Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

‘आता माघार नाही’
औरंगाबाद, ६ एप्रिल/खास प्रतिनिधी

लोकसभेची निवडणूक परिवर्तनाची ठरणार आहे. ही निवडणूक लढविण्याचा निर्णय जनार्दनस्वामी आणि भक्तांनी घेतला आहे. आता या निवडणुकीतून माघार घेणार नाही असे शांतिगिरी महाराज यांनी आज ‘लोकसत्ता’स सांगितले. वेरूळ येथील जनार्दनस्वामींच्या मठामध्ये आज भक्तांची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक रिंगणातून माघार घ्यायची नाही असा निर्णय घेण्यात आला. नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही यासंदर्भात येत्या बुधवारी निर्णय घेतला जाणार आहे.

कशी ही थट्टा.!
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, ६ एप्रिल

उस्मानाबाद मतदारसंघातून खासदारकीसाठी इच्छुक असणारे चौघे वकील आहेत, दोन डॉक्टर आहेत, तसेच एक जण दुसरी उत्तीर्ण आहे आणि दुसरा चौथी. एका उमेदवाराकडे रोकडही नाही आणि बँकेतही पैसे नाहीत. निवडणुकीच्या रिंगणात आजघडीला दोन डॉक्टर पाटील आहेत आणि दोन ‘पद्मसिंह’सुद्धा आहेत. सुशिक्षित बेरोजगार संघटना पक्षाच्या उमेदवाराचे अनुमोदन अंगठेबहाद्दरांनी केले आहे. असे भन्नाट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात टिकणार का?

ओवाळू आरत्या..
प्रदीप नणंदकर
लातूर, ६ एप्रिल

एरवी आपापल्या गटाच्या कोषात मश्गूल राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या, काँग्रेसच्या नेत्यांना सर्व गट-तट कामाला लावण्यासाठी ‘आरत्या ओवाळण्या’ची मोहीम हाती घ्यावी लागत आहे.
पक्षाची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी भा. ज. प.ने मध्यंतरी ‘घरघर चलो मोहीम’ राबविली. त्या मोहिमेत किती कार्यकर्ते किती घरापर्यंत पोहोचले, अशी लेखी माहिती प्रदेश व राष्ट्रीय कार्यालयाला पाठवून मोहिमेची सांगता झाली.

पाकिस्तानला उत्तर देण्याची ताकद युतीमध्येच - मोदी
नांदेड, ६ एप्रिल/वार्ताहर

दहशतवादाचे उघडपणे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानला ‘प्रेमपत्र’ लिहून भारतातला दहशतवाद संपणार नाही, त्यासाठी ‘जशास तसे’ उत्तर देण्याची गरज आहे आणि ती ताकद केवळ भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतच आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री व भा. ज. प.चे महाराष्ट्राचे प्रभारी नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. नांदेड मतदारसंघातील भा. ज. प.- शिवसेना युतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ गुरुगोविंदसिंग स्टेडियमवर श्री. मोदी यांची आज सभा झाली. भा. ज. प.चे नेते पांडुरंग फुंडकर, खासदार डी. बी. पाटील, शिवसेनेचे सुहास सामंत, जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, आमदार अनसूया खेडकर व सुभाष साबणे, सुरजितसिंह ठाकूर, भा. ज. प.चे शहराध्यक्ष प्रकाश कौडगे आदी या वेळी उपस्थित होते.

उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी
गणेश कस्तुरे

आंध्र प्रदेश-कर्नाटक सीमेवर असलेल्या नांदेड मतदारसंघातून ‘दिल्ली’ कोण गाठणार? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास अजून पंधरवडा बाकी आहे. तथापि एकूण परिस्थिती पाहता या निवडणुकीत उमेदवारापेक्षा नेत्यांची कसोटी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी निवडणुकीत चौरंगी लढत होईल, असे चित्र आहे. ज्या जिल्ह्य़ाच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे, त्यापैकी नांदेड एक होय. कै. शंकरराव चव्हाण यांचा जिल्हा.

शायराना अंदाज!
*काँग्रेसचे जालना शहराधअयक्ष विनय कोठारी माजी आमदार कैलास गोरंटय़ाल विरोधी गटाचे आहेत. उमेदवार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत कोठारी यांनी गोरटय़ांल यांना उद्देशून पुढील शेर ऐकविला.
दुष्मनी लाख सही
बात ना बंद किजिए,
दिल मिले ना मिले
हाथ मिलाते रहिये

शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले
मनसेचे सुभाष पाटील ठरले अपक्ष
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी

वेरुळ मठाचे शांतिगिरी महाराज मौनगिरी यांच्या उमेदवारीला अपक्ष उमेदवार कृष्णा बनकर यांनी घेतलेले आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज फेटाळून लावले. त्यांचा अर्ज वैध ठरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुभाष पाटील यांनी सादर केलेला ‘बी’ फॉर्म अवैध ठरला. त्यामुळे आता मतपत्रिकेवर ते म. न. से.चे नव्हे तर अपक्ष उमेदवार असतील.

