Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर कोरियाच्या मदतीला धावले चीन आणि रशिया
संयुक्त राष्ट्रे, ६ एप्रिल/पीटीआय

 

उत्तर कोरियाने अग्निबाणाची चाचणी केल्याने जागतिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याच्या कारणावरून बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या बैठकीत उत्तर कोरियावर करावयाच्या कारवाईबाबत कुठलेही मतैक्य झाले नाही. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांचे दडपण असतानाही उत्तर कोरियावर कारवाईबाबत ठोस असे काहीच ठरवण्यात आले नाही. जपानच्या विनंतीनुसार तातडीने बैठक बोलवण्याची घोषणा कालच करण्यात आली होती. पंधरा सदस्यांच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियाने केलेल्या प्रक्षोभक कृतीवर चर्चा यापुढेही चालू ठेवण्याचे मान्य केले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी उत्तर कोरियावरचे शस्त्रास्त्र व आर्थिक र्निबध आणखी विस्तारित स्वरूपात लागू करण्याची सूचना केली होती, पण ती मान्य होऊ शकली नाही. उत्तर कोरियाचा तीव्र निषेध करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न रशिया व चीनसह पाच सदस्य देशांनी हाणून पाडले. अमेरिका व मित्र देशांनी असा दावा केला की, उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने सुरक्षा मंडळाच्या ठरावांचे उल्लंघन झाले आहे. रशिया व चीनने मात्र या मुद्दय़ावर मतभेद व्यक्त केले. सुरुवातीला या दोन्ही देशांनी अशी भूमिका घेतली की, उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही ठरावाचे उल्लंघन केलेले नाही, पण नंतर त्यांनी भूमिका थोडी सौम्य केली. अमेरिकेच्या राजदूत सुसान राईस यांनी सांगितले की, उत्तर कोरियाचा लगेच कठोर शब्दांत निषेध करण्यात यावा, कारण त्यांनी आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे व ते सुरक्षा मंडळाच्या ठरावांचे उल्लंघन आहे. उत्तर कोरियाने असे क्षेपणास्त्र बनवले तर अमेरिकेतील अलास्का प्रदेश त्याच्या टप्प्यात येण्याचा धोका आहे. रशियाचे राजदूत इगोर एन शचेरबाक यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने कुठल्याही ठरावाचे उल्लंघन केलेले नाही. चीनचे राजदूत येसुई झांग यांनी सांगितले की, इतर देशांप्रमाणे उत्तर कोरियाला उपग्रह सोडण्याचा अधिकार आहे, असे असले तरी इतर देशांनी संयम पाळावा व कठोर कारवाई करून तणाव वाढवू नये.
दरम्यान, इराणने म्हटले आहे की, उत्तर कोरियाने केलेले अग्निबाण प्रक्षेपण हे योग्यच आहे. त्या देशाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा संबंध दुसऱ्या देशांशी जोडता कामा नये. इराणचे परराष्ट्रमंत्री हसन घासघावी यांनी सांगितले की, अंतराळाचा शांततामय वापर आंतरराष्ट्रीय कायदे पाळून केला तर त्यात गैर काही नाही. तो आमचा तर अधिकार आहेच, पण इतरांनाही तसा अधिकार आहे. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम उत्तर कोरियाशी संबंधित नाही, पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे या निमित्ताने इराणची कुरापत काढण्याचे कारण नाही.