Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बाळासाहेब भाजपला विसरले, मला नाही - राज ठाकरे
मुंबई, ६ एप्रिल / खास प्रतिनिधी

 

शिवाजी पार्क येथे रविवारी शिवसेना-भाजप प्रचारसभेच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दाखविण्यात आलेल्या दृकश्राव्य भाषणात बाळासाहेब हे भाजप आणि आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करण्यास विसरले असले तरी बाळासाहेबांना माझा मात्र विसर पडला नाही. मराठीच्या मुद्दय़ावरून त्यांनी माझी आठवण ठेवली, अशी मार्मिक प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. तसेच सेना-भाजपच्या प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद अल्प होता याकडे लक्ष वेधून, जर बाळासाहेबांचे भाषण आधी दाखवले असते तर शिवाजी पार्कवर उरली सुरली गर्दीही दिसली नसती, असा टोलाही राज यांनी हाणला.
महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणुका असूनही लोकांचा फारसा उत्साह दिसत नाही, असे सांगून राज ठाकरे म्हणाले की, आघाडय़ा-युत्यांमधील सर्वानीच कधी ना कधी सत्ता उपभोगली असून सत्तेत असताना त्यांनी जनतेची कामे न केल्यामुळेच लोकांमध्ये उदासीनता आली आहे. त्याचेच पडसाद शिवाजी पार्कवरील सेना-भाजपच्या सभेत लोकांच्या अत्यल्प उपस्थितीतून दिसून आले असे राज म्हणाले.
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाने आज राज ठाकरे यांचा वार्तालाप आयोजिला होता. या कार्यक्रमात बोलताना राज यांनी सेना-भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मराठी माणूस पंतप्रधानपदी हवा, असे म्हणणाऱ्यांनी मराठीच्याच मुद्दय़ावर आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना तडीपारी, मारहाण व खोटय़ा केसेस का लावल्या, असा सवाल राज यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’ या मुखपत्रातून ‘मराठीचा मुद्दा माझाच असून काहीजण त्याची उचलेगिरी करत आहेत, असे म्हटले होते. बाळासाहेबांनी केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने उचलला असे म्हटले तर चालणार आहे का, असा प्रतिसवाल करून मुद्दा कोणाचा आहे हा महत्वाचे नसून मराठीची आंदोलने यशस्वी कोणी केली ते पाहणे गरजेचे आहे, असे राज म्हणाले.
शिवसेनेकडे आज मुद्देच शिल्लक न राहिल्याने कधी शरद पवारांना लपून भेट तर कधी लपून जेवायला जाण्याची वेळ आली आहे, असे राज यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता सांगितले. सेना-भाजपवर जोरदार टीका करताना राज यांनी शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात छुपा समझोता झाल्याचे सांगितले.
त्यामुळेच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आपले डमी उमेदवार उभे केल्याकडे राज यांनी लक्ष वेधले. भाजप आज राममंदिर बांधण्याच्या आणि स्वीस बँकेतील काही लाख कोटी रुपये सत्तेत आल्यास परत आणण्याच्या गप्पा मारत आहे असे सांगून राज म्हणाले की, हे केंद्रात सत्तेत होते तेव्हा स्वीस बँकेतील पैसे आणण्यासाठी यांना कोणी रोखले होते. २००४ सालानंतर हा पैसा तेथे जमा झाला असे यांना म्हणायचे आहे का, असे विचारत हा पैसा परत भारतात कसा आणणार, असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. तसेच मंदिर कसे बांधणार हेही अडवाणी यांनी सांगावे, असे आव्हान राज यांनी दिले.
मनसेने केवळ १२ उमेदवार उभे केले असून ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार नाहीत तेथे मनसेची भूमिका काय असेल, असे विचारले असता याबाबत आपण उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून त्यावेळी आपली भूमिका जाहीर करू असे राज यांनी स्पष्ट केले.