औरंगाबादमध्ये ३१ अर्ज वैध
सात उमेदवारी अर्ज फेटाळले
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारी अर्जाची आज छाननी होऊन विविध कारणांमुळे ७ अर्ज फेटाळण्यात आले. आता ३१ उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. अर्ज फेटाळण्यात आलेले सर्व उमेदवार अपक्ष होते. एकूण ३८ उमेदवारांनी एकूण ५१ अर्ज दाखल केले होते.

लखलख चंदेरी
हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया हार्बरच्या पुढच्या चंद्रकोरीसारख्या आकाराच्या खाडीसमोर आम्ही उभे होतो. हाँगकाँग बंदराचा निमुळता भाग जिथे समुद्राला मिळतो त्या भागाच्या टोकाशी! तिथून तीन बाजूंना समुद्राचं पाणीच आहे. ही खाडी ओलांडली की परत बेटाचा भाग लागतो. जमीन कमी असल्यामुळे या छोटय़ा बेटावर इमारती अनेक मजली बांधण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही काही ठिकाणी टेकडय़ा, चढ-उतार आणि चक्क डोंगर आहेत. त्यामुळे घरबांधणीसाठी उपलब्ध जागा अजूनच कमी आहे.

नंदकिशोर मुंदडा भाजपच्या वाटेवर?
‘राष्ट्रवादी’ने घेतला धसका
अंबाजोगाई, ६ एप्रिल/वार्ताहर
सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री डॉ. विमल मुंदडा यांचे पती नंदकिशोर मुंदडा हे गेल्या दोन वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांना आता भा. ज. प.च्या नेत्यांनी त्यांच्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. श्री. मुंदडा यांनी भा. ज. प.मध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

स्थिर सरकार देण्याची क्षमता काँग्रेकडेच - खतगावकर
बिलोली, ६ एप्रिल/वार्ताहर

देशाचा सर्वागीण विकास व प्रगती व्हायची असेल तर स्थिर सरकारची नितांत गरज असते व असे स्थिर सरकार फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो; त्यामुळे ग्रामीण व शहरी पातळीवर विकास होण्यासाठी काँग्रेस पक्षाला विजयी करा व केंद्रात आपला प्रतिनिधी म्हणून मला मतदान करावे, असे आवाहन भास्करराव पाटील खतगावकर यांनी प्रचार सभांमधून केले. श्री. खतगावकर यांनी आपल्या प्रचारार्थ तालुक्यातील अर्जापूर, बडूर, सगरोळी, केसराळी, बिलोली आदी ठिकाणी सभा घेतल्या.

नकारात्मक मताचा पुरस्कार का नाही?
मतदाराला नकारात्मक मताचा अधिकार असावा यासाठी काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलविला. आयोग यासाठी तयार आहे; पण त्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. कायदा न झाल्यामुळेच नकारात्मक मताचा अधिकार मिळाला नाही. नकारात्मक मताचा अधिकार मिळाल्यास निवडून येण्याची खात्री नसल्यामुळेच हा कायदा संमत होऊ शकलेला नाही.

‘जाती-धर्माच्या नावावर दंगे पेटविणाऱ्यांचा धंदा बंद पाडा’
परभणी, ६ एप्रिल/वार्ताहर

‘‘जे लोक भावनेला हात घालून मतांचा बाजार भरवतात, त्यांना विकास करता येत नाही. जाती-पातीच्या नावावर समाजात विद्वेष निर्माण करून दंगे पेटविणाऱ्यांचा हा धंदा बंद पाडला पाहिजे. घडवायला अक्कल लागते पण मोडायला अक्कल लागत नाही,’’ अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

आम्हालाच कौल मिळेल
स्थिर सरकार, विकास, संरक्षण या तीन प्रमुख मुद्दय़ांवर काँग्रेसने मतदारांना आवाहन करण्याचे ठरविले असून मतदार काँग्रेसच्या बाजूने आपला कौल देतील
जेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार राहिले, तेव्हा पाच वर्षे स्थिर सरकार देता आले. या उलट विरोधी पक्षाच्या सरकारांनी एक अपवाद वगळता पाच वर्षे सलग राज्य करण्याचे कसब दाखविले नाही. विरोधी पक्षाच्या मंडळींना सरकार चालवताच येत नाही; त्यामुळे छोटे मुद्दे काढून आपापसात भांडण करून अस्थैर्य निर्माण करतात. गेल्या पाच वर्षांत मनमोहनसिंग सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

