Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

वेलिंग्टन, ६ एप्रिल/पीटीआय
भारतीय क्रिकेटची ‘दी वॉल’ मानले जाणाऱ्या राहुल द्रविडने आज कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक झेल टिपण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी मार्क वॉ याच्या १२८ कसोटीतील १८१ झेल टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या द्रविडने १३४ व्या कसोटीत आज झहीर खानच्या गोलंदाजीवर तिसऱ्या स्लीपमध्ये मॅक्इन्टोसचा झेल टिपून नव्या विक्रमाची नोंद केली. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच कसोटीत लॉर्डस्वर जवागल श्रीनाथच्या गोलंदाजीवर नासिर हुसेनचा झेल टिपून द्रविडने आपल्या झेलांचे खाते उघडले होते. द्रविडसह सध्या खेळत असलेले रिकी पॉन्टिंग (१३१ कसोटीत १४८ झेल), जॅक कॅलीस (१३१ कसोटीत १४७ झेल) आणि महेला जयवर्धने (१०२ कसोटीत १४२ झेल) यांच्यापेक्षा द्रवीड कितीतरी पुढे आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर येण्यापूर्वी कितीतरी दिवस द्रविडला या विक्रमाचे वेध लागले होते. त्यामुळेच आज तो झेल टिपला आणि कधीही फारशी प्रतिक्रिया व्यक्त न करणाऱ्या द्रविडला त्या लाल चेंडूचे चुंबन घेण्याचा मोह आवरला नाही. आता या विक्रमाला गवसणी घातल्याने या दौऱ्यात शतक न ठोकल्याची त्याची हुरहुर किंचित कमी झाली असेल. याविषयी बोलताना द्रविड म्हणतो या दौऱ्यात ज्या प्रकारे मी फलंदाजी केली त्यावरून प्रत्येक कसोटीत मी शतक ठोकायला हवे होते. धावा ठोकल्यानंतर जसा आनंद होतो तसाच आनंद मला या टिपलेल्या झेलांनी दिला, शिवाय टिपलेल्या या झेलांनी गोलंदाजांच्या यशात सहभागी होण्याचाही आनंद दिल्याचे द्रविडने यावेळी सांगितले. सर्वाधिक झेल टिपण्याच्या या विक्रमाने आपण फारच रोमांचित झालो असून एवढे झेल टिपण्यासाठी तेवढीच दर्जेदार गोलंदाजी असलेल्या संघात आपल्याला खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल तो स्वत:ला नशीबवानही समजतो.

शतकमहोत्सवी विजयाकडे..
वेलिंग्टन, ६ एप्रिल / पीटीआय

तब्बल ४१ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकाविजय साकारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून न्यूझीलंडची ४ बाद १६७ अशी अवस्था केल्यानंतर आता विजयासाठी भारताला आणखी सहा किवी फलंदाजांना टिपायचे आहे. भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत आधीच १-० अशी आघाडी घेतलेली असल्यामुळे जरी हा सामना अनिर्णीत राहिला तरीही भारतीय संघाचा मालिका विजय निश्चित असेल. मात्र या मालिकेतील भारताचा वरचष्मा पाहता कसोटी विजयासह मालिका २-० अशी जिंकण्याच्या दिशेने भारतीय संघाची कूच सुरू आहे.

आसाम पुन्हा हादरले
चार बॉम्बस्फोटात सात ठार

गुवाहाटी, ६ एप्रिल/पी.टी.आय.

आसाममध्ये आज झालेल्या चार बॉम्बस्फोटामध्ये सात ठार व साठहून अधिक जण जखमी झाले. आसाममधील करबीअँगलाँग येथे पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर गुवाहाटीतील मलिगाव भागात दुसरा व धेकीयाजौली येथे तिसरा बॉम्बस्फोट झाला. भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या आसाममधील धुब्री जिल्ह्यातील मनकचर येथे चौथा बॉम्बस्फोट झाला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आसाम भेटीच्या पाश्र्वभूमीवर हे दोन स्फोट घडविण्यात आले असून त्यामध्ये अत्यंत प्रगत अशा स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे.

बाळासाहेब भाजपला विसरले, मला नाही - राज ठाकरे
मुंबई, ६ एप्रिल / खास प्रतिनिधी

शिवाजी पार्क येथे रविवारी शिवसेना-भाजप प्रचारसभेच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दाखविण्यात आलेल्या दृकश्राव्य भाषणात बाळासाहेब हे भाजप आणि आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करण्यास विसरले असले तरी बाळासाहेबांना माझा मात्र विसर पडला नाही. मराठीच्या मुद्दय़ावरून त्यांनी माझी आठवण ठेवली, अशी मार्मिक प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली.

