Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आसाम पुन्हा हादरले
चार बॉम्बस्फोटात सात ठार
गुवाहाटी, ६ एप्रिल/पी.टी.आय.

 

आसाममध्ये आज झालेल्या चार बॉम्बस्फोटामध्ये सात ठार व साठहून अधिक जण जखमी झाले. आसाममधील करबीअँगलाँग येथे पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर गुवाहाटीतील मलिगाव भागात दुसरा व धेकीयाजौली येथे तिसरा बॉम्बस्फोट झाला. भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या आसाममधील धुब्री जिल्ह्यातील मनकचर येथे चौथा बॉम्बस्फोट झाला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आसाम भेटीच्या पाश्र्वभूमीवर हे दोन स्फोट घडविण्यात आले असून त्यामध्ये अत्यंत प्रगत अशा स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनीही स्फोटांनंतर लगेचच मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची दाहकता जाणून घेतली. अनेक जखमींच्या किंकाळ्या आणि भेदरलेले चेहरे घटनास्थळी पाहावत नव्हते.
याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक जे. एम. श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की, पहिला स्फोट दुपारी दोनच्या सुमारास मालिगाव परिसरात झाला. स्फोटामुळे दोन मोटारींनी तात्काळ पेट घेतला व घटनास्थळी उभ्या असलेल्या २० मोटारसायकलींचीही मोठय़ा प्रमाणावर हानी झाली. पोलीस ठाणे असलेल्या शेजारच्या तीन मजली इमारतीतही स्फोटानंतर आग पसरली. सहा जण या स्फोटात जागीच ठार झाले व एक जण शेजारच्या इमारतीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात बळी गेला. दुसरा स्फोट त्यानंतर लगेचच तेजपूरनजीकच्या ढेकियाजुली भागात झाला. श्रीवास्तव म्हणाले की जरी हे स्फोट घडविण्यात आले असले तरी पंतप्रधान सिंग यांच्या मंगळवारी होणाऱ्या दिसपूर आणि दिब्रूगढमधील सभा नियोजित कार्यक्रमानुसारच होतील व सभेसाठी सुरक्षा व्यवस्थेची चोख आखणी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे पंतप्रधान कार्यालयातूनही घोषित करण्यात आले. पहिला बॉम्ब मालिगाव भागातील चरियाली परिसरातील पार्किंग झोनमधील एका वाहनाद्वारे घडविण्यात आला. हा भाग व्यापारी भाग असून अनेक दुकाने तेथे वसलेली आहेत. काही मुले शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना हा स्फोट झाला. स्फोटामधील एक बळी मालिगाव प्राथमिक शाळेच्या एका विद्यार्थ्यांचा आहे. मौसम खातून आणि भूपेनकुमार अशी अन्य दोन मृतांची ओळख पटली आहे. शेजारच्या चार रुग्णालयांमध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात २००८ च्या ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने रक्तरंजित स्फोट असल्यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला असून काहींनी तर पोलिसांच्या गाडय़ांना लक्ष्य बनविले.