फसव्या घोषणांना जनता बळी पडणार नाही
विकास, संरक्षण आदी बाबतीत केंद्र सरकारने पुरता भ्रमनिरास केल्यामुळे देशातील जनता पुन्हा काँग्रेसच्या आघाडीला कदापि निवडून देणार नाही. जनता काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवून आपले हात पोळून घेतल्याचा अनुभव घेते आहे. स्वातंत्र्यानंतर जवळपास ५० वर्षे काँग्रेसने देशावर राज्य केले. पाणी, अन्न, निवारा, वस्त्र या मूलभूत सोयी देशवासीयांना न मिळण्याचे सारे पाप काँग्रेस सरकारचे आहे.

केंद्र सरकारने प्रश्नांचे डोंगर उभे केले
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या केंद्रातील सरकारने गेल्या पाच वर्षांत प्रश्नांची सोडवणूक न करता प्रश्नांचा डोंगर रचला. त्यामुळे जनता मतपेटीतून आपला राग व्यक्त करील व केंद्र सरकारला धडा शिकवील. गेल्या पाच वर्षांत आतंकवाद वाढला, कायदा व सुव्यवस्था ढासळली, महागाई शिगेला पोहोचली, आर्थिक मंदीची लाट आली, विजेची टंचाई वाढली, अन्नधान्याचा तुटवडा झाला, सर्व पातळीवर केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झाले. स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी स्वत:कडे हौसेने कृषी खाते घेतले.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना हवे ते प्रश्न विचारा. फक्त प्रश्न व्यक्तिगत, आरोप करणारे नसावेत, एवढे नक्की. प्रश्न कोणाला विचारायचा आहे, याचा उल्लेख करून नेमक्या शब्दांत प्रश्न विचारा. आपले प्रश्न ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात पाठवा. प्रश्नकर्त्यांचे संपूर्ण नाव व पत्ता अवश्य द्यावा. ’‘lokmtv@gmail.com या पत्त्यावरही प्रश्नांचे ‘इ-मेल’ पाठवता येईल.

गंगाखेडमध्ये युतीकडून आमदार गायकवाड बेदखल?
गंगाखेड, ६ एप्रिल/वार्ताहर

परभणीचे शिवसेनेचे उमेदवार गणेश दुधगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित ग्रामीण व शहरी भागातील प्रचारकार्यातून आमदार विठ्ठल गायकवाड यांना बेदखल करण्यात आल्याचे दिसून येते. श्री. दुधगावकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या घटनेपासून आजतागायत सार्वजनिक सभा व बैठका तसेच प्रचारकार्यादरम्यान श्री. गायकवाड यांना निमंत्रितच केले नसल्याचे समजते. गायकवाड व दुधगावकर यांच्यात अद्यापि संवादच झालेला नाही. पालम व गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती व धारासूर जिल्हा परिषध गट निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून श्री. गायकवाड यांना दूर ठेवण्यात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना दूर ठेवण्यात येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात दोन निवडणूक निरीक्षक
उस्मानाबाद, ६ एप्रिल/वार्ताहर

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार होऊ नयेत, प्रशासनावरही करडी नजर असावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने रमेशचंद्र मीना व अनिलकुमार गुप्त या दोघांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. श्री. मीना यांच्याकडे तुळजापूर, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडेच परंडा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर श्री. गुप्ता यांच्याकडे औसा व उमरगा मतदारसंघांची जबाबदारी आहे. मतदान यंत्रांच्या उपलब्धतेचा आराखडाही तयार करण्याचे काम सुरू आहे. मतदान ओळखपत्र प्रशिक्षण, संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्राच्या ठिकाणची व्यवस्था या बाबींचा आढावा घेतल्यानंतर काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी अथवा मतदारांना अडीअडचणी असल्यास उस्मानाबादमधील शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे सकाळी ८.३० ते १० या वेळेत संपर्क साधावा. श्री. मीना व श्री. गुप्ता यांच्या संपर्कासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक असे - ९४२२६१३८५२, ९४२२६१३८४६ असे आहेत.

