Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘आता माघार नाही’
औरंगाबाद, ६ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

लोकसभेची निवडणूक परिवर्तनाची ठरणार आहे. ही निवडणूक लढविण्याचा निर्णय जनार्दनस्वामी आणि भक्तांनी घेतला आहे. आता या निवडणुकीतून माघार घेणार नाही असे शांतिगिरी महाराज यांनी आज ‘लोकसत्ता’स सांगितले.
वेरूळ येथील जनार्दनस्वामींच्या मठामध्ये आज भक्तांची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक रिंगणातून माघार घ्यायची नाही असा निर्णय घेण्यात आला. नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही यासंदर्भात येत्या बुधवारी निर्णय घेतला जाणार आहे.
शांतिगिरी महाराज म्हणाले, ‘‘देशाला दिशा द्यायची की त्याची दशा करायची हे जनतेच्या हातात आहे. संत-महंत राजकारणात उतरत असतात. कुठल्याही आखाडय़ाचा तसा नियम नाही. सामान्य जनतेला आणि भक्तांना किंवा मतदारांना सत्य, असत्य कळत असते. कोणीही माझ्यावर टीका केली तरी मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणार नाही असेही शांतीगिरी महाराज यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षांच्या निष्ठेपेक्षा देशनिष्ठा महत्त्वाची आहे.’’ हरीगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.
या बैठकीला काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील, युतीच्या सत्तेतील माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांच्यासह जय बाबांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. खासदार आणि आमदार निधीचा गैरवापर होत आहे असा आरोप करून श्री. डोणगावकर म्हणाले, ‘‘या निधीचा स्वार्थासाठी उपयोग करण्यात आला आहे. शांतिगिरी महाराजांचा अश्वमेधाचा घोडा आता कोणालाही अडविता येणार नाही. त्यांचा पराभव झाला तर मी राजकीय संन्यास घेईन. युतीच्या काळात राज्यमंत्री म्हणून मला चांगली वागणूक मिळाली नव्हती. माझा अपमान करण्यात आला होता. आता सूड उगविण्याची वेळ आली आहे.’’
श्री. रामकृष्णबाबा पाटील म्हणाले, ‘‘या निवडणुकीतील शेवटचे तीन दिवस महत्त्वाचे आहेत. गेल्या निवडणुकीत माझ्याविरोधात पुढारी होते. तरुण कार्यकर्त्यांची फळी नव्हती. ‘जय बाबाजी’ अशी घोषणा देऊन किंवा आशीर्वाद घेऊन निवडणूक जिंकता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक भक्ताने आपापल्या गावात मेहनत केली पाहिजे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील २०० गावांमध्ये कोणत्याही पक्षाची सभा होऊ न देण्याचा निश्चय भक्तांनी केला पाहिजे. बाबांच्या अस्तित्वाला धक्का न लावण्याची काळजी सर्वच भक्तांनी घेतली पाहिजे. काँग्रेसचा उमेदवार कोण? कुठला हा सिंह? मी काँग्रेस पक्षाच्या विरोधात नाही. उमेदवार मान्य नसल्यामुळे मी शांतिगिरी महाराज यांचा प्रचार करणार आहे.’’