कसाबला उर्दूमध्ये आरोपपत्र देण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील संशयित अजमल अमीर कसाब याने आज विशेष न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांच्याकडे वकील अंजली वाघमारे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयानेही त्याची ही इच्छा मान्य करीत आर्थर रोड तुरूंग अधीक्षक स्वाती साठे यांना कसाब आणि वाघमारे यांच्या भेटीची वेळ निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, येत्या १५ एप्रिलपासून आर्थर रोड कारागृहात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सज्ज होत असलेल्या विशेष न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरूवात होणार असल्याचे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

उत्तर कोरियाच्या मदतीला धावले चीन आणि रशिया
संयुक्त राष्ट्रे, ६ एप्रिल/पीटीआय

उत्तर कोरियाने अग्निबाणाची चाचणी केल्याने जागतिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याच्या कारणावरून बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या बैठकीत उत्तर कोरियावर करावयाच्या कारवाईबाबत कुठलेही मतैक्य झाले नाही. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांचे दडपण असतानाही उत्तर कोरियावर कारवाईबाबत ठोस असे काहीच ठरवण्यात आले नाही. जपानच्या विनंतीनुसार तातडीने बैठक बोलवण्याची घोषणा कालच करण्यात आली होती. पंधरा सदस्यांच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियाने केलेल्या प्रक्षोभक कृतीवर चर्चा यापुढेही चालू ठेवण्याचे मान्य केले.

अबब.. अबू आझमींकडे केवढी ही मालमत्ता!
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

समाजवादी पार्टीचे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अबु आसीम आझमी यांनी आज निवडणूक अर्ज भरताना आपली १२४ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली. शरद पवार यांच्यासारख्या राज्यातील बडय़ा नेत्याने केवळ नऊ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. या पाश्र्वभूमीवर आझमी हे राज्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. आझमी यांच्याकडे केवळ एक लाखाची रोख रक्कम असली तरीही स्थावर मालमत्ता ९५ कोटींची आहे. आझमी यांच्याकडे होंडा अ‍ॅकॉर्ड, फियाट लाऊंज व मर्सिडीज बेन्झ या २७ लाखांच्या तीन मोटारी आहेत. तसेच १३ लाखांचे दागदागिने आहेत. तसेच आपल्या व पत्नीच्या नावावर साडेचार कोटींचे शेअर्स व डिबेंचर्स आहेत. तसेच पत्नी व स्वत:च्या नावावर बँकेत सुमारे ३५ लाख रुपये जमा आहेत. आझमी यांनी आज वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरताना कार्यालयाबाहेर मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिक बाजा वाजविणाऱ्या वादकांवर पैशाची उधळण केल्याने त्यांना एका नव्याच वादाला तोंड द्यावे लागणार आहे.

नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन पोलीस शहीद
चंद्रपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

गडचिरोली जिल्हय़ात धानोरा तालुक्यातील मुंगेर गावाजवळ आज सायंकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत तीन पोलीस शहीद झाले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडल्याने पोलीस दलाला जबर हादरा बसला आहे. धानोरा-पेंढरी मार्गावर आज सायंकाळी पोलीस दलातील सी-६० चे पथक मुन्नासिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गस्तीवर असताना दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी मुंगेर गावाजवळ या पोलीस पथकाला घेराव करून गोळीबार सुरू केला. रात्री आठ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांचा सामना करताना गोळीबाराला उत्तर देतांना पोलीस पथकातील तीन जवान शहीद झाले.

रमाबाई गोळीबार खटला; सुनावणी १३ एप्रिलपर्यंत तहकूब
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

घाटकोपर येथील रमाबाई नगर गोळीबारप्रकरणातील आरोपी मनोहर कदम याच्याविषयी शिवडी येथील विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. वाय. कुलकर्णी यांनी आजही अंतिम निकाल राखून ठेवत खटल्याची सुनावणी १३ एप्रिलपर्यंत तहकूब केली. दरम्यान, न्यायालयाने रमाबाई नगर दंगलप्रकरणी ११ जणांवर आज आरोप निश्चित केले. मनोहर कदम याच्याविषयी न्यायालय आज निर्णय देणार म्हणून रमाबाई नगर तसेच मुंबईतील काही ठिकाणी तसेच न्यायालयाच्या परिसरातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कदमविषयीचा निकाल ऐकण्यासाठी गृहराज्यमंत्री नितीन राऊतही न्यायालयात जातीने उपस्थित होते. मात्र न्या. कुलकर्णी यांनी कदमविषयीचा निकाल राखून ठेवत खटल्याची सुनावणी १३ एप्रिलपर्यंत स्थगित केली. आता न्यायालय कदमविषयीचा अंतिम निकाल या ११ जणांवरील खटला चालेपर्यंत राखून ठेवणार की त्यांच्यावरील खटला सुरू होण्यापूर्वीकदमविरुद्ध खटल्याचा देणार हे १३ एप्रिल रोजी स्पष्ट होईल.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशावर कार्यशाळा
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईमधील (एमएमआरडीए क्षेत्रात) सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसंबंधी जागृती करण्याच्या उद्देशाने येत्या ९ एप्रिल रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्मेट कॉलेज प्रिन्सिपल्स’ व हिंदुजा महाविद्यालय यांनी शिक्षण उपसंचालकांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विविध विद्यार्थी संघटना, एम.के.सी.एल.चे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी यावेळी विविधांगानी चर्चा करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा हिंदुजा महाविद्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी