Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कसाबला उर्दूमध्ये आरोपपत्र देण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील संशयित अजमल अमीर कसाब याने आज विशेष न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांच्याकडे वकील अंजली वाघमारे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयानेही त्याची ही इच्छा मान्य करीत आर्थर रोड तुरूंग अधीक्षक स्वाती साठे यांना कसाब आणि वाघमारे यांच्या भेटीची वेळ निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, येत्या १५ एप्रिलपासून आर्थर रोड कारागृहात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सज्ज होत असलेल्या विशेष न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरूवात होणार असल्याचे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, आज सुनावणीदरम्यान न्या. तहिलियानी आणि स्वाती साठे यांच्यात झालेल्या इंग्रजीतील संभाषणाविषयी जेव्हा न्या. तहिलियानी यांनी कसाबला विचारले. तेव्हा त्याने हे संभाषण आपल्याला समजल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याला, तुला जर इंग्रजी चांगले समजते तर उर्दूत आरोपपत्राची प्रत देण्याची काही गरज नाही असे सांगून त्याची आरोपपत्राबाबतची मागणी फेटाळून लावली. कसाब, फईम अन्सारी आणि सबाउद्दीन यांना आजही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्या. ताहिलियानी यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी कसाबने न्यायालयाकडे वाघमारे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने स्वाती साठे यांना कसाब आणि वाघमारे यांची भेटीची वेळ निश्चित करण्यासोबत कसाबला देण्यात आलेली आरोपपत्राची प्रत पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्याचे आदेश तुरूंग अधीक्षक स्वाती साठे यांना दिले. आजच्या सुनावणीला फईमची पत्नी न्यायालयात हजर होती. तिने व फईमने या वेळी न्यायालयाकडे पोलिसांबाबत तक्रार करीत पोलीस आपल्या घरी सतत जाऊन वकील बदलण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला. तसेच वकिलाबाबत निर्णय घेण्यासाठी आपल्याला आणखी एका महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणीही फईमने न्यायालयाकडे केली.