‘दहशतवादावर बोलण्याचा मोदींना काय अधिकार?’
नांदेड, ६ एप्रिल/वार्ताहर

गुजरातमध्ये घडलेले गोध्रा हत्याकांड, भारतीय जनता पक्षाने जातीयवादी शक्तींना दिलेली साथ या पाश्र्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नाही, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी आज व्यक्त केले.श्री. मोदी यांनी सभेत केलेल्या आरोपांना श्री. दलवाई व माजी आमदार शरद रणपिसे यांनी पत्रकार बैठक घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले की, मोदी यांच्या काळात गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले. अनेक निष्पाप अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या. असे असताना मोदी यांनी देशातल्या दहशतवादावर बोलणे कितपत योग्य आहे? गुजरातचा विकास हे मोदींचे यश नाही. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत निष्पाप माणसांची झालेली हत्या हा प्रक्षोभ होता. याच्यात पूर्वनियोजित काहीही नव्हते, यात काँग्रेसचे नेते दोषी नाहीत. काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, असे म्हणणाऱ्यांनी शिवसेनेत घराणेशाहीमुळे फूट पडली याबाबत अधिक भाष्य करावे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान योजना, पंतप्रधान सडक योजना या डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात झालेल्या विकासाच्या घटना असताना त्याबाबत मोदी काही बोलत नाहीत, असे सांगून श्री. दलवाई म्हणाले की, नांदेडमधून भास्करराव पाटील-खतगावकर यांचा विजय निश्चित आहे. भा. ज. प.च्या उमेदवाराला सामाजिक बांधिलकी नाही.

उस्मानाबादेत तीन अर्ज बाद
उस्मानाबाद, ६ एप्रिल/वार्ताहर
उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारी अर्जाच्या छाननीत छाननीत आज दोन पक्षांचे दोन पर्यायी उमेदवार व अन्य एकाचा अर्ज फेटाळण्यात आला. राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) व ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना) यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. मतदारयादीत नाव नसल्याने प्रशांत सोन्याबापू गलांडे यांचा अर्ज अवैध ठरला.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अर्जासोबत जोडलेल्या माहितीपत्रावर तोंडी आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यास समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे ते आक्षेप फेटाळण्यात आले. लेखी स्वरूपात एक आक्षेप दाखल करण्यात आला, मात्र तोही फेटाळला गेला. प्रशांत गलांडे यांनी बारामती मतदारसंघात नाव असल्याचे नमूद केले होते. तसा पुरावा त्यांना सादर करता आला नाही. त्यामुळे तोही अर्ज अवैध ठरविण्यात आला. आता प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे तीन, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे आठ आणि अपक्ष २४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. छाननीनंतर ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

सहा अर्ज अवैध
लातूर, ६ एप्रिल/वार्ताहर
लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील सहा अपक्ष उमेदवारांचे अर्ज आज छाननीत अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले आज दिली. एकूण ३७ उमेदवारांनी ६८ अर्ज दाखल केले होते. छाननीत ३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा खून
परळी वैजनाथ, ६ एप्रिल/वार्ताहर

पतीला दारू दिल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या पत्नीलाच चाकूने वार करून ठार केल्याची घटना तालुक्यातील लिंबोटा तांडा येथे आज घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ६ एप्रिलला सकाळी ९.३० च्या सुमारास लिंबोटा तांडा (ता. परळी वैजनाथ) येथील सुमन मोहन राठोड (वय ३०) ही महिला ‘माझ्या नवऱ्याला दारू का देता?’ असा जाब विचारण्यासाठी गेली असता उत्तम गोविंद चव्हाण व त्याची पत्नी पारू चव्हाण (दोघे रा. लिंबोटा तांडा) यांनी तिला शिविगाळ करून मारहाण केली व चाकूने छातीत भोसकले. तिला दवाखान्यात नेताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहन भीमराव राठोड (वय ३५) याने दिलेल्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात उत्तम चव्हाण, पारू चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पवार करीत आहेत.

भगवान महाराजांना गाडगेबाबा पुरस्कार
जालना, ६ एप्रिल/वार्ताहर
महाराष्ट्र प्रांत सामाजिक समरसता मंचच्या वतीने देण्यात येणारा संत गाडगेबाबा समरसता पुरस्कार येथील ह. भ. प. भगवान महाराज आनंदगडकर यांना जाहीर झाला आहे. १० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १२ एप्रिलला सायं. ६ वा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते जालना येथील मस्तगड भागातील शीतल लॉन्स येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी समरसता मंचचे कार्याध्यक्ष भिकूजी इगाते राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते आयुपाल उपस्थित राहतील.

