्या सव्वा लांबीचे मतदारसंघ, रणरणते ऊन, लांबच्या लांब चालणाऱ्या पदयात्रा, खायची सोय नाही की प्यायची, अशा अवस्थेने त्यांचे ‘येड पळाले’ आहे. उन्हाचा ताप एवढा की पब्लिक रस्त्यावरुन गायब, मग, रोड शो करायचा तो कुणासाठी? दरवाजे देखील उघडत नसल्याने सोसायटय़ांमध्ये जायचे कशासाठी? अशी भावना उमेदवारांमध्ये दिसू लागली आहे.

वडगावात सहा वाहनचालकांवर आचारसंहिता भंगाबद्दल गुन्हे
कोल्हापूर, ६ एप्रिल / विशेष प्रतिनिधी
वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या वाहनांवर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता पक्षाचे झेंडे लावल्याबद्दल ६ वाहनचालकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांची दिनांक ५ एप्रिल २००९ रोजी वडगाव येथे प्रचारसभा झाली. या प्रचारसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. या सभेसाठी लोकांना घेऊन आलेल्या ६ वाहनांवर राष्ट्रवादी पक्षाचे व जनसुराज्य पक्षाचे झेंडे लावलेले आढळले. सदर वाहनांवर झेंडे लावण्याबाबतचा परवाना लावलेला दिसून आलेला नसल्याची फिर्याद गुलाब बापू मुल्ला व त्यांचे सहकारी तसेच जलद कार्यवाही पथकाने वाहनचालकांना झेंडे लावलेला परवाना घेतला आहे काय, असे विचारता वाहनचालकांनी परवाना घेतल्याचे सांगितले. मात्र वाहनचालकांनी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाचे झेंडे लावून प्रचारसभेत सामील झाले होते. त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे भा.द.वि.स.१८८ कलमाप्रमाणे वडगाव पोलीस ठाण्यामार्फत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.

मिरजेत शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेला ठोकले टाळे
मिरज, ६ एप्रिल / वार्ताहर

केंद्र व राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतून मिळालेल्या अर्थसाहाय्यातून चालू कर्जाची रक्कम वसूल केली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेस टाळे ठोकले. या वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.कृषी कर्जमाफी व परतफेड सवलत योजनेतंर्गत निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग झाला आहे. या निधीतून शेतक ऱ्यांच्या ३० जून २००९ अखेर वसूलपात्र रकमा कर्जखाती जमा कराव्यात व उर्वरित रकमा संबंधित सभासद शेतक ऱ्यांच्या खात्यावर वर्ग कराव्यात, असा राज्य शासनाचा आदेश आहे. मात्र या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चालू वर्षांतील म्हणजे २००९-२०१० या आर्थिक वर्षांतील कर्ज खात्याच्या रकमा वसूल करण्यात येत आहेत. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ शासकीय आदेशाचे उल्लंघन असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संभाजी मेंढे, शहर अध्यक्ष महेश पाटील, मिरज ग्रुप सोसायटीचे संचालक बाळासाहेब कुरणे, कलगोंडा बसरगे, राजेंद्र कोरे व बाळकृष्ण तामगावे आदींसह ५० शेतकरी कार्यकर्ते मिरज पंचायत समितीनजीक बँकेच्या शाखेनजीक जमा झाले. शाखा व्यवस्थापकांना लेखी निवेदन देऊन मुख्य प्रवेशद्वारास त्यांनी टाळे ठोकले.

भाजपचे बनसोडे कोटय़धीश
सोलापूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांची संपत्ती दोन कोटी ३२ लाख ४२ हजार ३८५ रुपये इतकी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.चित्रपट अभिनेते असलेले अ‍ॅड. बनसोडे यांच्या नावावर एकही वाहन नसले, तरी पत्नी वर्षां यांच्या नावाने दोन लाख २१ हजार रुपये किमतीची तवेरा गाडी आणि हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावावर एक लाख ३५ हजार ५०० रुपयांची अ‍ॅक्सेंट मोटार आहे. अ‍ॅड. बनसोडे यांच्या मालमत्तेत सर्वात अधिक किमतीचा मुंबईच्या कांदिवली येथे एक कोटी १० लाखांचा फ्लॅट आहे. श्री. बनसोडे यांच्या स्वत:कडे मात्र कसलेही जडजवाहीर नसले, तरी त्यांच्या पत्नी वर्षां यांच्याकडे दोन लाख ८८ हजार, मुलगा तुषार याच्याकडे एक लाख ५० हजार व मुलगी सुप्रिया यांच्याकडे एक लाख ६६ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत.श्री. बनसोडे यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची संपत्ती श्री. बनसोडे यांच्यापेक्षा तिपटीहून अधिक म्हणजे ८.६० कोटी इतकी आहे.

