Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कशी ही थट्टा.!
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, ६ एप्रिल

 

उस्मानाबाद मतदारसंघातून खासदारकीसाठी इच्छुक असणारे चौघे वकील आहेत, दोन डॉक्टर आहेत, तसेच एक जण दुसरी उत्तीर्ण आहे आणि दुसरा चौथी. एका उमेदवाराकडे रोकडही नाही आणि बँकेतही पैसे नाहीत. निवडणुकीच्या रिंगणात आजघडीला दोन डॉक्टर पाटील आहेत आणि दोन ‘पद्मसिंह’सुद्धा आहेत. सुशिक्षित बेरोजगार संघटना पक्षाच्या उमेदवाराचे अनुमोदन अंगठेबहाद्दरांनी केले आहे. असे भन्नाट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात टिकणार का?
खासदारकीला इच्छुक असणाऱ्यांमध्ये एका प्राचार्यमहोदयांनी ‘डॉक्टर पाटील’ असा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यांची शैक्षणिक पात्रताही पानभर आहे. महादेव ज्ञानदेव पाटील यांनी पीएच.डी. केली आहे. त्यामुळे ते एक पाटील आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन राजकारणात नाव असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे डॉक्टर पद्मसिंह पाटील. आणखी एका पद्मसिंहानेदेखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. ते नववी उत्तीर्ण आहेत आणि निवडणुकीत उतरलेच तर त्यांनी चिन्ह मागितले आहे रेल्वे इंजिन, कॅमेरा किंवा रोड रोलर.
निवडणुकीच्या रिंगणात वकिली व्यवसाय करणारेही चौघे आहेत. लातूर जिल्ह्य़ातील श्रीमंत येवले पाटील सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांच्याकडे ६० हजार रुपयांची रोकड शपथपत्रात नमूद केली आहे. त्यांनी निवडणूक चिन्ह मागितले आहे पतंग. ‘कटला तर कटला’ असा हिशेब. निवडणूक अर्ज दाखल करताना त्यांची मोठी गंमत झाली. त्यांना लहान अक्षर वाचताच येत नव्हते. अर्ज दाखल करताना उमेदवारांना शपथ दिली जाते. या शपथेचा कागद लहान टंकातील होता. त्यांच्यासाठी त्याची मोठी छायाप्रत काढून आणावी लागली म्हणे!
वाचताच आले नाही..
असेच एक उमेदवार पिंटू पांडुरंग चांदणे. शिक्षण दुसरी उत्तीर्ण. त्यांना वाचताच आले नाही. मग जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे म्हणायचे आणि मागे त्यांनी पाठ करून म्हणायचे. या शपथेचे ‘व्हिडीओ चित्रिकरण’ सरकारने केले आहे. आणखी एक वकील आहेत रेवण भोसले. त्यांच्याकडे जीपगाडी आहे. दोन दुचाकी वाहने आहेत. ५० हजारांची रोकड आहे. बँकेतील शिल्लक आहे सुमारे दोन हजार रुपये. बहुतेक वकील मंडळी उस्मानाबादमधीलच आहेत. ३०२ च्या गुन्ह्य़ातील मंडळी खासदार होण्यास इच्छुक आहेत. त्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.
आठ राष्ट्रीय चिन्हांच्या व्यतिरिक्त ५० मुक्त चिन्हे आहेत. पण उस्मानाबादमधील उमेदवारांचे रेल्वे आणि पतंगावर भारी प्रेम आहे. बहुतेकांनी पहिल्या किंवा दुसऱ्या पसंतीला रेल्वे इंजिन ठेवले आहे. उमेदवाराला ५९ मुक्त चिन्हांपैकी तीन चिन्हे निवडून त्याचा प्राधान्यक्रम द्यावा लागतो. एकाने ‘गाजरा’लादेखील प्राधान्यक्रम दिला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना अशा बऱ्याच गमतीजमती अधिकारी अनुभवत आहेत. सुशिक्षित बेरोजगार संघटना पार्टीच्या उमेदवाराला बालाजी थोरमोटे, वंदना पवार, निळकंठ काळे या तिघांनी निशाणी डावा अंगठा उठवून अनुमोदन दिले आहे. लोकशाही मजबूत व्हायला हवी ना!