उद्धव ठाकरे यांची आज परभणीत सभा
परभणी, ६ एप्रिल/वार्ताहर
लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गणेशराव दुधगावकर यांच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील स्टेडियम मैदानावर सायं. ६ वा. ही जाहीर सभा होणार असून या सभेला मोठय़ा प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्याचे संयोजकांचे प्रयत्न आहेत. शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर, पक्षनिरीक्षक अतुल कुलकर्णी, प्रचारप्रमुख अ‍ॅड्. प्रताप बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, राजू कापसे-पाटील, आमदार संजय जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी या सभेसाठी प्रयत्नशील आहेत.

‘पाणीटंचाई भासू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे’
बिलोली, ६ एप्रिल/वार्ताहर
शहरातील कोणत्याही प्रभागात पाणीटंचाई भासणार नाही यासाठी कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, अशा सूचना नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. गेल्या १५-२० दिवसांपासून शहर व तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली असून शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना आदेश दिले.

मारहाणीच्या गुन्ह्य़ात दोघांना शिक्षा
सोनपेठ, ६ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील धामोणी येथील उत्तम बाबाराव मुळे यांना मारहाण करून डोळे फोडल्याबद्दल सोनपेठ न्यायालयाने दोघांना एक वर्ष सश्रम कारावाससह प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा दिली. पांडुरंग व पंडित चव्हाण यांनी उत्तम मुळे यांना ७ सप्टेंबर २००८ रोजी धुऱ्यावरील गवत काढले म्हणून मारहाण केली. मुळे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या खटल्यात सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील एक साक्षीदार व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश आर. व्ही. पांडे यांनी आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची आणि ५०० रुपये दंड केला. सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता डी. एस. नाटकर यांनी काम पाहिले.

विवाहितेची आत्महत्या
बीड, ६ एप्रिल/वार्ताहर
सासरी सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करणे भाग पाडल्याच्या आरोपावरून पोलीस शिपाई असलेल्या तिच्या पतीसह इतर सात जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुशीला शंकर कळसाने असे तिचे नाव आहे. शंकरच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्याला पोलीस दलात नोकरी मिळाली. लग्नातील हुंडय़ातील राहिलेले एक लाख रुपये आणीत नाही म्हणून पती शंकर, सासू सीता, दीर रवी याच्यासह चार नणंदा या सुशीलाचा सतत छळ करीत होत्या. या छळास कंटाळून तिने डोकेवाडी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार बन्शी बहीरवाळ यांनी दिली.

महिलेचा निर्घृण खून
नांदेड, ६ एप्रिल/वार्ताहर
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात एका अनोळखी महिलेचा निर्घृण खून झाल्याचे आज उघडकीस आले. पोलिसांनी सांगितले की, महाविद्यालयासमोर असलेल्या मैदानाच्या एका बाजूला महिलेचा मृतदेह आज सकाळी दिसला. सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या काहींना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलिसांना ही माहिती दिली. सुमारे ३३ वय असलेल्या या महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलेची ओळख अद्यापि पटली नसून त्यामुळे आरोपींचा शोध लागला नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकन्यायालयात ६२ प्रकरणे निकाली
जालना, ६ एप्रिल/वार्ताहर

जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या लोकन्यायालयात मोटार वाहनविषयक ६२ प्रकरणे निकाली निघाली आहेत. सात प्रकरणांत तडजोडीने १९ लाख ४५ हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले, तर १३८, धनादेश न वटणे इत्यादी ५५ प्रकरणांत तडजोडीने ३३ लाख ३७ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी या लोकन्यायालयाच्या अध्यक्षस्थानी होते. त्याचप्रमाणे जालना येथील शासकीय निरीक्षण गृह येथे बालगुन्हेप्रकरणी लोकन्यायालय घेण्यात आले. या वेळी बालगुन्हे न्यायालयाचे अध्यक्ष तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. एम. आय. जी. डी. शेख, सदस्य सचिव न्या. एन. जी. गिमेकर, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. उत्तम तेलगावकर आदींची उपस्थिती होती.