जतमध्ये २२५ शालेय विद्यार्थ्यांना हृदयरोग असल्याचे उघड
जत, ६ एप्रिल / वार्ताहर

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत जत तालुक्यातील २२५ विद्यार्थ्यांना हृदयरोग असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्षांत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. दि. ३१ मार्चअखेर तालुक्यातील सर्व शाळांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी दोन स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करण्यात आली होती. जत तालुक्यात एकूण ६८ हजार ७७० इतकी विद्यार्थिसंख्या आहे. यापैकी ५८ हजार ८३६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात दोन हजार ४८ विद्यार्थ्यांत गंभीर दोष आढळून आले. किरकोळ दोष असणाऱ्यांची संख्या १५ हजार ९८७ इतकी आहे. या किरकोळ दोषी विद्यार्थ्यांवर आरोग्य विभागाने प्राथमिक उपचार सुरू केले आहेत. या तपासणीत २२५ हृदयरोग, तर ५२१ विद्यार्थ्यांना दृष्टिदोष असल्याचे आढळून आले आहे. मूकबधिर ३८, मतिमंद १४१, अध्ययन अक्षम ९६, वाचादोष १७४, बहुविकलांग २३, स्वयंमग्न रोगी एक, सेरेब्रल पाल्सी दोन व इतर आजार ७०५ असे दोष या विद्यार्थ्यांत आढळून आले आहेत.

‘साधुसंत परंपरेला बदनाम करण्याचे षड्यंत्र’
कोल्हापूर, ६ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीच्या रक्षणात बहुमोल योगदान दिलेल्या साधुसंतांच्या परंपरेला बदनाम करण्यासाठी देशात एक मोठे षड्यंत्र रचले जात आहे. या षड्यंत्राला वेळीच उद्ध्वस्त केले पाहिजे. अन्यथा भारतीय संस्कृतीचे ऱ्हासपर्व सुरू झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आसाराम बापू यांनी येथे केले. येथील कसबा बावडा रस्त्यावरील मेरी वेदर ग्राऊंडवर आसाराम बापू सेवा समितीच्या वतीने दोनदिवसीय सत्संगाला शनिवारी सायंकाळी प्रारंभ झाला. बापूंच्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात ‘भारतीय संस्कृती, साधू व आरोग्य’ या विषयावर साधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

‘आताचे सारे शोध ऋषीमुनींनी पूर्वीच लावले होते’
माळशिरस, ६ एप्रिल/वार्ताहर

आताचे सारे शोध यापूर्वीच ऋषीमुनींनी लावलेले असून काळाबरोबर लोप पावलेल्या त्याच शोधांचा आजचे शास्त्रज्ञ पूर्ण शोध (रीसर्च) करीत असल्याचे मत करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानरसिंह भारती यांनी व्यक्त केले. त्यासाठी वेदावर श्रद्धा व विश्वास असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.शंकराचार्यानी अकलूज परिसरातील सहकारमहर्षी साखर कारखाना, शिवामृत दूधसंघ, आनंदी गणेश आदी स्थळांना भेटी दिल्या.
त्या वेळी सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी पाद्यपूजा केल्यानंतर ते भाविकांना मार्गदर्शन करीत होते.

बद्रीकेदारसह उत्तर भारताची सोलापूर एसटीची सहल
सोलापूर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्टीनिमित्त येत्या ७ मे रोजी बद्रीकेदार, वैष्णवी देवीसह उत्तर भारताची एसटीची सहल काढण्यात येणार आहे.
या सहलीत परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, शेगाव, ओंकारेश्वर, उज्जन, खजुराओ, चित्रकूट, अलाहाबाद, काशी, अयोध्या, ऋषिकेश, त्रिवेणीघाट, केदारनाथ, गौरीकुंड, बद्रीनाथ, अमृतसर, वाघा बॉर्डर, कटरा, कुरूक्षेत्र, दिल्ली, वृंदावन, आग्रा, फत्तेपूर सिक्री, पुष्कर, अजमेर, जयपूर, जंतरमंतर, हवामहल, राजधानी ठिकाण, द्वारका, बेट द्वारका, सोरटी सोमनाथ, सुरत, नाशिक आणि परत याप्रमाणे विविध धर्मस्थळांचा व निसर्गस्थळांचा समावेश आहे. ही सहल २८ दिवसांची असून, यासाठी ११ हजार रुपये शुल्क राहणार आहे. सहलीसाठी प्रभाकर माशाळे (९८५०८८२१२०) किंवा ताराचंद राठोड (९९६०७३६७३२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ आगार व्यवस्थापक संजय नेर्लेकर यांनी केले आहे.

मंगळवेढय़ातील २२ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
सोलापूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यासाठी १९५६ मध्ये तयार केलेली नीरा कालव्याची योजना गेल्या ५३ वर्षांत न राबविल्याबद्दल २२ गावांतील गावक ऱ्यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ आणि खुपसंगी येथील साठवण तलावाचे काम हाती घेण्यात यावे. म्हैसाळ सहाव्या टप्प्याचे काम सुरू करावे. शिरनांदगी मध्यम प्रकल्पाचे काम त्वरित हाती घ्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी सेवानिवृत्त शिक्षक विष्णुपंत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली २२ गावांतील ग्रामस्थ एकत्र आले आहेत. या तालुक्यातील भाळवणी, निंबोणी, चिक्कलगी, मारोळी, जित्ती, खवे, शिरनांदगी, रेड्डे, पाटखळ, खुपसंगी, गोणेवाडी, शिरसी, जलीहाळ, जंगलगी, लवंगी, सलगर (खुर्द), सलगर (बु), हजापूर आदी बावीस गावांचा बहिष्कारात समावेश आहे.