गृहनिर्माण संस्थेचा गाळा परस्पर विकला
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी
सिडकोतील अमरकी सहकारी संस्थेने दिलीप दामोदर शेळके यांना दिलेले व्यावसायिक वापराचे दुकान तिघांनी संगनमताने तिसऱ्यालाच विकले. या प्रकरणी शेख लकीब आणि शेख कय्यूम अब्दुल हमीद या पिता-पुत्रांसह विश्वनाथ किसनराव यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. शेळके हे अमरकी संस्थेचे सदस्य आहेत. ऑगस्ट २००७ मध्ये अमरकी संस्थेने येथील चार क्रमांकाचे दुकान शेळके यांच्या नावावर केले होते. मात्र लकीब आणि कय्यूम यांनी विश्वनाथ यांच्याशी संगनमत करून दुकानाची नोंद शेख लकीब यांच्या नावे केली. यासाठी विश्वनाथ याने बनावट कागदपत्रे सादर केली होती. ताबा घेण्यासाठी शेळके गेले असता हे दुकान लकीब यांच्या मालकीचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. म्हणून त्यांनी नोंदणी कार्यालयात चौकशी केली असता त्या दुकानाची परस्पर नोंद करण्यात आल्याचे समजले. शेळके यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शेळके यांच्याबरोबरच बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली म्हणून तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी
मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथे घडली. भगवान धोंडुबा काळे (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. दुपारी तो मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेला होता. तोल जाऊन तो खाली पडला. विहिर खोल असल्यामुळे त्याला काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. एक वाजण्याच्या सुमारास त्याला बाहेर काढले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

‘रिलायन्स’च्या अधिकाऱ्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी
२००६ पासून ५ एप्रिल २००९ या तीन वर्षांच्या काळात निरालाबाजार येथील रिलायन्स वेबमध्ये वित्त अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या मोहीत माधवराव देशमुख याने कंपनीला १३ लाख रुपयांना गंडा घातला, अशी तक्रार कंपनीचे मंदार गजानन जोशी यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. देशमुख हा येथील कार्यालयात वित्त अधिकारी म्हणून सेवेत होता. या काळात त्याने १८८ मोबाईल सेट आणि रिचार्ज कुपन मिळून १३ लाख ३५ हजार ८४३ रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले आहे. मार्च अखेरीस केलेल्या परीक्षणात हा प्रकार समोर आला.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘बेवफाई’ची सोनपेठमध्ये चर्चा
सोनपेठ, ६ एप्रिल/वार्ताहर
निवडणुकीची म्हणावी तशी रंगत अद्यापि चढलेली नाही. तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी कट्टर विरोधकांच्या भूमिकेमध्ये असल्याने अनेकांच्या राजकारणाला पूर्णविरामही मिळालेला आहे. यामुळे एखादा लाभ मिळविण्यासाठी एकत्र येण्याचा अपवाद वगळता या मैत्रीची घडी बसलेली नाही. त्यातच काँग्रेस शिलेदारांच्या ‘गॉडफादर’चा संदेश न मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यामध्ये हातचे राखून काम करीत आहेत. याबद्दल राष्ट्रवादीचे नेते खासगीत नाराजीही व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांपासून सोनपेठ शहरामध्ये राष्ट्रवादीचा भोंगा लावून प्रचार करणाऱ्या रिक्षाचालकाने प्रचारादरम्यान केवळ ‘बेवफाई’च्या गाण्याचीच निवड केली. या ‘बेवफाईचा शिकवा’ करणाऱ्या गाण्यामुळे हा राष्ट्रवादीचा संदेश आहे की रिक्षाचालकाची समयसूचकता यावर शहरात चर्चा सुरू होती.

मुंडे यांच्या विजयासाठी वैद्यनाथाला साकडे
परळी वैजनाथ, ६ एप्रिल/वार्ताहर
बीड मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे उमेदवार आमदार गोपीनाथ मुंडे हे राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी व्हावेत म्हणून तालुक्यातील इंजेगाव येथील युवकांनी प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करून साकडे घातले. इंजेगाव येथील भाजयुमोचे कार्यकर्ते वैजनाथ कराड, श्रीहरी कराड, नागोराव कराड, विलास कराड, संजय कराड आदींनी इंजेगाव ते परळी मोटारसायकल फेरी काढून मंदिरात अभिषेक केला. श्री मुंडे हे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी व्हावेत, असे साकडे घातले.

आर. आर. पाटील उद्या उमरग्यात
उस्मानाबाद, ६ एप्रिल/वार्ताहर
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांची शहरात बुधवारी (दि. ८) जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर यांनी केले आहे.

कृषिविषयक धोरण जाहीर केले नसल्याने शेतकरी अडचणीत - कोरे
बिलोली, ६ एप्रिल/वार्ताहर

देशातील ६४ टक्क्य़ांच्या आसपास जनता शेतीवर अवलंबून असतानाही काँग्रेसने अद्यापि कृषिविषयक धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असल्याचे मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष व फलोत्पादनमंत्री विनय कोरे यांनी व्यक्त केले. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार प्रीती शिंदे यांच्या प्रचारासाठी कुंडलवाडी येथे सभा झाली. त्यात बोलताना श्री. कोरे म्हणाले की, शेतीमालाला रास्त भाव व शेती व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल, तर कृषी धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. ज्या पक्षाचा मराठी माणूस पंतप्रधानपदी बसेल त्यांना आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार भास्करराव पाटील-खतगावकर व भारतीय जनता पक्षाचे संभाजी पवार गोदावरीत भागीदार आहेत. त्यामुळे हे दोघेही एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न असल्याने त्यांना सत्तेशिवाय काहीच दिसत नाही, अशी टीकाही श्री. कोरे यांनी केली.

निवडणूकज्वरामुळे मजुरांना दिलासा
तुळजापूर, ६ एप्रिल/वार्ताहर
लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा वाढता ज्वर व स्पर्धा यामुळे खेडय़ापाडय़ातील बरोजगार मजुरांना दिलासा देणारी ठरल्याचे चित्र दिसत आहे. खेडोपाडी होणारा प्रचार व ठिकठिकाणी होणाऱ्या जाहीर सभांच्या ठिकाणी विराट जनसमुदाय हजर असल्याचे दर्शवून आपणास अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी खेडय़ापाडय़ातील मजूरांशी इच्छित सभेच्या ठिकाणी लोकांना पोहोचविण्यासाठी करार केले जात असल्याचे समजते. खाणे-पिणे व परतीच्या सोयीबरोबर ५० ते ६० रुपये देण्याची व्यवस्था असली तरी प्रत्येक उमेदवार अशा मंडळींपासून अलिप्त राहण्याची दक्षता घेत असल्याचे दिसून येते. प्रचारकामी सुपारी घेणाऱ्या एका लमाण बांधवाने नाव न सांगणयाच्या अटीवर ही माहिती दिली.

चढत्या पाऱ्यामुळे थंड पेयांना मागणी
परळी वैजनाथ, ६ एप्रिल/वार्ताहर
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वैशाखाचा वणवा चैत्रातच जाणवू लागला आहे. उष्मा वाढत चालला तशी थंड पेयांना मागणी वाढली आहे. आता बाजारात आणि घरोघरी पारंपरिक पेयांपेक्षा आधुनिक कृत्रिम शीतपेयांची चलती असल्याचे दिसत आहे.वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी वृद्ध मंडळी अद्यापि छत्र्यांचा वापर करताना दिसतात. तरुण मंडळी मात्र वेगवेगळ्या फॅशनच्या वस्तू वापरत आहेत. टोपी, गमचा, गॉगल आदींची विक्री प्रचंड वाढली आहे. महिलाही स्कार्फ वापरताना दिसतात. तापमान वाढले तसे रसवंतीगृह कोल्डड्रींक हाऊस, आईस्क्रीम कॉर्नर अशा ठिकाणी गर्दी वाढत आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठेतही भयाण शांतता दिसत असून सायंकाळशिवाय नागरिक रस्त्यावर येत नाहीत.

मुंडे आज व उद्या बीडच्या दौऱ्यावर
बीड, ६ एप्रिल/वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व बीडमधील उमेदवार गोपीनाथ मुंडे उद्या (मंगळवारी) व बुधवारी (दि. ८) जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांमध्ये त्यांच्या सहा जाहीर सभा होणार आहेत. या दौऱ्यात ते दोन लाख मतदारांशी ते संवाद साधतील. दोन दिवसांच्या या दौऱ्यात जिल्ह्य़ात एकूण श्री. मुंडे सहा सभा घेणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता साक्षाळपिंप्री, ११ वाजता पिंपळनेर, सायंकाळी ५ वाजता धारूर व सायंकाळी ६ वाजता माजलगाव येथे त्यांच्या सभा होतील. बुधवारी परळी येथे त्यांची सभा होईल.

भाजपचा वर्धापनदिन साजरा
सिल्लोड, ६ एप्रिल/वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचा एकोणतिसावा वर्धापनदिन शहरात आज ‘कमळ संदेश यात्रा’ काढून साजरा करण्यात तिचे नेतृत्व आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी केले. शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल फेरी काढण्यात आली. मुख्य रस्ता, मुख्य बाजारपेठ, शास्त्री कॉलनी, टिळकनगर, श्रीकृष्णनगर या मार्गे पक्षाच्या प्रचार कार्यालयासमोर फेरीचा समारोप झाला. पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश बनकर, शहराध्यक्ष मनोज मोरेल्लू, सुनील मिरकर, नगरसेवक विष्णू काटकर, रघुनाथ घरमोडे, राजेंद्र शिरसाठ, तालुका सरचिटणीस संजय डमाळे यात सहभागी झाले.

भूकंपग्रस्त कृतिसमितीची बैठक
औसा, ६ एप्रिल/वार्ताहर
लातूर-उस्मानाबाद जिल्ह्य़ातील यादीत सुधारणा करण्यासाठी भूकंपग्रस्त कृतिसमिती भूकंपग्रस्तांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. नोकरी लागलेल्या व नसलेल्या तरुणांची माहिती एकत्रित करणार आहे. यातून भूकंपग्रस्त यादीत सुधारणा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. किल्लारी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी उपसरपंच काकासाहेब मनाळे होते. भूकंपग्रस्त भागातील प्रमाणपत्रधारक प्रत्येक कुटुंबापर्यंत भूकंपग्रस्त कृतिसमिती पोहोचणार आहे आणि लातूर-उस्मानाबाद जिल्ह्य़ातील माहिती २० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीस अजित जाधव, बालाजी घोडके, सूर्यकांत बाबळसुरे आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांची बदली
बिलोली, ६ एप्रिल/वार्ताहर
पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली आहे. त्यांचा कार्यभार पोलीस उपनिरीक्षक बालक कोळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. श्री. कुलकर्णी यांनी आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत म. गांधी तंटामुक्त गाव योजनेचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे केले होते. शिवाय स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून समाजात एकोपा वाढविण्याचे कामही त्यांनी केले.

महावीर जयंती महोत्सवाचे आयोजन
लातूर, ६ एप्रिल/वार्ताहर
जैन मंडळातर्फे उद्या (मंगळवारी) दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ६.३० वाजता लाडगल्ली येथून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंडित धुमाळ राहणार आहेत. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ‘भगवान महावीर यांचे तत्त्वज्ञान’ या विषयावर डॉ. पारस बोरा यांचे व्याख्यान होणार आहे. अनिल कोचेटा यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या जलकुंभाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय येथे लोकार्पण होणार आहे.

माठाच्या विक्रीत मोठी वाढ
निलंगा, ६ एप्रिल/वार्ताहर
उन्हाच्या तीव्रतेत गेल्या आठ दिवसांपासून वाढ झाल्याने माठाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील माठ विक्रीसाठी आले आहेत. मात्र खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने माठांना मागणी वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमतीचे माठ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. एका माठासाठी ग्राहकांना ४० ते ८० रुपये मोजावे लागत आहे.

फर्दापूर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू
सोयगाव, ६ एप्रिल/वार्ताहर
पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या फर्दापूरसाठी प्रशासनाने अखेर टँकर सुरू केले आहेत. फर्दापूर येथे तीव्र पाणीटंचाई असून रात्रभर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तांत’मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने टँकर प्रस्तावासाठी वरिष्ठांकडे मागणी केली. फर्दापूर व महालब्धा या ठिकाणी प्रत्येकी एक टँकर सुरू असून दोन शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. या विहिरीतील पाणी टँकरद्वारे आणून गावातील सार्वजनिक विहिरीत टाकण्यात येत आहे, असे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी
सांगितले.

क्रिकेट पंच अरुण अंबेकर यांचा गौरव
लातूर, ६ एप्रिल/वार्ताहर
इंडियन डेंटल संघटना व निमा संघटना यांच्या तर्फे क्रिकेट पंच अरुण अंबेकर यांचा गौरव करण्यात आला. दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात २०-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रिकेट स्पर्धेत नांदेडचे क्रिकेट पंच अरुण अंबेकर यांनी उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी बजावली. त्याबद्दल त्यांचा डॉ. संजय दुधनी, डॉ. ज्ञानेश्वर चिंते, डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ. रेड्डी यांनी सत्कार केला.

केंद्रीय निरीक्षकांकडून निवडणुकीचा आढावा
जालना, ६ एप्रिल/वार्ताहर

जालना लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी नुकताच निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. या मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भरतलाल मीना, विभुप्रशाद मिश्रा आणि श्रावणलाल मीना या तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांनी निवडणूक पूर्वतयारीची माहिती घेतली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. शिंदे, निवडणूक उपजिल्हाधिकारी एस. एन. जमादार या वेळी उपस्थित होते.निरीक्षक भरतलाल मीना यांच्याकडे जालना व बदनापूर विधानसभा मतदारसंघाची, विभुप्रशाद शर्मा यांच्याकडे फुलंब्री व पैठण मतदारसंघाची तर निरीक्षक श्रावणलाल मीना यांच्याकडे भोकरदन व सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.